आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv. Asmita Vaidya Article About Muslim Divorce, Divya Marathi

लियान, जिहार, इला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहित मुस्लिम स्त्रीला मुस्लिम विवाह विच्छेद कायदा, 1939 अंतर्गत अंतर्भूत केलेल्या आधारांवर / कारणांवर घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज करता येतो. या कायद्याच्या कलम 2 अन्वये -
० पतीचा ठावठिकाणा चार वर्षांपासून अथवा जास्त माहीत नसेल तर
० तिचे दोन वर्षे अथवा अधिक काळापासून पालनपोषण करण्यात पतीने हयगय केली असेल तर
० पतीला न्यायालयाने सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा ठोठावली असेल तर
० पतीने वैवाहिक जबाबदारी तीन वा अधिक वर्षांपर्यंत पाळली नसेल तर
० विवाहाच्या वेळी व न्यायालयात अर्ज करेपर्यंत पती नपुंसक असेल तर
० पती दोन वर्षे किंवा अधिक काळापासून मनोरुग्ण असेल तर
० पतीला असह्य कुष्ठरोग, गुप्तरोग झाला असेल तर
० स्त्रीचे ती पंधरा वर्षांची होण्यापूर्वी तिच्या वडिलांनी लग्न लावून दिले आणि 15 वर्षांची झाल्यानंतर आणि सज्ञान होण्यापूर्वी म्हणजेच 18 वर्षांची होण्यापूर्वी तिचे नवर्‍याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि तिला तो विवाह पसंत नसेल तर ती न्यायालयाद्वारे घटस्फोट मागू शकते.

पती तिचा शारीरिक अथवा मानसिक छळ करतो आहे - जसे -
० तिला नेहमीच मारहाण करतो
० वाईट म्हणून ख्याती असलेल्या स्त्रीशी संबंध ठेवतो किंवा त्याची अपकीर्ती झाली आहे.
० पत्नीने अनैतिक आयुष्य जगावे असा प्रयत्न करतो.
० तिच्या मालमत्तेची विल्हेवाट लावतो किंवा तिला मालमत्तेचा उपभोग घेण्यास आडकाठी आणतो.
० तिला तिच्या मर्जीनुसार धर्माचरण करण्यास अडथळा आणतो.
० त्याला एकापेक्षा जास्त बायका असून कुराणाच्या आदेशाप्रमाणे तो सगळ्यांना सारखी व न्यायाप्रमाणे वागणूक देत नाही.
० त्याने मुस्लिम धर्म बदलला म्हणून यापैकी कोणत्याही कारणाने पत्नी घटस्फोट मागू शकते.

याशिवाय मुस्लिम रीतिरिवाजानुसार काही कारणांच्या आधारावर प्रकियेने मुस्लिम पत्नीला तलाक घेता येऊ शकतो. पतीने जर पत्नीवर ती व्यभिचारी आहे, असा आरोप केला आणि पतीने आपल्यावर खोटा आरोप केला आहे, म्हणून तिने न्यायालयात अर्ज करून आपल्याला घटस्फोट मिळावा, अशी विनंती केली आणि आरोप खोटा ठरल्यास तिला न्यायालयातर्फे घटस्फोट मिळू शकतो. यास ‘लियान’ असे म्हणतात. तसेच पती पत्नीची तुलना आई, बहीण किंवा इतर नात्याच्या स्त्रीशी- जिच्याबरोबर तो लग्न करू शकत नाही अशांबरोबर करतो - अशा परिस्थितीत पत्नीला पतीशी वैवाहिक संबंध नाकारण्याचे अधिकार आहेत. पती जोपर्यंत प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत ती असा संबंध नाकारू शकते आणि त्याने प्रायश्चित्त घेण्यास नाकारले तर पत्नीला या कारणावर कायद्याने घटस्फोट मागता येतो. पतीला प्रायश्चित्त एका गुलामाची मुक्तता करून किंवा गरिबाला पोसून किंवा दोन महिने उपवास ठेवून करता येते. पतीने प्रायश्चित्त केले नाही तर पत्नीला घटस्फोट मागता येतो. या प्रकाराने घटस्फोट मागितला तर त्यास ‘जिहार’ असे म्हणतात.

याशिवाय पतीने सतत चार महिन्यांपर्यंत पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवले नाहीत आणि आपल्या कृतीतून पुढेही ठेवणार नाही, असे सूचित केले; तर त्या आधारावर पत्नी न्यायालयाद्वारे घटस्फोट मागू शकते. यास ‘इला’ असे म्हणतात.

