आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छापत्राची आवश्यकता जाणीव अधिकारांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुलोचनाकाकूंची आज पंचाहत्तरावी होती. तीन मुलं, मुलगी, जावई, सुना, नातवंडं जमली होती. सर्व आप्तस्वकीय उपस्थित होते. त्यांचं मोठं खानदान होतं. पन्नास एकर जमीन, गुरं, मोठ्ठा वाडा, गडीमाणसं, कृष्णाबाई मदतीला. सुरेशरावांच्या निधनानंतर त्यांनीच सारा कारभार नुसताच सांभाळला नाही तर वाढवला होता. बँकेत बरेच पैसे जमा होते. सुलोचनाबाईंच्या नावावर तीन प्लॉट्स होते. दागिने तर होतेच. त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर माया करणारे बरेच होते. 75 वर्षांच्या झाल्या तरी अजून तरतरीत होत्या. अनेक सामाजिक संस्थांशी संबंध होता आणि वाचन अफाट होते. त्यामुळे आलेला पाहुणा चार गोष्टी शिकूनच जायचा.
आज मात्र त्यांना वाटले, आपल्या पश्चात मुलांमध्ये भांडणे नकोत, रुसवेफुगवे नकोत. या सर्व संपत्तीची वाटणी त्यांना करावयाची होती. मुले आणि मुलगी तशी सधन असल्याने सारा पैसा त्यांच्यातच न वाटता सामाजिक संस्थेला द्यावा असे त्यांच्या मनात होते. त्यासाठी त्यांना इच्छापत्र करायचे होते.
खरे तर मृत्युपत्र या रूढार्थाने माहीत असलेले पत्र हे इच्छापत्र आहे. आपल्या पश्चात आपल्या संपत्तीची विभागणी, वाटप याबद्दलची माहिती आणि कोणती संपत्ती कोणाला देण्यात यावी याबद्दल मृत्युपत्र करणा-या व्यक्तीने आपली इच्छा व्यक्त केलेली असते. जिथे संपत्ती स्थावर अथवा जंगम जास्त तिथे भांडणे जास्त. अनेक वर्षं कोर्टात चालणा-या संपत्तीविषयक केसेसमध्ये तर माणसाचा जन्म निघून जातो पण निकाल हाती येत नाही. म्हणूनच सुलोचनाकाकूंना आपल्याच हाताने सर्व संपत्तीचे वाटप करावयाचे होते. मी इच्छापत्र करणार आहे आणि माझ्या मृत्यूनंतर त्यानुसारच विभागणी व्हावी अशी अपेक्षा काकूंनी बोलून दाखवली आणि माझ्यानंतरही तुम्ही सारे लोक एवढ्याच प्रेमाने एकमेकांशी संबंध ठेवून राहाल, असा आशीर्वाद दिला. इच्छापत्र करण्यासाठी त्यांनी श्यामरावांची, त्यांच्या नात्यातल्या भावाची मदत घेतली होती.
जी व्यक्ती मानसिकरीत्या संतुलित आहे, वयाने अठरा वर्षांच्या वर आहे आणि त्या व्यक्तीच्या नावे स्वत:ची संपत्ती आहे, ती व्यक्ती इच्छापत्र करू शकते. अठरा वर्षांखालील व्यक्तीला इच्छापत्र करता येत नाही. लग्न होण्यापूर्वी केलेलं मृत्युपत्र / इच्छापत्र लग्न झाल्यावर रद्द होते, नवे करावे लागते. ज्या संपत्तीविषयक इच्छापत्र करावयाचे आहे ती संपत्ती स्वअर्जित आणि पूर्ण मालकी असलेली असावयास हवी. स्थावर व जंगम मालमत्ता आणि संपत्ती यांचे इच्छापत्र करता येते. वयाने लहान, मोठे, दूरचे नातेवाईक, ओळखीचे परंतु घरोब्याचे संबंध असलेले यापैकी कोणालाही संपत्तीचा वाटा किंवा पूर्ण संपत्ती देता येते. मनोरुग्ण व्यक्तीसही तिला इच्छापत्राद्वारे संपत्ती देता येते. यासाठी लाभाधिका-यांच्या संमतीची आवश्यकता नसते. इच्छापत्रात फक्त स्वअर्जित संपत्तीचीच विभागणी नाही तर आपल्या अवयवांची विल्हेवाट कशी करावी याविषयीचीसुद्धा नोंद करता येते. स्वत:च्या संपत्तीची वाटणी करताना ती फक्त नातलगात किंवा ओळखीच्या आप्तासच नाही तर एखाद्या संस्थेला, देवस्थानाला वगैरेही दान म्हणून देता येते. परंतु अशा केसेसमध्ये नोंदणी अधिका-यांकडे इच्छापत्र रजिस्टर करणे आवश्यक आहे.
