आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिल फूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा स्टेशनमधून बाहेर पडतच होते तर अद्वैतचा फोन आला. ‘जरा म्हणून याला धीर धरवत नाही. गाडी वेळेत होती, घरी कधी येणार हे सकाळीच सांगून झालं होतं तरी काय आहे पुन्हा!’ हे मनातच. फोन उचलला. ‘कॅय ए???’ मी त्याच्या अंगावर ओरडलेच. ‘नीट ऐक. मी सुश्रुत हॉस्पिटलच्या बाहेरून बोलतोय, बाबांना तिथे नेलंय, तू तिथेच ये थेट.’ हे काही तरी भलतंच निघालं. ‘काय रे, काय झालं?’ आमचं दोघांचं वय वाढायची काही लक्षणं नसली तरी बाबांचं वय काही कमी होत नव्हतं. आमच्या घरी हृदयविकाराची ‘परंपरा’ आहे. ‘फार गंभीर नाहीये, तू तिथेच ये सरळ.’

स्टेशनच्या बाहेर रिक्षाला प्रचंड रांग. त्या गर्दीत उभं राहून काळजी करत स्वत:चं ब्लडप्रेशर वाढवण्यापेक्षा हॉस्पिटलकडे धावत जाऊन ब्लडप्रेशर वाढवणं सोयीचं होतं. तशीही बहुतेक धावतच लवकर पोहोचले असते. तिथे पोहोचले तर हा खालीच होता आणि लांबून मला धावत येताना पाहून खिदळायला सुरुवात झाली होती. त्याचा चेहरा पाहून त्याने मला गंडवलंय हे समजायला वेळ लागला नाही. आज एक एप्रिल. माझ्या जन्मापासून ओळखते मी या प्राण्याला. धापा टाकतच विचारलं, ‘काय रे, काय झालं?’ तसा तो माझ्या हातचा मार पडणार नाही इतपत अंतर सोडून लांब झाला. आणि म्हणाला, ‘तू स्वत:ला फार शाणी समजतेस तर आज तुला आज काहीही करून गंडवलं पाहिजे, असं मी आणि बाबा आजच सकाळी बोलत होतो. मी करून मोकळा झालो... पण आता आधी चल, खरेदी करायच्ये थोडी. बाबांसाठी. त्यांचा वाढदिवस साजरा करायचा, पण त्यांना आधी याचा काही पत्ता लागू द्यायचा नाहीये. आपण आधी जाऊन खरेदी करू. तुझ्या झोळीतून त्यांचं गिफ्ट घरात स्मगल करता येईल.’ हा भोळासांब फारच बनेल झालाय. मला गंडवतोच, वर पुन्हा बाबांच्या नावावर पावती फाडून स्वत:ची कातडीही वाचवतो.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बाबा नेहमीप्रमाणे भाजी वगैरे आणायला गेले तेव्हा घरी त्यांच्या मित्रमंडळाला बोलवायचं आणि नंतर छोटीशी पार्टी करायची, असा आमचा प्लॅन होता. बाबा साठ वर्षांचे होणार होते आणि या महिन्याच्या शेवटी निवृत्त. अशोककाका सकाळीच आले होते. बाबांचे आणखी दोन मित्र आणि वरचे नाना रानडे संध्याकाळी आले. नेहमीचा बाबांचा कंपू.

बाबा आले. चार लोक जास्तीचे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं नाही. मग आम्ही आतून नारळाच्या वड्यांचं ताट आणलं. बाबांना अंड्याची अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे केक बाद. बिनअंड्यांचा केक म्हटल्यावर आम्ही दोघांनी नाक मुरडलं. तसंही नारळाच्या वड्या बाबांना आवडतातच, म्हणून केल्या. केकऐवजी हे. नारळाच्या वड्यांच्या ताटावर मेणबत्ती वगैरे लावून वाढदिवस म्हटल्यावर बाबांना हसावं का आश्चर्य व्यक्त करावं हे समजेना. आम्ही हौसेने ‘हॅपी बर्थडे टू यू’ गाणंही म्हटलं. बाबांच्या नावावर अद्वैतने मला बनवलं होतं हेपण त्याने तेव्हाच सांगितलं. हे सगळे सोपस्कार उरकून गेले तरी नानांच्या चेहर्‍यावर आठ्या. ‘काय नाना, तुमचा वाढदिवसही असाच करायचा का?’

