आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवणाच्या टेबलावर कोणता विषय निघेल सांगताच येत नाही. आजचा विषय मात्र वेगळा असल्याने वाटले की, लिहूनच काढावा.

एरवी जेवणाच्या वेळेवर न बोलणाऱ्या राहुलने विचारले की, अमेरिकेच्या कल्चरबद्दल तुमचं भाष्य काय?

‘अमेरिकन कल्चर खरोखरीच सर्वार्थानं नॉनस्टिक, डिस्पोजेबल कल्चर आहे.’ 

टेबलावर बसलेल्या सर्वांनी माझ्या मताशी सहमती दाखवली, निदान तसं भासवलं तरी. हे सारं असतानाही मुलांना अमेरिकेला किंवा परदेशात जाण्याची एवढी तीव्र ओढ का वाटते, हे कोडं मला उलगडत नव्हतं.

पैसा, पैसा आणि पैसा आणि भरपूर व्यक्तिस्वातंत्र्य. सध्या तर अापल्या देशातही व्यक्तिस्वातंत्र्य आलंय, पण भरपूर प्रमाणात नाही. ते बाकी खरं हं. पण कधी परदेशातील मुलांना असं समृद्ध जीवन जगताना पाहून कधी कधी मला हेवाही वाटतो त्यांचा. व्यक्तिस्वातंत्र्याचे चांगले, वाईट परिणाम इथं दिसून येतात खरं. पण त्याचबरोबर अस्थिर जीवनाचे धोकेही असतीलच ना? 

‘असतील म्हणजे आहेतच. पण असं जीवन एका अर्थानं प्रवाही असतं. शिवाय आपले संस्कार असतात ना सांभाळून घ्यायला. स्वत:वर नियंत्रण ठेवायला,’ राहुल पटकन बोलला.
मग संस्कारांची तुमची व्याख्या तरी काय आहे?

संस्काराची नेमकी व्याख्या करता येणार नाही, पण जे काही आईवडिलांनी, शिक्षकांनी आमच्या मनात रुजवलं, वाढवलं, आम्हीही आमच्या परीनं ते जोपासलं ते जर माणसाला संपन्न करत असेल, पुढे जाण्याची वाट दाखवत असेल, तर त्याचं महत्त्व मान्य करायलाच हवं.
त्याच्या विचारातून एका परीनं त्याच्यावर केलेल्या संस्कारांचाच परिचय येत होता.
मग तिथं राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांना तोंड देण्याची तयारी असली पाहिजे?
ती असायलाच हवी. नाहीतर तिथं सर्वायव्हल हाेणं अशक्य आहे.

मग भारतात प्रश्नांना काय वानवा आहे? जगण्याचे स्वातंत्र्य ज्यांना हवे आहे, त्यांच्यासमोर प्रश्नांची इथंही कमी नाही. प्रश्न सोडवण्याची दिशा निश्चित करण्यातच एक पिढी बरबाद व्हावी, इतके प्रश्न इथे आधीपासूनच उभे आहेत. स्वातंत्र्य मिळावं म्हणून देश सोडून परदेशात स्थायिक होण्यासाठी येणाऱ्या माणसांचीही कमी नाही. फक्त कमी आहे ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र विचार करणाऱ्या व्यक्तींची.  आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे, अमृतानं आणखी एक नकार दिला. घरातलं वातावरण कोंडल्यासारखं झालं आहे. अमृता एकुलती एक मुलगी. तिला मनोज पसंत आहे. त्याची नोकरी, सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सारं काही घरच्यांच्या मनासारखं आहे. तिच्या प्रगतीत कोणताही अडथळा आणणार नाही, असं मनोजचं कुटुंब आहे. तरीही नकार.
मग नकाराचं नेमकं कारण काय? अमृता अन्् मनोजलाही ते नेमकेपणानं सांगता येत नाही. ‘प्रॉडक्ट इज गुड, बट इट डज नॉट मीट अवर रिक्वायमेंट्स,’ असं त्यांचं म्हणणं.

