आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aditi Article About ‘us And Them’, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपलं-परकं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदाचे बाबा सेवानिवृत्त झाले. आता तरी हे घरात सापडतील आणि त्यांची भटकंती थोडी कमी होईल अशी आम्हा भावंडांची आशा लवकरच मावळली. गेल्या काही महिन्यांपासून बाबांना फोटोग्राफीचा छंद लागला होता, भटकायची हौस होतीच. आता ते त्यांच्या मित्रमंडळासह फोटोग्राफीच्या निमित्ताने चिकार भटकायला लागले. त्यातल्याच त्यांच्या काही फोटोंची निवड त्यांच्या संस्थेतल्या लोकांनी वार्षिकासाठी केली. आता बाबांकडून पार्टी मागायला पाहिजेच.
‘बाबा, पार्टी पाहिजे आम्हाला...’ ‘चला. कुठे जायचं?’ ‘बाबा, तुमच्याकडे हट्ट करावा लागत नाही, तुमच्या विरोधात बंड करावं लागत नाही. आमच्या आयुष्यात काही थ्रिलच नाही.’ ‘हो, पण कुठे जायचं ते मी ठरवणार.’ आम्हाला काय! शेवटी त्यांचे फोटोग्राफीवाले दोन मित्र, नाना-आजी रानडे आणि आम्ही दोन्ही भावंडं पार्टीला निघालो. ‘बाबा कुठे नेताय?’ त्यांना प्रश्न विचारणं चूकच होतं. बाबा थंडपणे म्हणाले, ‘अजून पंधरा मिनिटांत समजेलच.’ शेवटी आमचा तांडा एका पॉश इटालियन रेस्तराँसमोर थांबला. इथे गर्दी कमी असते आणि इटालियन जेवण मला आवडतं. बाबांची भलतीच प्रगती झालेली दिसत्ये.

तिथे बसलो, मेन्यू समोर आला आणि गमतीला सुरुवात झाली. इटालियन पदार्थांची नावं आणि वर्णनं इंग्लिशमध्ये असली तरी वर्णनावरून सीनियर लोकांना काही अंदाज येईना. आम्ही दोघे घरी पास्ता बनवायचो, कधी पिझ्झा आणायचो, बाबांनाही तेवढंच माहीत. तोर्तलेनी, रिकोटा, बोलोनिया असल्या नव्या शब्दांमुळे सगळ्यांचंच त-त-प-प सुरू झालं. मी परदेशी राहून आलेली असल्यामुळे समूहाचं नेतृत्व माझ्याकडे आलं. चीजचे वेगवेगळे प्रकार कसे असतात, पास्ता गव्हाचाच बनवतात वगैरे ज्ञान पाजळून घेतलं आणि मग ब-याच वेळानंतर शेवटी आमच्या जेवणाची ऑर्डर पूर्ण झाली.

‘इथे काही डोसा, उत्तप्पा, वडे वगैरे मिळत नाही काय?’ बाबांच्या एका मित्राने ‘युद्धा’ला तोंड फोडलं. ‘नाही हो काका. हे प्रकार भारतीय जेवणाचे आहेत. हे रेस्तराँ इटालियन आहे. इथे भारतीय पदार्थ कसे मिळणार?’ तेवढ्यात आमच्या पुढ्यात पाव आणि ऑलिव्ह तेल आलं. हा पाव तेलात बुचकळून खायचा. अद्वैतला परदेशी सिनेमे पाहून मिळालेलं ज्ञान असणार. आम्ही दोघांनी पावावर ताव मारला.

