आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्लोबल करिअर’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाउंटिंगमधील ग्लोबल करिअर करण्यासाठी थोडासा व्यापक, आंतरराष्‍ट्रीय विचार करायला हवा. सीआयएमएसारख्या संस्थेमधून जर तुम्ही अकाउंटिंगमधली पदवी घेण्याचा विचार करत असाल तर ते खरोखरीच शक्य आहे.
भारतामध्ये आजमितीला ‘कॉमर्स’ किंवा वाणिज्य शाखेकडे बर्‍ यापैकी मुलांचा ओढा आहे. कारण पुढे अनेक संधी असतात. अशा अभ्यासू, गुणी, हुशार, होतकरू, मेहनती मुलं आणि स्मार्ट विद्यार्थ्यासाठी सीआयएमए युनायटेड किंगडम (यूके) अकाउंटिंगचा खास कोर्स गेल्या तपाहूनही अधिक काळ संपूर्ण जगभरामध्ये यशस्वीपणे राबवत आहे. 1919 मध्ये ब्रिटन येथे सुरू झालेल्या या संस्थेमधून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. एक नाही, दोन नाही तर तब्बल 173 देशांमधून विद्यार्थ्यांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
सीआयएमए म्हणजेच चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्स. आपल्याकडे भारतामध्ये जशी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया आहे तशीच ही संस्था आहे. मात्र आपल्याकडील सीए अभ्यासक्रम हा ‘ग्लोबल’ नाही व जागतिक पातळीवर या कोर्सलाही तेवढी मान्यता नाही. विविध देशांमधील ठरावीक परीक्षा पद्धती नोकरीसाठी गरजेची असते. परंतु सीआयएमए केल्यानंतर मग संपूर्ण जगभरातून नोकरीच्या संधी तुमच्यापुढे उपलब्ध होऊ शकतात.
सर्टिफिकेट इन बिझनेस अकाउंटिंग ही प्राथमिक पातळी म्हणता येईल मुख्य कोर्सला प्रवेश घेण्याआधीची! हे अगदी बारावी परीक्षेनंतरच तुम्ही देऊ शकता आणि आपली सीआयएमएसाठी पात्रता निश्चित करू शकता. बहुतेक गोष्टी सीए कोर्ससारख्याच आहेत, परंतु इथे ‘ग्लोबल अकाउंटिंग’चा विचार करण्यात येतो. इथला अभ्यासक्रम, गुणांची पडताळणी, गुण देण्याची पद्धती, किमान उत्तीर्ण होण्याची मर्यादा या सर्वच गोष्टी खर्‍ या अर्थाने कठीण आहेत. ज्यांनी सीए फाउंडेशन कोर्स किंवा आयपीसीसीसारखा कोर्स यशस्वीरीत्या केला आहे त्यांनीही हवेत उडण्याचं कारण नाही. कारण ही परीक्षा ‘क्रॅक’ करणं किंवा निभावणं थोडंसं कठीण आहे. तरीपण असं असलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. बेसिक अकाउंटिंग ज्यांचं अफलातून आहे, अकाउंट्समधील विविध अ‍ॅडजेस्टमेंटस बरोबर खेळी करायला ज्यांना मनापासून आवड आहे, प्रचंड चिकाटी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य आहे, अपयशाला न घाबरता, इथल्या लोकांच्या टोमणे मारण्याला, कुचकट बोलण्याला जराही दाद न देता पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी असलेल्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसाठी हे ‘ग्लोबल करिअर’ निश्चितच चांगलं ठरू शकणार आहे. अभ्यासातील मदतीसाठी सीआयएमए खूप चांगला ‘सपोर्ट’ देत असते. त्यांच्या ऑनलाइन माध्यमातून अभ्यासक्रमांविषयी, लेक्चर्सविषयी, प्रशिक्षणात्मक कार्यक्रमांविषयी सतत माहिती दिली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पैशाचा ! भारतामधील सीएच्या तुलनेमध्ये हा कोर्स निश्चितच खर्चिक आहे यात शंकाच नाही. कारण यूकेमधून हा कोर्स राबवला जातो. विद्यार्थांना तिथे जाण्याची गरज नसते. भारतामधूनच परीक्षा द्यायच्या असतात. त्यामुळे तशा अर्थाने बराचसा खर्च वाचतो हेही तेवढंच खरं आहे. पण फी मात्र जीबीपी अर्थात ग्रेट ब्रिटन पाउंडमध्ये भरायची असल्याकारणाने एकंदरीतच प्रकरण थोडंसं खर्चिक होतं. सीआयएमए काही शिष्यवृत्ती योजना किंवा सवलतीही असतात.