आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षातील नोंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिसमस -‘शुद्ध’ मराठीत ख्रिसमसला नाताळ असे म्हणतात. ख्रिश्चन लोकांचा देवदूत येशू ख्रिस्त जन्मला असं समजलं जातं तो दिवस. प्रत्यक्षात भगवान येशू २५ डिसेंबरला जन्मला असण्याची शक्यता १ छेद ३६५ एवढी आहे.
भारतात असताना सण साजरा न करता फक्त सुटी उपभोगून सर्वधर्मसमभाव जपण्याचा दिवस. भारताबाहेर असताना लोकांच्या घरातली रोषणाई पाहून दिवाळीच्या आठवणीचे कढ काढण्याचा दिवस. भारतातले मॉलीय - मॉलमधले दुकानदार मुंबई, नागपुरात स्नो पडल्याची सजावट करतात. त्यात गो-या वर्णाचा नाताळबाबा उभा करतात. बहुतांश भारतात बर्फ पडत नसल्यामुळे आणि पाश्चिमात्त्य चित्रपट, टीव्ही बघून नाताळबाबाबद्दल माहिती असल्यामुळे मॉलीय ग्राहकांना या प्रकाराबद्दल आकर्षण असतं. भारतात असणारे अल्पसंख्य ख्रिश्चन नाताळचा सण पारंपरिक भारतीय ख्रिश्चन पद्धतीने साजरा करत असतील असं मानण्यास जागा आहे.
¾३१ डिसेंबर - ग्रेगोरियन कालगणनेनुसार कालगणनेतल्या वर्षाचा शेवटचा दिवस. दुस-या दिवशी १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी टीव्ही, वृत्तपत्र या माध्यमांमधून सरत्या वर्षात झालेल्या प्रमुख घटनांचा आढावा घेतला जातो. लोकप्रिय व्यक्तींच्या निधनाबद्दल शोक असं याचं मुख्य स्वरूप असतं. जगावर प्रभाव टाकणा-या घटनांचं महत्त्व समजण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ लागत असल्यामुळे चांगल्या आणि महत्त्वाच्या घटनांचा या कार्यक्रमांमध्ये उल्लेख असत नाही. त्याशिवाय संपत्या वर्षांशी काहीही संबंध नसणारे गाणी, नाच असे कार्यक्रम टीव्हीवर सुरू असतात.
३१ डिसेंबरच्या सकाळी लोक आपल्या देशाच्या पूर्वेकडे असणा-या देशांमध्ये मध्यरात्री केलेली रोषणाई पाहतात आणि संध्याकाळी आपल्या मित्रमंडळासोबत नवीन वर्षाची संध्या साजरी करतात. या पार्टीमध्ये बाहेर किंवा विकतचे खाणे, भर थंडीत तोकडे कपडे घालून बाहेर फिरणे, वाढलेले वजन बघून येत्या वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प (पाहा : संकल्प) सोडणे अशा गोष्टी प्रामुख्याने होतात. इतर काही अल्पसंख्य पार्टीपूपर्स बनून उत्साही लोकांच्या उत्सवावर पाणी ओतण्याचा प्रयत्न करतात, यात प्रामुख्याने ‘हे आपले नवीन वर्ष नाही. हिंदूंचे नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होते,’ असे सांगितले जाते. बंगाल, पंजाबमध्ये गुढीपाडव्याजागी बैसाखी, गुजराथी समाजात दिवाळी-पाडवा असा रुचीपालट असतो.
¾नवीन वर्ष - भारतात वेगळ्या प्रांतात वेगळ्या वेळेस नवीन वर्ष सुरू होते. भारतीय समाज उत्सवप्रेमी असल्यामुळे चैत्रापासून कार्तिक प्रतिपदेपर्यंत, वर्षातल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कुठे ना कुठे नवीन वर्ष सुरू होते. प्रत्येक वेळेस हीच खरी हिंदू कालगणना असं उत्सवी लोकांना सांगून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही लोक ३१ डिसेंबरला पार्टी करण्याची संधी सोडत नाहीत.