पत्नीने कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार घटस्फोट घेतला, या कारणाने मुस्लिम पत्नीच्या मेहेरबद्दलच्या हक्कांवर काहीही परिणाम होणार नाही. मेहेरबाबतचा तिचा अधिकार अबाधित राहील. 1986मध्ये शाहबानो खटल्यानंतर मुस्लिम स्त्री (घटस्फोट हक्क संरक्षण) कायदा पारित करण्यात आला. मुस्लिम स्त्रीला घटस्फोट झाल्यानंतर कोणकोणते हक्क असावेत, याबद्दल हा कायदा सांगतो. विवाहानंतर पतीने पत्नीला घटस्फोट दिला किंवा तिने घटस्फोट घेतला, तरच हा कायदा लागू होतो. पती-पत्नी नुसतेच वेगळे राहत असतील तर हा कायदा लागू होत नाही. मुस्लीम स्त्री (घटस्फोट हक्क संरक्षण) कायदा 1986 मुख्यत्वेकरून मुस्लिम पद्धतीने विवाह आणि घटस्फोट/ तलाक झाल्यावर पालनपोषणाबद्दल आणि मालमत्तेच्या हक्कांबद्दल पत्नीचे अधिकार कोणते, ते सांगतो. या कायद्यानुसार, तलाक झाल्यानंतर मेहेर आणि मुस्लिम पत्नीच्या हक्काची इतर सर्व मालमत्ता तिच्याच हक्काची असून तिला तलाकच्या वेळेस मिळाली पाहिजे, इद्दतच्या काळात तिच्या पतीने तिच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी, तलाकच्या आधी किंवा नंतर झालेल्या अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारीही ते अपत्य दोन वर्षांचे होईपर्यंत पतीचीच राहील, मेहेरची रक्कम आणि पालनपोषणाची जबाबदारी तलाकनंतर पतीने निभावली नाही तर पत्नी स्वत: किंवा तिचे रक्ताचे नातेवाईक या हक्कांची मागणी प्रथम वर्ग न्यायाधीश दंडाधिकार्‍याकडे अर्ज करून मागू शकतील, इत्यादी अधिकार मुस्लिम पत्नीला दिले आहेत. असा अर्ज मिळाल्यानंतर न्यायालयाला, पती स्वत:ची जबाबदारी नीटपणे पार पाडत नसेल किंवा तिला मेहेरची रक्कम देत नसेल, याची खात्री झाल्यास एक महिन्याच्या आत अशा घटस्फोटित मुस्लिम स्त्रीला तिच्या पतीने मेहेरची योग्य रक्कम वा दरमहा पालनपोषणासाठी एक रक्कम द्यावी, असा आदेश संबंधित न्यायालय देऊ शकते. तसेच आदेशाचे पालन प्रतिवाद्याने वेळेच्या आत न केल्यास त्यांच्या विरुद्ध अटकेचे वॉरंट काढून एक वर्षापर्यंतची कैद न्यायालय करू शकते.

मुस्लिम कायद्यानुसार घटस्फोट/ तलाकनंतर पत्नीला इद्दत काळ पाळणे आवश्यक आहे. या इद्दत काळात तिच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या पतीची असते; पण त्यानंतर तिच्या पालनपोषणाचे काय, हा मोठा प्रश्नच होता. 1986च्या कायद्याने हा प्रश्न सोडवला. त्या अनुसार न्यायालयाला जर अशी खात्री पटली की, घटस्फोटित मुस्लिम स्त्रीने पुनर्विवाह केला नाही आणि ती स्वत:चे उदरभरण करू शकत नाही, तर न्यायालय तिच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेवर ज्यांचे हक्क असतील अशा नातेवाइकांना ती हयात असेपर्यंत तिच्या आवश्यक गरजेच्या पूर्ततेबद्दल आदेश देऊ शकते. तिला मुले असतील तर त्यांना असे आदेश मिळतील आणि मुले नसल्यास तिच्या आईवडील/ पालक यांना तिचे पालनपोषण करावे लागेल. यापैकी कुणीच तिच्या पालनपोषणासाठी समर्थ नसतील तर तिचे इतर जवळचे नातेवाईक जबाबदार असतील आणि कोणीच नसेल तर ती राहत असेल त्या भागातील वक्फ बोर्डाला तिच्या जबाबदारीचे आदेश न्यायालय देऊ शकते.

याशिवाय फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अनुसार खटला चालवण्याची मागणी पती व पत्नीने शपथपत्राद्वारे केली, तर पत्नीला या कलमानुसार न्यायालयाच्या आदेशाने पालनपोषण मिळू शकेल.

मुस्लिम कायद्यानुसार एकूण सर्वच तरतुदी बघितल्यास त्या पुरुषवर्चस्व सूचित करतात. त्यात पुन्हा मुस्लिम पुरुष चार स्त्रियांशी विवाह करू शकतो. अशा वेळेस चारपैकी एका पत्नीस तलाक घ्यायचा असल्यास ती मुस्लिम कायद्यानुसार आणि 1939च्या मुस्लिम विवाह विच्छेद कायद्याच्या तरतुदींनुसारच तलाक घेऊ शकते. सुस्वरूप असणार्‍या शबानाला राहून राहून वाटत होते, की मी एवढी शिकलेली, नोकरी करणारी, स्वत:च्या पायावर उभी राहून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडणारी; मग का नावेदच्या वडिलांनी आपल्याला नाकारलं? का त्याला दुसरीशी संसार मांडावासा वाटला? यात आपला अपमान नाही काय?
तिने विचारांती ‘तलाक’ द्यायचा निर्णय घेतला.

nbtlawcollege.@rediffmail