आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditi Moghe Article – Be Happy With What You Have

आनंदाच्या थैल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यंतरी टिम मिन्चिन या हरहुन्नरी ऑस्ट्रेलियन कलाकाराचं भाषण ऐकलं, त्याने एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं. आयुष्याचा अर्थ शोधायच्या भानगडीत पडू नका, ते म्हणजे पाकशास्त्राच्या पुस्तकात यमक शोधायला जाण्यासारखं आहे. मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करायच्या नादात समोर असलेला आनंद गमावू नका. तुमचे शिक्षण गृहीत धरू नका, ते पुढे जाऊ द्या आणि लोकांपर्यंत पोचू द्या. आपली मतं हजारदा पारखा, वगैरे. पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात.
किती महत्त्वाचा विचार आहे हा!
इतक्या गोष्टी आहेत या जगात, इतके विषय, इतके ऋतू, इतके रंग, इतकी माणसं, माती, समुद्र, फुलं आणि सूर्य! हे सगळं तर मिळालंय आपल्या सगळ्यांना. त्याबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करतो आपण?
आजूबाजूला बघितलं की असं वाटतं, अनेक जण आयुष्य म्हणजे लईच पापं केल्यामुळे मिळालेली शिक्षा असल्यासारखे वावरतायत. चौथी सीटपण मिळत नाही, ऑफिसमध्ये मलाच डावललं जातं, वांग्यामध्ये अळ्याच निघतात, मला खूप फसवतात, सगळ्यांचं सग्गळं सुखेनैव चाललेलं आहे, माझं सोडून!
किती वेळा असा विचार करतो आपण, की पाऊस माझ्यासाठी पडतोय! सूर्य माझ्यासाठी उगवतोय! नाटकं मी पाहावीत म्हणून कलावंत सादर करतायत! मी ब्रिजवरून धावत येतेय म्हणून ट्रेन सहा सेकंद जास्त थांबतेय, ऑफिसमध्ये नेमकी मला आवडते ती भाजी आहे दुपारच्या जेवणाला.
मला टॅक्सी कधीच मिळत नाही आयुष्यात, हा विचार मलाच त्रास देऊन जातो. त्यापेक्षा येणारी आठवी टॅक्सी नं खास मलाच घ्यायला येतेय, हा विचार आपल्याला स्वत:साठी सुसह्य ठरतो. पु.लं.नी नाही लिहिलेय? समोरच्या घरातला रेडिओ आपल्याचसाठी लावलाय असा विचार केला की त्रास कमी होतो?
आपली माणसं, दरवर्षीचा पाऊस, नेहमीचे सण, घरचे जेवण या सगळ्याला गृहीत नको धरूया. सगळे सेकंद, तास, दिवस, वर्षं, महिने यांना एका ठरावीक रंगात रंगवून एकसुरी नको करूया. प्रत्येक क्षणाला त्याचं त्याचं सौंदर्य, रूप, म्हणणं असतंच. आपल्याला गर्दीत उभं करून गर्दी असं लेबल लावलेलं आवडेल का आपल्याला?
सरत्या वर्षाला गुंडाळून फेकून नको देऊयात. त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल एखाद्या संध्याकाळी आपल्या माणसांबरोबर गप्पा मारून पाहा. मजा येईल.
गोष्टी खास अशा जन्माला येत नाहीत, त्या आपण बनवायच्या असतात. सगळ्याच गोष्टींची टू मिनिट्स रेडीमेड रेसिपी मिळाली तर मग आपला रोल काय नं? घसरलेला रुपया, वाढलेले पेट्रोलचे भाव, भरकटलेले राजकारण, न परवडणा-या भाज्या, अनेक दुर्दैवी घटना याच्याचबद्दल बोललं जात नेहमी आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण वगळूनच टाकतो. पुढलं वर्षं सगळ्या चांगल्याच गोष्टी घेऊन येईल आणि हे गेलेलं इतकं वाईट होतं की संपूच दे आता ते एकदाचं, हा अप्रोच अन्यायकारक आहे. हा अप्रोच एकदा घेतला की मग प्रत्येक वर्षं सारखंच होऊन जातं.
शिप ऑफ थिसिअस नावाच्या चित्रपटातलं वाक्य कायमचं लक्षात राहिलंय माझ्या. आपलं अख्खं आयुष्य सामाजिक बदलासाठी झटणा-या आजीची नातू कायम चेष्टा करत असतो. पण प्रसंग असा येतो, की त्यालाही कोणाला तरी मनापासून मदत करावीशी वाटते, तो खूप प्रयत्न करतो पण फार काही घडत नाही. तो आजीकडे येऊन म्हणतो, ज्यादा कुछ हो नहीं सका. त्यावर आजी त्याला जवळ घेऊन म्हणते, इतना ही होता है।
खूप मोठा विचार आहे. इतक्या मोठ्या विश्वाच्या उलाढालीत, आयुष्यच्या आयुष्य वेचून घडलेले बदल छोटेसेच असणार, पण तरीही प्रयत्न केलेच पाहिजेत.
रामाला सेतू बांधायला मदत करताना खारीने तिचे 100 टक्के प्रयत्न दिलेच!
जग सुखी व्हावं, आपण सुखी व्हावं, सगळ्यांनी आनंदात असावं यासाठी हेच खारीचे प्रयत्न आपण करत राहायला हवेत. कुठलीही शंका न घेता.
मधुरिमामध्ये लिहायला सुरुवात केली तेव्हा विचार नव्हता असा काही केलेला की काय विषय असावा, कशाबद्दल लिहावे, काय म्हणावे. आजूबाजूला दिसलेले, मनाला लागलेले, भिडलेले क्षण, भारावून टाकतील असे विचार, सिनेमे, पुस्तके, माणसे समोर ठेवायचे प्रयत्न करायची इच्छा होती. हे मला स्फूर्ती देणारे विचार वाचून हजारो लोकांना चांगुलपणावर विश्वास ठेवावासा वाटावा, जबाबदा-या घेऊन गोष्टी कराव्याशा वाटाव्यात, अनुभवांबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी ही अपेक्षा चुकीचीच आहे. इतना ही होता है, ही पटलेली गोष्ट आहेच मला. पण रावीपारच्या निमित्ताने जर दोन-चार जणांना आनंद मिळाला असेल तर मला माझा खारीचा वाटा उचलायला मिळाला या वर्षी याचा आनंद आहे.
सरत्या वर्षाला हसत निरोप देत, नव्या वर्षाला चल, कामाला लागूयात म्हणूयात. मला खात्री आहे ते आपल्या सगळ्यांसाठी customized आनंदाच्या थैल्या घेऊन निघालंय.