आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Sachin Kedekar In Marathi Movie Kokanastha

'कोकणस्थ' सचिनचा ताठ बाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटानंतर चतुरस्र अभिनेता सचिन खेडेकर पुन्हा एकदा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोकणस्थ’ चित्रपटाद्वारे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या निवृत्त मध्यमवर्गीय गृहस्थाची भूमिका साकारत आहे. त्या निमित्त सचिनने दै. ‘दिव्य मराठी’ला दिलेली ही मुलाखत...
अलीकडच्या काळात तुला विविधरंगी भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. ‘कोकणस्थ’मध्ये तुझी भूमिका काय आहे?

‘कोकणस्थ’मध्ये मी रामचंद्र गोविंद गोखले या एका अत्यंत साध्या सरळ, बँकेत काम करून निवृत्त झालेल्या गृहस्थाची भूमिका साकारत आहे. गोखलेचा मुलगा परदेशात शिकायला असतो. साधे सरळ आयुष्य जगत असताना अशी काही घटना घडते, की त्यामुळे त्याला अन्यायाविरुद्ध उभे राहावे लागते. सर्वसामान्य माणसात असामान्य ताकद असते ती योग्य वेळ येताच बाहेर येते, हा साधारण कथेचा आशय आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकरने नेमके हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
असा प्रयत्न यापूर्वी ‘मी शिवाजीराजे’, ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटांमधूनही झाला होता...
हो. तरीसुद्धा आम्ही हा प्रयत्न पुन्हा एकदा करत आहोत. खरे तर मराठीत महेश आणि मी अशा दोघांनी मिळून अशा आशयाभोवती फिरणारे चित्रपट दिले आहेत. म्हटले तर वास्तवाचे प्रतिबिंबच टिपण्याचा आम्ही दिग्दर्शन आणि अभिनयाद्वारे प्रयत्न केला आहे. एकीकडे गांभीर्याने विचार केला तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपले आयुष्य सध्या गुंडांच्याच ताब्यात आहे, हे आपल्याला जाणवल्यावाचून राहणार नाही. कल्पना नसतानाही आपल्यावर वेगवेगळी दडपणे येत आहेत. जेव्हा अशी दडपणे येतात, तेव्हा त्या परिस्थितीचा प्रतिकार करण्याची आपल्याला तशी सवय नसते. प्रत्यक्ष आयुष्य जगताना इतरांप्रमाणेच माझी आणि महेशचीही अशीच अवस्था होते. मात्र इतरांप्रमाणेच आम्हीसुद्धा मैदानात उतरून लढाई करू शकत नाही; परंतु चित्रपटाच्या माध्यमातून त्या अवस्थेला मूर्त रूप देऊ शकतो, म्हणूनही असे चित्रपट आम्ही देत आलो आहोत. घुसमट व्यक्त करण्याची आमची ही एक पद्धत आहे, असे म्हणा हवे तर. एरवी, प्रत्येकाची सहन करण्याची एक क्षमता असते. आपण किती काळ सहन करायचे, हाच प्रश्न आम्ही ‘कोकणस्थ’ निमित्ताने विचारत आहोत आणि यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही.
कथानकावरून हा चित्रपट महेशच्याच हिंदीतील ‘विरुद्ध’चा रिमेक आहे असे वाटते.
सरळ सरळ रिमेक म्हणता येणार नाही; परंतु त्या धर्तीवरचा असला तरी हा संपूर्णपणे मराठी मातीतील चित्रपट आहे. यातील कथानकात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

‘कोकणस्थ’मधील मध्यवर्ती व्यक्तिरेखा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित दाखवली आहे, त्याचे कारण काय?
पटकथेची गरज म्हणूनच लेखक संजय पवार यांनी ही व्यक्तिरेखा संघाशी संबंधित असल्याचे दाखवले आहे. सामान्य माणून जेव्हा अन्यायाविरुद्ध लढायला उभा राहतो, तेव्हा तो जर दहा-दहा गुंडांना लोळवू लागला, तर ते प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही. ‘कोकणस्थ’तील गोखले हा पूर्वी संघाच्या शाखेत गेलेला आहे. संघाच्या शाखेत त्याला शिस्त आणि दंड चालवणे शिकवलेले असते. त्याचाच वापर करून तो अन्यायाचा प्रतिकार करतो, इतकाच व्यक्तिरेखेचा संघाशी असलेला संबंध आहे.
महेशच्या बहुतेक सर्व चित्रपटांत तुझी भूमिका असते, त्याचे कारण काय? हे दोघांतल्या मैत्रीतून घडते, पटकथेची गरज म्हणून घडते, की आणखी काही?
महेश आणि मी खूप जुने मित्र आहोत. जवळपास 28 वर्षांची आमची मैत्री आहे. महेशला काय हवे, ते मला पक्के ठाऊक असते आणि माझ्यातील उणिवा महेशला ठाऊक असतात. त्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर काम करताना अत्यंत सोपे जाते. महेश जेव्हा कथानक निवडतो, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर मी येतो, याचे कारण मैत्री हे आहेच; पण कोणतीही भूमिका त्याच्या कल्पनेप्रमाणे साकारण्याची माझी क्षमता असावी, असे मला वाटते.

मराठी चित्रपटाचे अनुदान बंद केले पाहिजे, असे मत मध्यंतरी तू व्यक्त केले होतेस. ते का?
सरसकट अनुदान बंद केले पाहिजे, असे मी म्हणालो नव्हतो; तर अनुदानाचा फेरविचार केला पाहिजे, असे म्हणालो होतो. सरकार जे अनुदान देते, ते जर निर्मात्याला चित्रपट प्रचारासाठी दिले तर त्याचा जास्त फायदा होईल, असे मला वाटते. आज अनेक निर्माते चित्रपट बनवतात, परंतु प्रचारासाठी पैसा नसल्याने चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा वेळेस चॅनेलच्या माध्यमातून चित्रपटाची जाहिरात केली, सरकारतर्फे होर्डिंग्ज पुरवल्या वा प्रचाराचा खर्च दिला, तर निदान चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. एकूणच, अनुदानाचा पैसा योग्य रीतीने वापरला जावा, एवढेच माझे म्हणणे आहे.
तू आता मराठी ‘कौन बनेगा करोडपती’मधून प्रेक्षकांसमोर येत आहेस. अमिताभशी तुझी तुलना केली जाईल. यासाठी काय तयारी केली आहेस?
अमिताभ बच्चन यांची जागा कोणी घेऊ शकेल, असे मला वाटत नाही. ‘कोण होणार करोडपती’साठी मी मराठी प्रेक्षकांचा विचार करून स्वत:ची एक वेगळी शैली निर्माण करणार आहे. प्रेक्षकांना माझी शैली नक्कीच आवडेल. अमिताभ बच्चन यांच्याशी माझी तुलना केली जाऊ नये, एवढेच मी सांगेन.

अनेक चित्रपट कलाकार नाटकांमध्ये दिसू लागलेले आहेत. तू परत नाटकात येणार का?
नाटकात काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. माझ्याकडे ऑफरही येतात. परंतु चित्रपट आणि अन्य कामांमध्ये मी व्यग्र असल्याने नाटकांना वेळ देऊ शकत नाही. परंतु या वर्षाच्या शेवटी वा पुढील वर्षी मी एखादे नाटक अवश्य करीन.
(chandrakant.shinde@dainikbhaskargroup.com)