• adhish paigude writes about Keep the true face of Marathi

ठेवा मराठीच्या प्राचीनत्वाचा / ठेवा मराठीच्या प्राचीनत्वाचा

May 05,2017 03:04:00 AM IST
खरं तर याआधी कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्या भाषेतील उपलब्ध साहित्य हे ५०० वर्ष जुनं असावं ही अट होती. ती अट बदलून सरकारनं
आता ते साहित्य १५०० वर्षांपूर्वीचं असेल तरच ते अभिजात समजलं जाईल, असा नियम केला आहे. त्या अनुषंगानं मग यासाठी प्रयत्नशील असलेले हरी नरके यांनी यामधील ‘गाहा सत्तसई’ या ग्रंथाचा संदर्भ मराठीसाठी दिला आहे.

या ग्रंथाबद्दल एक गोष्ट अशी सांगता येईल, की १८७० मध्ये एका जर्मन अभ्यासकाने जर्मनीत याचा पहिल्यांदा प्रसार केला. भारतात येऊन त्यावर संशोधन करून त्याने जर्मनीत हे प्रसारित केल्यानंतर आपल्या लोकांना जाग आली आणि मग ते आमचं म्हणून आम्ही स्वीकारलं. ‘कसाब आणि मी’ या माझ्या नाटकाच्या दरम्यान औरंगाबादचे ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत धोंड यांच्याशी जवळून संपर्क आला. ते या विषयाचे अभ्यासक असल्याने त्यांनी एकदा हा विषय सांगितला. यावर संदर्भासाठी म्हणून त्यांनी मला जोगळेकरांचा ‘गाथा सप्तशती’ हा ग्रंथ वाचायला दिला. खरं तर ‘गाथा सप्तशती’ आणि ‘गाहा सत्तसई’ हे दोन्ही वेगळे ग्रंथ. मूळ ग्रंथ ‘गाहा सत्तसई’ आणि त्याचे संस्कृत रूप म्हणजे ‘गाथा सप्तशती’. त्या काळी असलेल्या प्राकृत आणि संस्कृत या भाषावादाचा इथे संदर्भ देता येईल. तो असा, की लेखी भाषा संस्कृत होती आणि बोली भाषा प्राकृत. त्यामुळे प्राकृत भाषेतील ग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत. जे आहेत ते संस्कृत भाषेतील आहेत. परंतु प्राकृतचा पुरावा द्यायचाच झाला, तर आजही आपले कोणतेही आद्य ग्रंथ पाहिले (ज्ञानेश्वरी अथवा काही जैन ग्रंथ), तर त्यात प्राकृत भाषेचे अवशेष मिळतात.

या दोन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथात आपल्या रोजच्या जीवनातले असे काही संदर्भ दिले आहेत, जे आजच्या आपल्या जीवनालाही लागू होणारे आहेत. यात खरं तर सूचक शृंगार असलेल्या गाहा आहेत. हे घेऊन आजच्या मुलामुलींना आपण यातून काय सांगू शकतो हा विचार केला. लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी नाटक, चित्रपट यापेक्षाही तुर्तास आपण कार्यक्रम करू शकतो असं लक्षात आलं. मग संगीत, निवेदन असे स्वरूप ठरत गेलं. या अनुषंगानं गाहांना आजच्या ढंगात चाली दिल्या गेल्या. यात खरं तर गवळण, नांदी, लावणी असे अनेक संगीत प्रकार आहेत. यात नृत्य असलं, तर लोकांचं लक्ष विचलित होऊ शकतं असा विचार आधी झाला. परंतु या गाहांमध्ये त्यांच्या मूळ अर्थासोबतच अनेक लपलेले अर्थही आहेत, ते लोकांना कळले पाहिजेत, असंही वाटू लागलं. यासाठी मग शास्त्रीय नृत्यातून, त्यातही ‘भरतनाट्यम्’मधून ते लपलेले अर्थ उलगडता येऊ शकतील हे समजलं. त्यामुळे मग त्याकडे वळलो. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात सादर करण्यात आला. कार्यक्रमाची निर्मिती माधुरी धोंड व अनघा परळीकर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. कार्यक्रमांचं दिग्दर्शन मी स्वतः केलं आहे. कार्यक्रमाची मूळ संकल्पना व संहिता ज्येष्ठ रंगकर्मी व औरंगाबाद आकाशवाणी मध्ये ३७ वर्षं वरिष्ठ वृत्तनिवेदक असलेले लक्ष्मीकांत धोंड यांची आहे. कार्यक्रमात काही मूळ प्राकृत गाहांचा भावानुवाद लक्ष्मीकांत धोंड यांच्याबरोबर ज्येष्ठ कवी दासू वैद्य व श्रीकांत उमरीकर यांनी केला आहे. संगीत दिग्दर्शक देवेंद्र भोमे यांनी या भावानुवादित कवितांना चाली दिलेल्या आहेत. विश्वनाथ दाशरथे, आशुतोष मुंगळे, नम्रता महाबळ, सावनी गोखले हे तरुण पिढीचे गायक अापल्यापुढे हा ठेवा उलगडतात. लक्ष्मीकांत धोंड व अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांनी कार्यक्रमाचं निवेदन केलं.

‘गाहा सत्तसई’चा इतिहास
इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० असा ४६० वर्षांहून अधिक काळ राज्य करणारं भारतातील एकमेव घराणं म्हणजे सातवाहन. संपूर्ण दक्षिण भारत त्यांच्या अधिपत्याखाली होता. याच घराण्यातील १७ वा राजा ‘हाल सातवाहन’ हा स्वतः उत्तम कवी होता. ‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे प्रजेतील अनेक जण कविता करत होते. त्यांत धनिक, हलिक (शेतकरी), गृहिणी, शेतमजूर असे सगळे जण होते. हाल महाराजांनी या सर्व कवींना धन देऊन त्यांच्या कविता घेतल्या आणि त्यापैकी सातशे कविता निवडून त्यांचा संग्रह संपादित केला - तोच हा ‘गाहा सत्तसई.’ गाहा म्हणजे कविता. मराठीचं उपलब्ध असलेलं सर्वांत प्राचीन साहित्य म्हणून याकडे पाहिलं जातं.
हाल महाराजांचा राज्यकाल हा इ. स. २१ ते इ. स. ४३ हा मानला जातो. याचाच अर्थ असा, की या ‘गाहा सत्तसई’ला जवळजवळ दोन हजार वर्षं होत आली आहेत. या संग्रहावर जवळ जवळ २५ टीका उपलब्ध आहेत आणि नवव्या शतकापासून लिहिल्या गेलेल्या प्रत्येक अलंकारशास्त्र ग्रंथात उदाहरण म्हणून याच गाहांचा उल्लेख केलेला आहे. या दोन मुद्द्यांवरून ‘गाहा सत्तसई’ची वाङ्मयीन गुणवत्ता आणि महत्ता लक्षात येते. एकूणच हा दोन हजार वर्षांपूर्वीचा अनमोल साहित्यिक खजिना आहे. अभ्यासकांपुरताच मर्यादित असलेला हा ठेवा सर्व रसिकांसमोर यावा या उद्देशानं आम्ही तो कार्यक्रम स्वरूपात सादर केला आहे.

शब्दांकन : मानसी मगरे
[email protected]
X