आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aditi Satirical Article About New Technical Terms

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिज्ञानकोश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झपाट्याने बदलणारं तंत्रज्ञान, त्यानुसार आपल्या जीवनमान, भाषेत होणारे बदल सगळ्यांना चटकन झेपतील असं नाही. हे बदल सुसह्य करण्यासाठी आम्ही एक खास ज्ञानकोश तयार करत आहोत. हा ज्ञानकोश मोठा प्रकल्पच होणार असून त्यातून आजच्या व्यामिश्र आणि अर्थनिर्णयनाच्या विविध शक्यता निर्माण करणारं... ‘अं काय? ... फार कठीण बोलत्ये का मी? काय? इथे असं जडजंबाल बोलायची गरज नाही? हे बरंच झालं.’
हां, तर नवीन तंत्रज्ञान, टीव्ही मालिका, त्यातून तयार होणारे पॅटर्न्स यांचा अभ्यास कोणी अजून हजार वर्षांनी केला तर त्यांना शब्दांच्या व्याख्या सहज शोधता याव्यात, या भव्यदिव्य-उदात्त... ‘जड होतंय का पुन्हा?’ राहू दे ही सुरुवात. थेट शब्दांचे अर्थच बघू या.
जिम - मूळ शब्द : जिम्नॅशियम, इंग्लिश. नाम. सर्वलिंगी. स्त्री-पुरुषांनी एकत्र अथवा वेगवेगळं जाऊन व्यायाम करण्याची जागा.
स्त्रियांना प्रवासात किंवा कार्यालयात मैत्रिणींबरोबर गॉसिप करायला पुरेसा वेळ मिळत नसेल तर स्त्रिया जिममध्ये जाऊन गॉसिप पूर्ण करतात. विशेषतः सास-बहू मालिकांबद्दल (पाहा : सास-बहू मालिका) बोलण्यासाठी जिमसारखी सोयीची अन्य जागा नाही असं काही पुरुषांचं मत सापडतं.
दोन आठवड्यांत दंडांचा घेर मोठ्या कलिंगडाएवढा करण्यासाठी पुरुष पैसे खर्च करतात ती जागा. मेट्रोसेक्शुअल पुरुषांची - स्वतःच्या रंगरूपाची काळजी घेणारे पुरुष - बायकांची गॉसिप ऐकण्याची जागा. जिममध्ये घाम गाळणारे पुरुष, आपल्या व्यायामाकडेच लक्ष देत असतील अशा गैरसमजापोटी, बायकांना गॉसिप-सेफ वाटतात.
आपण फिगर कॉन्शस नाही, फक्त आरोग्यासाठी व्यायाम करतो असा समज बाळगणा-यांना मिठाई, गोडाचे पदार्थ, तळकट गोष्टी, डुक्कर-बकरे रिचवता यावेत म्हणून जिम बनवले जातात.
सास-बहू मालिका - मूळ : हिंदी टीव्ही मालिका, नाम, स्त्री. हा शब्द कधीही एकवचनी वापरला जात नाही. कपड्या-कुंकवाच्या नवनव्या फॅशन पसरवण्याचे दाखवायचे दात असणा-या परंतु टीव्हीवर सतत क्रिकेटचा भडिमार करणा-या आणि ते काही कमीच आहे या थाटात सगळीकडे क्रिकेटबद्दल बोलणा-या पुरुषांचा सूड घेण्यासाठी बायकांनी, बायकांच्या, बायकांसाठी बनवलेल्या टीव्ही मालिका. या मालिकांमध्ये वस्तुस्थितीचं यथार्थ दर्शन असतं, उदा : घराचा ताबा स्त्रियांकडेच असतो, घरातली सगळी कटकारस्थानं स्त्रियाच करतात, त्याला स्त्रियाच समर्थपणे तोंड देतात आणि नैतिकतासुद्धा स्त्रियाच नियंत्रित करतात; स्त्रियांनी काय कपडे घालायचे हे कोणी भगवी छाटी, लाकडी काठी घेतलेला किंवा सरकारी मंत्री सांगू शकत नाही. मालिकेतल्या स्त्रियांच्या फॅशनप्रमाणेच प्रत्यक्षातल्या फॅशन ठरतात.
क्रिकेटच्या प्रेक्षकांचा सूड घेण्यासाठी बनवलेल्या मालिका असल्यामुळे या मालिकांमध्ये काहीच घडत नाही. जसं क्रिकेटमध्ये खूप काही घडतंय असं दाखवतात, प्रत्यक्षात काहीही होत नाही; जे नाणेफेक करून ठरवता आलं असतं त्यासाठी सलग तीन तास ते पाच दिवस एवढा वेळ खर्च केला जातो त्याप्रमाणेच मालिकांमध्ये खूप काही घडतंय हे दाखवतात.
