चाराेळीकार चंद्रशेखर गाेखले यांचे नवीन पुस्तक ‘मंचविशी प’ हे नुकतंच रसिकांच्या हाती अालं. या पुस्तकाबद्दल ते म्हणतात की, पुस्तकाचं नाव आधी ‘पंचविशी’ असंच होतं, ऐनवेळी ‘मी माझा’च्या परंपरेला धरून ‘मंचविशी प’ असं नाव सुचलं, जे तरुणांच्या मते फिट बसलं. म्हणूनच प्रेमावर किंवा प्रेमात पडून, न्हाऊन, प्रेमात उभं राहून कितीही कविता केल्या तरी खरं सांगू का...
काही शब्द गाळले जातात,
काही शब्द जोडले जातात
कविता म्हणजे कागदावरचे,
लिहिलेले शब्द खोडले जातात....
मुकुंद भोंगाळे म्हणून एक प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे प्राध्यापक आहेत. त्यांचा मला रात्री फोन आला.. म्हणाले, ‘माझ्या मुलीला तुमच्याशी बोलायचंय...’ मी म्हटलं नेहमीसारखंच असणार. काका मला तुमच्या कविता खूप आवडतात वगैरे वगैरे, पण वडिलांसारखं प्रसन्न हसत ती म्हणाली, काका मी प्राची बोलतेय? मी म्हटलं हं! बोल...ती त्याच अवखळ स्वरात म्हणाली, काका तुम्हाला आठवतंय का हो? तुमचं ‘मी’ नावाचं एक छोटंसं पुस्तक होतं... मी म्हणालो, हो हो आठवतंय ना... नक्की साल आठवत नाही, पण दीपलक्ष्मी दिवाळी अंकाबरोबर सप्रेम भेट द्यायला रायकर बंधूंनी ते काढलं होतं. रसिकांचा त्या पुस्तकालही उदंड प्रतिसाद मिळाला होता. हजारोंच्यावर प्रती खपल्या होत्या... त्याचं काय? मध्येच भानावर येत मी विचारलं... तशी ती म्हणाली, त्याची प्रत आहे का तुमच्याकडे? कारण बरेच खेटे घातले, पण दुकानात ते मिळत नाही... मीही जरा विचार करत म्हणालो, बघतो मिळतेय का? त्यावर ती धिटुकली म्हणाली, नाहीतर काका असं का नाही करत? म्हटलं कसं? ती म्हणाली, त्याच धर्तीवर त्याच आकाराचं एक नवं पुस्तक काढा आम्हाला चालेल... एक विचार देऊन संवाद संपला.
मग मकरंदच्या मुलाच्या लग्नाला गेलो. मकरंद नंदिता दोघांनी दिलखुलास स्वागत केलं आणि अगत्याने नवरदेवाला भेटवायला घेऊन गेले. चि. अमितला तर मी कडेवर घेऊन फिरलो होतो.. आता नवरदेवाच्या रूपात त्याला बघताना एकदम उचंबळून आलं, पण एक बरं वाटलं अमुलाही तसंच झालं. काका.. म्हणत तो गळ्यतच पडला आणि सगळ्यात मौज म्हणजे युक्ता म्हणजे आमची सूनबाई सुद्धा तितक्याच लडिवाळपणे मीसुद्धा म्हणत मला बिलगली. म्हणाली, काका
आपली ओळख अाता झाली, पण आपलं नातं खूप जुनं आहे. माझ्या बाबांनी माझ्या आईला पहिलं गिफ्ट दिलं ते मी माझ्याच्या पाच प्रती... म्हणाले, कोणी ना कोणी चोरतं म्हणून पाच प्रती देतोय जपून ठेव.
मग युक्ताच्या आई -बाबांशी परिचय झाला आणि सूनबाईनाही त्या छोटेखानी पुस्तकाची आठवण झाली. म्हणाली, काका ते ‘मी’ पुस्तक आता मिळत नाही का? बाबांनी त्याच्याही खूप प्रती आणून ठेवल्या होत्या. असं बरंच बोलणं झाल्यावर तीच म्हणाली काका ‘मी’सारखं दुसरं पुस्तक काढा, नुसत्या प्रेम कविता घ्या, आमच्या पार्टनर्सना कळूदे प्रेम काय असतं, रोमांस काय असतो? इथे तो विचार लख्ख झाला.
घरी आल्या आल्या उमाला फोन केला तेव्हा ती उंबरगावात शूट करत होती.तिला हा विचार बोलून दाखवला. तिला पण हा विचार पटला.. म्हणाली, अनायसे मी माझाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने पंचविशीला धरून पुस्तक असुदे... मी आल्यावर कविता निवडूया. आणि अक्षरश: पंचविशीतलं स्थिर तरी अल्लड प्रेम धरून उमाने कविता निवडल्या. माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माझाच फोटॊ असतो, या न्यायाने माझा ऐन पंचविशीतला फोटो कव्हरसाठी निवडला, खरं तर माझी पंचविशी खूप खडतर गेली होती, पण त्याचा मागमूसही आशिष सोमपुराने त्या फोटोवर येऊ दिला नाही.. तो फोटो कव्हरसाठी निवडल्यावर, कव्हरसाठी कविता कोणती निवडायची, असा प्रश्न पडला. तिथे फेसबुक कामी आलं. तेव्हाच्या सादर केलेल्या कवितांमध्ये ज्या कवितेला सगळ्यात जास्त लाइक्स मिळाल्या होत्या, जी कविता व्हॉट्सअॅपवर जास्त शेअर झाली होती, तिला मुखपृष्ठाचं स्थान बहाल करण्यात आलं.
डोळेभरून आले की, तुझं रूप कसं दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी, हलक्या हातांनी कुणी पुसावं लागतं
ऐनपंचविशीत काय, उत्कट प्रेमात कधीही येणारा अनुभव मी इथे मांडला होता, जो सगळ्यांना अपील झाला होता.
तीपाठमोरी बसायची, आणि गालातच हसायची
त्या बिचाऱ्याला कळायचं नाही, ही कुठली रीत रुसायची..
अशीअवखळ भेट चितारतानाच
कितिदातो तिच्या, आधी येऊन बसायचा
आणि कितीदा ती गेल्यावर, तो तिथेच बसलेला दिसायचा..
अशाओळीत त्या प्रियकराची हळवी मनस्थिती दाखवायचा प्रयत्न केलाय, या ओळी वाचताना किती जण स्वत:ला चाचपून बघतील.
जीमला स्वप्न वाटायची, त्या आपल्या भेटी होत्या म्हणे
इतके आपण भेटलो? कधी कोण जाणे..
असाअवखळ प्रश्न म्हणजे त्या दिवसातला तो निसटलेला खुळेपणाच.
इंद्रायणी प्रकाशनाच्या मुग्धा कोपर्डेकर यांनी पुस्तकाची बांधणी करतानाच मला सांगितलं, मामा पुस्तक छोटं असलं तरी मूडला साजेसं एक छान रेखाटन करून दे.. म्हणून डेरेदार झाडाखाली बसलेली त्या दोघांची आकृती माझ्याकडून रेखाटली गेली. पंचविशीत रमलेल्या रमणाऱ्या प्रत्येक रसिकासाठी हे पुस्तक आहे म्हणून याचं मूल्यसुद्धा फक्त पंचवीस रुपये ठेवलंय.