¾संकल्प -
१.ठरवून जी गोष्ट सोडली जाते त्यांच्यापैकी एक संकल्प. सुस्थित लोक दर डिसेंबर महिन्यात, विशेषतः ३१ डिसेंबरला काहीबाही संकल्प सोडतात. प्रमुख संकल्प वजन कमी करण्याचा असतो. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पोर्ट शूज, धावायचे कपडे, व्यायामशाळा, तालीम, जिम यांचे सभासदत्व यांसाठी भरपूर पैसे खर्च केले जाऊन व्यायाम संबंधित अर्थव्यवस्थेला चालना मिळते. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत, १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन डेला आधी सोडलेल्या संकल्पाला सोडून दिलं जातं. वर्षाचे उरलेले साडेदहा महिने बूट धूळ खाऊन आणि कपडे आकार वाढल्यामुळे निरुपयोगी होऊन पुढच्या वर्षी पुन्हा नवीन खरेदी करावी लागते. तरीही उत्साहाने सर्व लोक पुढच्या डिसेंबर महिन्यात संकल्प सोडतात. प्रचंड प्रमाणात सोडलेले संकल्प पाहता, संकल्प फार महाग नसतात, अशी शंका येते.
२. एकेकाळी लोक डायरी लिहिण्याचा संकल्पही सोडत असत; पण फेसबुक, व्हॉट्सअॅप इत्यादींनी सोय केल्यापासून डाय-यांचा खप कमी झाला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकावर आपापले संकल्प जाहीर करण्याची साथही डिसेंबर-जानेवारी या काळात आलेली दिसते.
३. तीस वर्षांनंतर नवीन आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे शीर्षक.
¾विमान - पृथ्वीवरच्या दोन शहरांत, देशांत, खंडांत प्रवास करण्याचं साधन. विमानांचा शोध लागल्यापासून गेल्या १०० वर्षांत या तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केलेली आहे. एकच माणूस प्रवास करू शकेल अशा छोट्या आणि संथगतीने हलणा-या प्राथमिक विमानापासून काहीशे प्रवाशांसकट पॅरिस-न्यूयॉर्क हे हजारो किलोमीटर्सचे अंतर तीन तासांत पार करणा-या काँकाॅर्ड विमानापर्यंत त्यांचे अनेक प्रकार आहेत.
विमानाचा शोध कोणी लावला यावरून सर्व जगात नसले तरीही भारतात वाद आहेत. शिवकर बापूजी तळपदे यांनी बनवलेलं विमानाचं डिझाइन राइट बंधूंनी ढापलं, इथपासून तळपदे यांचं श्रेय त्यांना न देण्यामागचं कारण भारतीयांची अस्मिता ठेचणं हे आहे, असं मानण्याची दोन दशकांची उज्ज्वल परंपरा लाभलेली जुनी प्रथा भारतात तयार झालेली आहे. प्रत्यक्षात तळपदे यांनी उडवलेलं विमान हे विमान होतं का रॉकेट, त्यांच्या विमानाची रचना कशी होती, त्यांच्या विमानाचा आकार कसा, किती होता, एकदा हे यंत्र आकाशात उडल्या‌वर खाली कसं येत असे याचे पुरावे फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सापडतात. या कथांवर विश्वास ठेवता येईल अशा सुरस आणि सुरम्य कथा भारतीय काव्यांमध्ये सापडतात. रामायणाचा व्हिलन, रावण, याच्याकडे विमान होतं. देवाचा अवतार असणा-या, काव्यातल्या हीरो रामाकडे विमानासारखी उपयुक्त गोष्ट न देता, व्हिलन रावणाकडे विमान असल्याचं दाखवून कवींनी उदारमतवाद जपला आहे. या विमानाच्या डिझाइनवरून तळपदेंना प्रेरणा मिळाल्याचा पुरावा फेसबुकावर सापडतो. सध्याच्या विमान प्रवाशांच्या मते विमान प्रवास हा चित्रपट बघणे, ‘उंची’ मद्य पिणे, परदेशी जेवण जेवणे यांसाठी बनवलेला अतिशय तापदायक आणि खर्चिक प्रकार आहे. प्रागैतिहासिक काळात हा प्रकार आजच्यासारखाच तापदायक असल्यास रामायणातला व्हिलन रावण याला विमान प्रवास करावयास भाग पाडून काव्यात अतिशय रोचक प्रतीकात्मकता साधली गेली आहे.