व्हॉट्सॅप - मूळ : तांत्रिक भाषा, नाम, नपुं. या शब्दाचे उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात - उदा : व्हॉट्सप, व्हॉडप, व्हॉट्स अ‍ॅप.
आपल्याकडे स्मार्टफोन आहे, तो आपल्याला वापरता येतो, त्यातून लोकांना फुकट मेसेज पाठवू शकतो, त्यासाठी आधीपर्यंत वापरात होती ती कोणतीही अ‍ॅप्स उपयुक्त नाहीत, या सगळ्याचा आभास निर्माण करता यावा म्हणून बनवलेलं स्मार्टफोन अ‍ॅप. हे अ‍ॅप वापरणारे लोक नेहमीच्या भाषेत, बोलण्यात एकमेकांना ‘काय कसं काय’ हे विचारण्यासाठी ‘व्हॉट्स अप’ किंवा ‘व्हॉडप’ असे शब्द वापरत नाहीत हा या अ‍ॅपचा सगळ्यात मोठा फायदा आहे.
एक तद्दन, वेळकाढू वेबसाइट - फेसबुक - (पाहा : फेसबुक) बनवल्यानंतर तंत्रज्ञांना आपण लोकांचा वेळ कसा फुकट घालवू शकतो पाहा, याचा गर्व झाला. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला फेसबुकावर मिळालेला अतिप्रचंड लाइकयुक्त पाठिंबा पाहून तंत्रज्ञांचं धाबं दणाणून त्यांनी नवं अ‍ॅप लिहायला सुरुवात केली. लोकांच्या आयुष्याची गती वाढवली, त्यांना सतत ऑनलाइन असायला भाग पाडलं, की अतिशय निरुपयुक्त संदेशांची देवाणघेवाण करून स्वतःचं महत्त्व वाढल्याचा आभास निर्माण होईल आणि त्यातून हे वेळकाढू अ‍ॅप भरभराटीस येईल अशा उद्देशाने हे अ‍ॅप सुरू झालं. सध्यातरी या अ‍ॅपला चांगले दिवस आहेत. अनोळखी मुलींचे फोन नंबर मागण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.
फेसबुक - मूळ : तांत्रिक भाषा, नाम, नपुं.
काहीही झालं ‘तर हम नहीं सुधरेंगें’ हे सिद्ध करण्याच्या उदात्त हेतूने, मुलींच्या फक्त चेह-यांचे फोटो पाहून त्यांना ‘हॉट ऑर नॉट’ ठरवण्यासाठी आणि पर्यायाने मुलग्यांचे पुरुष होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी फेसबुक सुरू झालं. सुरुवातीला फक्त घासू पोरांपुरतं फेसबुक मर्यादित होतं. पण मुलीसुद्धा हँडसम हंकांचं वर्गीकरण फक्त चेहरा पाहून करतात हे लक्षात आल्यावर फेसबुकाची व्याप्ती वाढवण्यात आली.
वयाने मुलगा किंवा मुलगी न राहिलेले मोठे घोडे-घोड्या फेसबुकावर येऊन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाइट’, ‘आज मी फार दमले आहे’ इ. जागतिक महत्त्वाचे संदेश देण्यासाठी फेसबुक वापरत असत. तोपर्यंत फेसबुकाच्या प्रगतीचा आलेख चढता होता. परंतु अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला ऑफिसातून लाइक करून, शेअर करून फेसबुकाला भारतात गांभीर्य येऊ लागलं. त्याच वेळी ‘अरब स्प्रिंग’बद्दल फेसबुकावर कॉमेंट लिहायला सुरुवात झाल्यामुळे फेसबुकाची प्रतिमा ‘हिला के रख देंगे’ अशी गांभीर्याची होऊ लागली. इथेच फेसबुकाचा आलेख उतरणीला लागला आणि व्हॉट्सअ‍ॅपची चलती सुरू झाली.
आपल्या घरचे लोक आपल्याच बालपणाचे फोटो फेसबुकावर शेअर करून आता कॉलेजकुमारी किं‌वा कॉलेजकुमार वयाच्या असणा-या लोकांना छळतात; यामुळे तरुण लोकांमध्ये फेसबुक पॉप्युलर नाही.
‘मी फेसबुका‌वर नाही,’ असं म्हणणं काही लोकांमध्ये प्रतिष्ठेचं समजलं जातं. हे लोक प्रामुख्याने तांत्रिक प्रकारची कामं करून पोटं भरतात याची नोंद महत्त्वाची आहे. चोराची पावलं चोरालाच ठाऊक.