आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषेचं भजं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवाचीच गोष्ट. शनिवारची रम्य संध्याकाळ. घरी मोठी मैफलच भरली होती. अशोककाका, बाबा, नाना रानडे, आजी रानडे, अद्वैत आणि मी. पलीकडच्या ‘श्रद्धा’मधून आणलेले वडे आणि मूगभजी फस्त करून आम्ही बंगळुरूवरून मागवलेल्या कॉफीचा आस्वाद घेत होतो. विषय निघाला, ही कॉफी नेसकॅफेपेक्षा वेगळी का लागते. फिल्टर कॉफी वेगळी असते हे झालंच. खरं कारण आहे, ही कॉफी फक्त कॉफी नसते, त्यात दुस-याही काही तरी बिया असतात; पण कसल्या ते काही केल्या मला आठवेना. हा सगळा संवाद संपत आला, पण नाव आठवल्याशिवाय मला चैन पडेना.
‘अद्वैत, लॅपटॉप पास कर रे तुझा.’ भरल्या पोटी, हातात कॉफीचा कप असताना जागेवरून उठायचा मी कंटाळा केला. तोही माझाच भाऊ, त्यानेही हात मागे पसरून हाताला लॅपटॉप लागतो का याची चाचपणी केली. ‘वाक, वाक अजून फॅटसो! स्ट्रेच कर थोडं.’ हा व्यायाम करत नाही त्यावरून त्याला पिडायची मला आयतीच संधी मिळाली. ‘थांबा, गुगल करून सांगतेच त्यात दुसरं काय असतं ते!’ असं या प्रौढ जनसमुदायाला सांगण्यामागे माझे दोन हेतू होते. एक तर इंटरनेटवर काय वाटेल ते शोधून सापडतं आणि ते कसं शोधायचं हे मला माहित्ये, यावरून शाइन मारून घ्यायची. आणि दुसरा हेतू थोडा गंभीर होता. बाबा आणि अशोककाकांना इंटरनेट वापरायला लावायचं.


पण नानांचा पेशन्स संपला होता. ‘कसली ही तुझी भाषा!’ माझ्या तोंडावर मोठं प्रश्नचिन्ह. ‘लॅपटॉप काय, पास कर, स्ट्रेच कर... ही काय मराठी भाषा आहे? अमृताते पैजा जिंकी असं ज्ञानेश्वर म्हणाले आणि तुम्ही इथे कॉफीशी नाही पैजा जिंकवू शकणार, तुमच्या भाषेने.’ मला वाटलं नाना मस्करी करतायत. अचानक वडे-मूगभजी मिळाल्यामुळे खुश होऊन पीजे मारत असतील. ‘नाना, कॉफीत साखर कमी पडली काय?’ मी चेंडू तटवण्याचा प्रयत्न केला. ‘उगाच फालतूपणा करू नकोस. मराठी माध्यमात शिकलेली तू आणि जरा पुढे शिकल्यावर काय ही तुझी भाषा झाली आहे. धड शिव्याही देऊ शकत नाहीस तू मराठीत. किती इंग्लिश शब्द तुझ्या बोलण्यात! लाज आणता तुम्ही तरुण लोक तुमच्या भाषेमुळे. कसं होणार मराठीचं अजून शंभर वर्षांनी?’


हं, नाना या आठवड्यात कोणत्याशा भडक भाषणाला जाऊन आले असावेत असा तर्क करणं सोपं होतं. पण त्यांच्या मतांवर त्यांना पटेल अशी प्रतिक्रिया देणं आणि तेही त्यांचा अपमान न करता, कठीण होतं. ‘नाना, तुम्हाला वेल्ला शब्द माहित्ये? दिल्लीच्या स्थानिक भाषेतून आलाय. वेल्ला म्हणजे रिकामटेकडा मनुष्य. हे सगळं काही इंग्लिशमधून आलेलं नाहीये. तसे काही बंगाली शब्दही माझ्या तोंडात बसल्येत. चॉलबे ना म्हणजे चालणार नाही, असे.’


माझा प्रतिवाद किती फुसका होता याची झलक ताबडतोब मिळाली. ‘अरे, पण शुद्ध भाषा म्हणून काही आहे की नाही? आधी दिल्लीहून फक्त राज्यकारभार चालत होता, आता भाषाही तिथून नियंत्रित होणार का आपली? ही अशी भाषा बोलणार का आपली पुढची पिढी? तुम्ही लोक कुठे कुठे फिरता आणि मग भाषेचं भजं करून टाकता.’ मला ढेकर आली, मूगभज्याचीच.