इच्छापत्रात वाटणीची नोंद केल्यानंतर स्वत:ची सही स्पष्ट आणि ठळकपणे करणे आवश्यक आहे तसेच साक्षीदारांनीही त्या व्यक्तीसमोर सही करणे आवश्यक आहे. इच्छापत्राच्या प्रत्येक पानावर सही करणे आवश्यक आहे. त्यात खाडाखोड केलेले काहीही नसावे. साक्षीदार म्हणून अगदी जवळचा नातेवाईक नसावा, जसे पत्नीच्या मृत्युपत्रात पतीची सही नसावी. साक्षीदाराचे वय वर्षे 18पेक्षा जास्त असावे आणि इच्छापत्र करणा-या व्यक्तीपेक्षा वयाने लहान असावा. साक्षीदार सचोटीचा आणि सधन असावा. साक्षीदाराचा मृत्यू, इच्छापत्र करणा-या व्यक्तीच्या आधीच झाला तर, त्यास नवीन इच्छापत्र तयार करावे लागेल. वयाने लहान पण ओळखीची, परिपक्व, विश्वासू, दृढनिश्चयी, समजूतदार व्यक्तीच व्यवस्थापक होऊ शकते.
इच्छापत्र न करताच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप वारसाहक्क कायद्याअंतर्गत येणा-या तरतुदींनुसारच होईल. इच्छापत्राबाबत मात्र बरीच काळजी घ्यावी. इच्छापत्रातील तरतुदींबाबत गुप्तता ठेवणे केव्हाही उचित. मुख्यत्वेकरून त्यात ज्यांना संपत्तीत हिस्सा दिला आहे त्यांना माहिती देऊ नये. इच्छापत्र केले आहे आणि त्यानुसार संपत्तीचे वाटप करावे असे व्यवस्थापकाला सांगून ठेवावे. इच्छापत्र सुरक्षित जागी ठेवावे. इच्छापत्र लिखित स्वरूपात, सुवाच्य अक्षरात, प्रसंगी टंकलिखित असल्यास जास्त चांगले. इच्छापत्र स्टँपपेपरवरच असावे अशी मुळीच अट नाही किंवा इच्छापत्रास स्टँप लावण्याचीसुद्धा आवश्यकता नाही. साध्या कागदावरसुद्धा मृत्युपत्र / इच्छापत्र करता येते.
स्वखुशीने आणि संतुलित मानसिक अवस्थेत असताना मी हे इच्छापत्र लिहिले आहे, असे नमूद असणे आवश्यक आहे. भाषा स्वच्छ, सोपी आणि सुस्पष्ट असावी. तसेच हे मृत्युपत्र / इच्छापत्र माझ्या पश्चात आप्तस्वकीयांमध्ये कुठल्याही प्रकारचा भांडणतंटा होऊ नये यासाठी करीत आहे, असेही लिहिणे आवश्यक आहे.
ज्या व्यक्तींना विभाजनात संपत्तीचा हिस्सा मिळाला आहे त्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे तसेच संपत्तीची तपशीलवार यादी असणेही आवश्यक आहे. मालमत्ता कोणाला किती द्यावी याची नोंद असणे आवश्यक आहे. इच्छापत्र अमलात आणण्यासाठी व्यवस्थापकाची नेमणूक करावी. आपल्या कुटुंबातील आप्त जसे पत्नी आणि मुले यांच्या पालनपोषणाची सोय करावी.
इच्छापत्र केल्यानंतर त्यात काही बदल करावयाचा असल्यास तो करता येतो. बदल मोठा असेल तर दुसरेच इच्छापत्र करावे लागेल. परंतु बदल किरकोळ असेल तर इच्छापत्राला पुरवणी अथवा परिशिष्ट जोडता येते.
श्यामरावांनी सारी माहिती सुलोचनाकाकूंना दिली. काकूंनी त्यांच्या स्वअर्जित तसेच त्यांच्या पती निधनानंतर मिळालेल्या संपत्तीचे वाटप त्यांच्या इच्छेनुसार इच्छापत्रात नोंदविले आणि इच्छापत्र तयार केले आहे, अशी माहिती व्यवस्थापकास म्हणजेच त्यांच्या लहान भावास कळवली.