आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv. Asmita Vaidya Article About Motor Accidents Claims Act

अपघात झाला तर?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 10 वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या अफाट झाली आहे. प्रत्येक घरात एकापेक्षा अधिक वाहने आहेत. काही कुटुंबांमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एक वाहन असते. दुचाकी वाहन चालविणे ही तरुणांचीच मक्तेदारी आहे अशा पद्धतीने तरुणवर्ग बाइक्स हाकत असतो. याखेरीज नवनवीन डिझाइन्सच्या आणि सुविधाजनक बाइक्स बाजारात उपलब्ध आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे रस्त्यांवर वाहनांची संख्या अतिशय वाढली आहे आणि त्याचबरोबर अपघातांची संख्याही.

रस्त्यांवरील वाहतूक तंत्रामध्ये झालेले बदल, प्रवाशांचे स्वरूप, मालाची ने-आण, देशातील रस्त्यांच्या जाळ्यांचा विकास आणि विशेषत: मोटार वाहन व्यवस्थापन तंत्रामध्ये झालेली सुधारणा या सर्व गोष्टींमुळे मोटर वाहन कायदा, 1988 मंजूर करण्यात आला. या कायद्याआधी मोटर वाहन कायदा 1939 अस्तित्वात होता. नव्या कायद्याची अंमलबजावणी 14 ऑक्टोबर 1989 रोजी सुरू झाली.

मोटार अपघातात एखादी व्यक्ती मरण पावते किंवा तिला कायमस्वरूपी अपंगत्व येते. जेथे अशा व्यक्तीची कोणती चूक अपघातास कारण ठरली असल्याबाबत पुरावा नसतो अशा बाबतीत द्यावयाच्या भरपाईच्या रकमेची मर्यादा वाढविण्यासाठी आणि तसेच धडक देऊन निघून जाणार्‍या वाहनांच्या बाबतीत अपघात संबंधित असणार्‍या वाहनाच्या प्रकारानुसार भरपाई देण्यासंबंधीच्या विमा कंपन्यांच्या जबाबदारीमध्ये असणारी विसंगती दूर करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने एम.के. कुन्ही मोहंमद विरुद्ध पी.ए. अहमद कुट्टी (अकफ 1982 रउ 2158) यामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा समावेश या विधेयकात करण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा, 1988मध्ये मोटार वाहने व त्यापासून होणारे अपघात, त्यासंबंधीचे नियम व इतर तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. अपघातांची वाढती संख्या आणि त्या कारणाने जखमी अथवा मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना नुकसानभरपाई लवकर मिळावी यासाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरण या विशेष न्यायालयाची राज्य सरकारने स्थापना केलेली आहे.

मोटार वाहन कायदा 1988 कलम 165 अनुसार, मोटार वाहन अपघात न्याय प्राधिकरणामध्ये राज्य सरकारला योग्य वाटेल तितक्या सभासदांची नेमणूक केली जाते. आणि त्यांच्यापैकी एकाची न्यायाधिकरणाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते.

मोटार वाहन अपघात न्याय प्राधिकरणामध्ये -
- उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे किंवा होता,
- जिल्हा न्यायाधीश आहे किंवा होता,
- उच्च न्यायालयाचा न्यायाधीश / जिल्हा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठीची त्या व्यक्तीकडे पात्रता आहे अशा व्यक्तीची नेमणूक करता येते.

या कायद्याच्या कलम 166नुसार मोटार अपघात नुकसानभरपाई मिळण्यासाठीचा दावा / अर्ज मोटार अपघात न्याय प्राधिकरणात करता येतो. अर्ज, [अ] अपघातात जखमी झालेली व्यक्ती किंवा [ब] एखाद्या मालमत्तेचे मोटार अपघातामुळे नुकसान झाले असेल तर त्या मालमत्तेचा मालक किंवा [क] अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा कायदेशीर वारस किंवा [ड] अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने नेमलेला प्रतिनिधी, यांना करता येतो. तसेच मृत व्यक्तीचे सर्व कायदेशीर प्रतिनिधी अशा भरपाईच्या अर्जामध्ये सामील झालेले नसतील तर मृत व्यक्तीच्या सर्व कायदेशीर प्रतिनिधींच्या वतीने किंवा त्यांच्या फायद्यासाठी अर्ज करता येतो. सामील नसलेल्या कायदेशीर प्रतिनिधींचा समावेश अर्जाचे प्रतिवादी म्हणून करता येतो.

प्रत्येक भरपाई मिळण्यासाठीचा अर्ज, जेथे अपघात घडला त्या क्षेत्रावर अधिकार असलेल्या दावा न्यायाधिकरणाकडे किंवा दावा सांगणारा ज्याच्या अधिकारक्षेत्राच्या स्थानिक सीमांमध्ये राहत असेल किंवा कामधंदा करत असेल, त्या दावा न्यायाधिकरणाकडे किंवा प्रतिवादी राहत असतील त्या विभागातील कार्यक्षेत्रामधील मोटार वाहन अपघात प्राधिकरणाकडे, कायद्याने दिलेल्या नमुन्यात व आवश्यक तपशिलात केला पाहिजे. परंतु अशा अर्जामध्ये कलम 140 खालील भरपाईसाठी कोणताही दावा सांगितलेला नसल्यास तशा अर्थाचे एक स्वतंत्र निवेदन त्या अर्जामध्ये अर्जदाराच्या सहीच्या अगदी अगोदरच करण्यात येईल. म्हणजेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 166अनुसार जो अर्ज केला जातो त्यासोबत याच कायद्याच्या कलम 140चा अर्जसुद्धा अर्जदाराच्या सहीने करता येतो. कलम 140नुसार, चूक नसताना नुकसानभरपाई देण्याच्या जबाबदारीबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 166नुसार अर्ज करताना मोटार वाहनाचा ज्या विमा कंपनीने विमा केला आहे त्या विमा कंपनीला गैरअर्जदार / प्रतिवादी केले जाते. यामध्ये संबंधित मोटार वाहनाच्या चालकाने जर आपले वाहन वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अपघात केला असेल तर अशा परिस्थितीत अर्जदारांना दोन्ही बाजूंच्या वतीने पुरावा झाल्यावर गैरअर्जदारांकडून नुकसान भरपाई देण्यात येते. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काय आवश्यक असते ते पुढच्या भागात पाहू.(क्रमश:)

nbtlawcollege@rediffmail.com