अमृताला पैसा मिळवायचा आहे. खूप, खूप अगदी अजीर्ण होईपर्यंत. स्वतंत्र राहायचंय, घर-परिवाराची कोणतीही जबाबदारी नको आहे. ती उचलायला, वाटून घ्यायला सासरची माणसेही नको आहेत. खरं तर दोघांच्याही नोकऱ्या चांगल्या आहेत. दोन्ही घरची परिस्थिती उत्तम आहे. दोघेही देशविदेशात हिंडून आले आहेत. हिंडणारही आहेत. मग आणखी कोणती अपेक्षा?
अमृताचं म्हणणं तिला खूप, खूप पैसा कमवायचा आहे. आपल्या पायावर उभं राहायचंय. हे काळास्वरूप बरोबर आहे. हल्ली तुम्ही बघताच ना की, घटस्फोटाचं प्रमाण किती वाढत चाललंय ते? मग आपण आपल्या पायावर उभं राहायला नको? म्हणजे दिला नवऱ्यानं घटस्फोट तरी आपण कोणावरही ओझं घेऊन राहणार नाही, असं तिचं म्हणणं.

म्हणजे आधी घटस्फोटाचा विचार करायचा मग लग्नाचा, असंच म्हणायचं का?
अमृता, मनोज किंवा अन्य कोणाशीही वाद घालण्याची मला इच्छाच झाली नाही. घालून उपयोगही नव्हता. कारण दोघांच्याही मनात अद्याप सुखाच्या, स्वातंत्र्याच्या संकल्पना पूर्णपणे विकसित झाल्या नव्हत्या. रुजणं तर दूरच. अशा किती तरी अमृता अन् मनोज आज प्रत्यही समोर, आपणास वावरताना दिसत आहेत. सून शोधायची असो की जावई, प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह; व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावानं मुलगे-मुली दोघेही अस्पष्ट, भन्नाट कल्पना घेऊन वावरत आहेत. आई-बाप त्यांना प्रेरणा देत नसले तरी त्यांना थांबवूही शकत नाहीयेत, हे सत्य आहे.

एकीकडे आपल्या शिक्षणाच्या, ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याचा दावा करायचा, अन् दुसरीकडे जोडीदार निवडताना भौतिक सुखांना, रंगरूपाला अवास्तव महत्त्व द्यायचं, जाणते-अजाणतेपणे हा होईना; पण आलेला दैववादीपणा कुठल्या तरी असुरक्षिततेच्या भयातून उद‌्भवलेला, अशा विचित्र कोंडीत आज अनेक अमृता अन्् मनोज सापडले आहेत. कितीदा वाटतं, विवाह, व्यक्तिस्वातंत्र्य, करिअर या साऱ्यांचा विचारपूर्वक समन्वय साधण्याचं कौशल्य मात्र त्यांना अद्याप मिळवता आलेलं नाही किंवा आर्थिक स्वातंत्र्यामुळे झपाट्यानं बदलत चाललेल्या मानसिकतेमुळे त्यांना त्यांची आवश्यकता वाटत नसेल कदाचित. खरं तर संपूर्ण स्वातंत्र्य कोणालाही नको आहे. बदलत्या सामाजिक वातावरणात ते आज पूर्वीपेक्षा बरंच सहजपणानं स्त्रियांच्याच बाबतीत बोलायचं तर मिळू लागलं आहे. निदान पूर्वीसारखं ते ओरबाडून तरी घ्यावं लागत नाहीये. एकीकडे विवाह हवा आहे, मूलही हवं आहे, पण त्यातून येणारी बंधनं मात्र नको आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्याची चटक लागली आहे. घटस्फोटाचे प्रमाणात वाढतेय, यातही शंका नाही. पण मुलांना कौन्सिलिंगची गरज आहे का? विवाहाचं बंधन त्यांना पूर्णत: नको आहे, असं नाही. मग विचार करताना सर्व गोष्टींचा डोळसपणे, मनात कोणतेही बंधन न घालता विचार करायला शिकण्याची, आचार करताना घाई न करण्याची जरुरीच वाटेनाशी झाली आहे का?

विचार आकाशात वावरले तरी आचार अधांतरी राहू शकतात का? त्यांना आधारासाठी भुईचाच म्हणजे समाजाचाच आधार लागतो. अमृता, मनोजने शक्तीप्रमाणे बेधडक चालावं, पण वाळवंटातील वाट चालताना त्रास झाला तरी तो निधड्या छातीनं सहन करण्याचीही तयारी ठेवावी. त्यांच्या कर्तबगारीवर, यश-अपयशावरच समाजाचं, विवाहाचं पावित्र्य, स्थैर्य टिकून राहणार आहे, याचा विसर पडू देऊ नये.पण हे सारं आपलं वाटणं, दुसऱ्यालाही ते तसंच वाटेल, असा आग्रह नाही; पण मनात आलेलं विचारांचं उधाण कागदावर ऊतू जाऊ दिलं नाही, तर चैन पडत नाही ना!
 
आदित्य गावंडे, अचलपूर