‘हे कसलं तुमचं अनुकरण! काका, तुम्हीपण या पोरांना असं उत्तेजन देणं योग्य नाही. ते पाश्चिमात्त्य राज्यकर्ते होते आपले, आपण आपली संस्कृती सोडून त्यांचं अनुकरण कशाला करायला हवंय?’
अच्छा, ‘आज संस्कृती खतरे में’ आहे तर! ‘नाना, पाश्चिमात्त्यांचं अनुकरण म्हणून का पाहता याकडे? आणि केलं अनुकरण तर काय बिघडतं? दुसर्‍याच्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात असं आपल्याकडेही म्हणतातच की!’
‘हो, पण हे यात काय चांगलं आहे? वडिलांच्या तब्येतीबद्दल खोटं बोलून बहिणीला फसवण्यात काय चांगलं आहे? आणि हे, हे असं मेणबत्त्या फुंकण्यात काय चांगलं आहे? हे कसले तुमचे विझवटे धंदे!’
‘असं अगदी मानू की यात काही चांगलं नाही, पण वाईट तरी काय आहे? आणि ती कालची सगळी मस्करी हो. ती कसली गंभीरपणे घेता?’

‘पण हे काही मला ठीक वाटत नाही. काल याने काकांबद्दल असं काही बोलावं. आज काकांनी वाढदिवसाला मेणबत्ती विझवायची. आणि घ्यायचंच तर राज्यकर्त्यांचं का घ्यायचं?’
‘असं कोणी काही बोलून, मेणबत्त्या फुंकून काही वाईट होतं का? आणि दुसरं, राज्यकर्ते होते, आता आपलंच आहे ना राज्य? त्यांचं तेव्हा राज्य होतं म्हणून अशा मजेशीर प्रथाही घ्यायच्याच नाहीत का? आणि या प्रथा काय फक्त ब्रिटिशांच्याच आहेत का फक्त आपणच उचलल्या आहेत? आता या एप्रिल फूल आणि वाढदिवसाच्या प्रथा जगभरच्या झाल्या

आहेत, नाना.’ एवढा वेळ गप्प असणारे आमचे ‘बर्थडे बॉय’ आता बोलायला लागले, ‘नाना, राज्यकर्त्यांकडून आपण चांगलं घेतच नाही का? मुघल बाहेरून आलेले राज्यकर्ते, पण ताजमहाल आता कोणाचा आहे सांगा? शेवटचा मुघल राजा तर इंग्रजांविरोधात आपल्या बाजूने लढला. आता काळ बदलला. आता पूर्वीसारख्या लढाया होत नाहीत. ब्रिटनचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ काय आहे, चिकन टिक्का मसाला. म्हणजे घेतलं ते फक्त आपण घेतलं नाही. त्यांनीही त्यांना आपल्याकडचं जे आवडतं ते घेतलं की. मराठीत फारसी भाषेतले एवढे शब्द आहेत, ते काय इराणी राज्यकर्ते होते म्हणून नाही. ’

नानांना थोडं पटल्यासारखं वाटत होतं. ‘आणि हे पाहा, या पोरांनी जे केलं ते वडिलांवर प्रेम आहे म्हणून केलं. तुम्ही सगळे इथे आलात ते मित्रावर प्रेम आहे म्हणून आलात. हे प्रेम बघायचं का ते प्रेम कोणत्या पद्धतीने व्यक्त केलं ते पाहायचं?’ नानांचा समाधानी चेहरा पाहून मला आणखी स्फुरण चढलं. मी बाबांना मिठी मारून ‘डॅडी, म्हणूनच आय लौ यू,’ असं म्हटलं. हे बाबांसाठीसुद्धा अतीच होतं, ‘हेच ते मी अद्वैतला म्हणत होतो ते; तू फार पेटलेली असतेस. पण हा तुझा फिल्मी इमोसनल अत्याचार माझ्यावर करू नकोस. आवरा आता.’
चुपचाप मागे सरकून नारळाची वडी तोंडात टाकताना, डोळ्याच्या कोपर्‍यातून नानांचं विजयी हास्य दिसलंच.

314aditi@gmail.com