‘एवढा पाव चांगला नाही तब्येतीला!’ नाना एवढा वेळ गप्प बसणं शक्यच नव्हतं. ‘केवढा मैदा त्यात आणि त्यातून तो आंबवलेला असतो. चांगलं नाही हे असं तब्येतीला.’ ‘नाना, एक तर सगळे पाव मैद्याचे नसतात. पावाच्या आत पाहा, हा जो मातकट रंग आहे तो कणकेचा आहे. मैद्याचा नाही. आणि दुसरं म्हणजे आंबवलेले डोसे, इडल्या, कुरडया चालतात तर मग पावानेच काय घोडं मारलंय? खाऊन पाहा, ताजा पाव काय चविष्ट लागतो. ऑलिव्ह तेल नसलं तरी चालेल.’ शिवाय वेटरने येऊन, आमच्याकडे सगळं ताजं बनवतात तेव्हा तुमचं बनायला अजून पंधरा मिनिटं लागतील, अशी सूचना आधीच दिली होती. नानांना कुठला तेवढा धीर धरायला! भूक लागली होतीच. नानांनी नाक मुरडत पावाचा एक तुकडा तोंडात टाकला. ‘तसा बरा आहे चवीला, पण रोज हे असं खाणं चांगलं नाही. म्हणूनच आपल्याकडे पोळ्या-भाकरी खातात.’ दोन गोष्टींचा परस्परसंबंध मला समजेना. ‘नाना, रोज हा असा पाव खाणारे युरोपीय जगावर राज्य करून गेले हे विसरू नका,’ मी त्यांना दसपट निरर्थक स्पष्टीकरण दिलं. ‘पण तुम्ही असाही विचार करा, हे युरोपीय लोक रोज पाव खातात. त्यांच्या तब्येती पाहा. आपल्यापेक्षा उंचेपुरे लोक असतात. त्यात थोडा गुणसूत्रांचा भाग झालाच. पण किती लोक तिथे आरोग्याच्या तक्रारी घेऊन येतात? भारतात ज्यांना पोटभर खायला मिळतं ते लोक किती जगतात? या देशांचा आरोग्यावर किती खर्च होतो, या प्रश्नांचा विचार करा तुम्ही. दुनियाभरच्या सगळ्या तंत्रज्ञानाची जिथे सुरुवात होते ते लोक निकृष्ट दर्जाचं अन्न खातील का? आणि असं अन्न खाऊन त्यांची प्रगती होणं तरी शक्य आहे का? तुम्ही तुमच्या शाळकरी नातवाला अजूनही बाहेरचं खायला घालत नाही, त्यातून पोट बिघडेल म्हणून. तिथे सर्रास मुलं रेस्तराँमध्ये जेवतात. काही कोणाचं बिघडलेलं दिसत नाही.’

‘ते काहीही असो. आपल्या अन्नाला जशी चव असते तशी त्यांच्याकडे नाही.’ नानांना मुद्दा सोडायचा नव्हता. ‘नाना, पंजाबी पद्धतीच्या पदार्थांना तरी आपल्या पदार्थांची चव असते का हो? आणि महाराष्टÑातही खाण्याच्या किती त-हा आहेत. प्रत्येक भागातलं काही ना काही वेगळं असायचंच. वेगळं आहे म्हणून वाईट आहे असं होत नाही. मसाला डोसा तरी कुठे आपला आहे, आवडतो ना तो सगळ्यांना?’

नशिबाने तोपर्यंत जेवण आलं. आपण कोणता पदार्थ मागवला होता त्यांची नावं सगळेच तोपर्यंत विसरले होते. मला आणि अद्वैतलाच त्यातल्या त्यात काय ते आठवत होतं. ‘गरम असेल, जपून खा,’ अशी सूचना द्यायला वेटर विसरला नाही. ‘हाताने खाणं हेच खरं खाणं. पाटावर बसून जेवताना कसं अन्न हे पूर्णब्रह्म वाटतं. मला हे तुमचं टेबलखुर्चीवर बसून चमच्या-काट्याने खाणं काही पसंत नाही,’ मी खाण्यात गुंगलेली पाहून नानांनी स्वत:चा मुद्दा पुढे रेमटला. मी पास्त्यासोबत वैताग गिळून टाकला. यांना हॉटेलात कोण पाट आणून देणार!
दोन-चार दिवसांनी सकाळी नानांकडे गेले होते. नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी होती. मलाही खाण्याचा आग्रह झाला. खिचडीला नाही कसं म्हणायचं? ‘तू बस काकू, मी घेते वाढून.’ पण डायनिंग टेबलसुद्धा भरलं होतं. काकू उठून मला तिथे जागा द्यायला लागली. ‘नको, नको काकू. तू बस. मी पाट घेते आणि खाली बसते. मला टेबलखुर्चीवर बसून काटासुरीने खायला आवडतं; पण खाली बसून खाल्लं म्हणून आनंद कमी होतो असं काही नाही.’ नानांनी दचकून माझ्याकडे पाहिलं. ‘आणि नाना, तुम्हाला माहित्ये का, साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाणे या तिन्ही गोष्टी आपल्याकडे परदेशातून आल्या. पोर्तुगीजांनी आणल्या. पोर्तुगीज म्हणजे ते युरोपातले ... पाव खाणारे. हे पाहा विकिपीडियावर.’

‘बोलताना खाऊ नये आणि ­ बोलू नये. ही शिस्त तुला कधी लागणार?’ आजीच्या प्रेमळ दटावणीवर मी गप्प बसले, नानांच्या चेह-यावर वेगळंच काही लिहिलं होतं. ‘पुढच्या वेळेस तू आलीस की मला घरी काहीतरी युरोपीय पदार्थ बनवून खायला घाल. हॉटेलातल्या किमती जास्त आहेत. तुझे बाबा फार पैसे खर्च करतात.’
314aditi@gmail.com