त्यापुढे काही न सुचल्यामुळे मी बाबा आणि काकांकडे पाहिलं. नाना आणि काकांनी विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहिलं. पण काकांनी सुरुवात केली. ‘नाना, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. भाषा शुद्ध असावी, पण शुद्ध भाषा म्हणजे नक्की काय? मगाशी तुम्हीच ज्ञानेश्वरांचं अमृतातेही पैजा जिंकी म्हणालात, पण तुम्हीतरी ज्ञानेश्वर वापरायचे ती भाषा वापरता का? ज्ञानेश्वरी तर बाराव्या शतकातली, पण दासबोध चारशे वर्षंच जुना. ती भाषा तरी आपण वापरतो का? झालंच तर तुकाराम आणि रामदासांची भाषा निराळी, ते दोघे साधारण एकाच काळचे. तुकारामांना थोर मानतो ना आपण, मग त्यांची भाषा वापरतो का?’ आयला, हे मला सुचलंच नव्हतं. ‘बहिणाबाई आपल्याला अगदी घरगुती स्त्री वाटते, मग तिची भाषा तरी तुम्ही वापरता का?’ मी उगाच शेपूट लावून दिलं, तेवढंच आपली स्त्रीवादाची गाडी पुढे रेटायची.
‘तो तर अगदीच वेगळा मुद्दा झाला अदिती. आपली भाषा ती पुण्या-मुंबईकडची. पण कोकणी, अहिराणी, व-हाडी आणि अशा किती तरी बोलीभाषा आहेत मराठीच्या. बोलीभाषांचा मुद्दा आणून तू आणखी फाटे फोडू नकोस.’ बाबांना बहुतेक त्यांचं व-हाडी आजोळ आणि तिथली भाषा आठवली असावी.
‘हो, पण हे सगळे आपले लोक आहेत, तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, बहिणाबाई. आजकालच्या पोरांच्या तोंडात केवढे इंग्लिश शब्द असतात. इंग्रज तर नाही ना आपले?’ नानांची विकेट गेली नव्हती तर. पण भाषा हे काकांचं होमपिच. ‘नाना, परकं काय आणि आपलं काय. तुम्ही इंग्लिश शब्द मराठीत वापरण्याबद्दल तक्रार करताय. पण इंग्लिश भाषेतच बाहेरच्या भाषांमधून आलेले बरेच शब्द आहेत. भारतीय भाषांतून शब्द इंग्लिशमधेही गेले. गुरू आणि पक्का हे शब्द इंग्लिशमध्ये वापरतात. आता चिनी भाषेतूनही जातात. कुठल्याही भाषेतून जातात. आणि जगात सगळ्यात जास्त लोकांना समजणारी भाषा म्हणजे इंग्लिश.’


‘भाषा बोलणा-याची संस्कृती दाखवते. आपल्याकडे महाराष्‍ट्रात वासुदेव येतात. या शब्दाचं भाषांतर करता येणार नाही कारण ही आपली संस्कृती आहे. तसं क्रिकेट जेव्हा आपण स्वीकारलं तेव्हा त्यातले शब्दही भाषेचा भाग बनले. आता ही पोरं कॉम्प्युटर वापरतात, त्यातले शब्दही त्यांच्या बोलण्यात येतात. मगाशी ही जसं म्हणाली, गुगल करते. असे नवीन शब्द भाषेत येऊन भाषा समृद्ध होते. कडक नियम लावले तर भाषा साचलेली राहील, शेवाळं येईल. ते खरं भाषेचं मरण असेल. आता जे चालू आहे, तो प्रवाहाचा भाग आहे. त्यावर आकस ठेवू नका, उलट पोरांशी संवाद साधायचा असेल तर पोरांची भाषा शिका.’ नानांचा बदलता चेहरा डोळ्यांच्या कोप-यातून पाहिला नि सुरुवातीला अडलेला प्रश्न गुगल केला. ‘चिकोरी. चिकोरी घालतात कॉफीत, त्याचा वेगळा स्वाद आहे हा.’
या समेवर आजी आणि नाना उठले. ‘काय नाना, मग काय ठरलं भाषेचं?’ मी उगाचच शाइन मारली. नाना हसले, ‘माझी फिरायची वेळ झाली; त्यामुळे माझी टैम्प्लीस आहे. बंगालीत टैम्प्लीसला काय म्हणतात ते गुगल कर मी परत येईपर्यंत.’
नाना रॉक्स, अदिती शॉक्स.


314aditi@gmail.com