आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Adv. Asmita Vaidya Article About Compensation For Workers Act

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगार नुकसान भरपाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका नामांकित कंपनीत स्नेहाला नोकरी लागली. दहावीनंतर स्नेहाने डिप्लोमा इन आॅटोमोबाइल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तीन वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करून तिला अपेक्षित असलेल्या कंपनीत नोकरी मिळाली. घरची परिस्थिती यथातथाच! त्यामुळे चार आकडी पगाराचे अप्रूप होते. मेकॅनिक म्हणून काम करताना तिच्या धाडसाचे सारेच कौतुक करीत. वेळेत येणे, कामात चोख आणि तत्पर यामुळे ती नोकरीत कायम झाली. बघता बघता नोकरीला पाच वर्षे झाली. एके दिवशी काम करता करता काही कळायच्या आत मशीन टेस्ट करताना तिच्या हाताला जोरदार झटका लागला, उजव्या हाताची तीन बोटे मशीनमधे अडकली आणि एका क्षणात हाताच्या तळव्यापासून तुटून दूर पडली. साराच आक्रोश. रडून रडून स्नेहा थकून गेली. डॉक्टरांकडे उपचारार्थ दाखल झाली. उजव्या हाताची तीन बोटे नसल्याने काम करणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आणि नोकरीवरच गदा येते की काय, असा प्रसंग निर्माण झाला.
कामगारांसाठी नुकसान भरपाई कायदा 1923 या कायद्याचा आधार तिने घ्यावयाचे ठरविले. कंपनीत, रेल्वेत, जहाजावर, बांधकाम किंवा तत्सम ठिकाणी काम करीत असताना अपघात झाल्यास आणि कामगारास कोणत्याही प्रकारची इजा पोहोचल्यास संबंधित कामगाराला योग्य ती नुकसान भरपाई मालकाकडून मिळू शकते. या कायद्याच्या महत्त्वाच्या कलमांमध्ये सांगितल्यानुसार कामगारांना नुकसान भरपाई तेव्हाच मिळेल, जेव्हा त्याला झालेली दुखापत किंवा अपघात कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या वेळात, काम करीत असताना झालेला आहे. मालकाकडून नुकसान भरपाई झालेल्या नुकसानाच्या बरोबरीत असणे आवश्यक आहे. ज्या दुखापतीमुळे मृत्यू येतो, कायमचे पूर्णपणे अपंगत्व येते, कायमचे अंशत: अपंगत्व येते, काही काळ अंशत: किंवा पूर्ण अपंगत्व येते अशा दुखापतींसाठी नुकसान भरपाईची वेगवेगळी प्रमाणे ठरवून देण्यात आली आहे. कामगाराला अपघातामुळे झालेल्या दुखापतीबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी दोन अटी पूर्ण असावयास हव्यात. एक म्हणजे अपघात कामगार कामावर असताना झालेला असला पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे त्या अपघाताचा त्याचा नोकरीशी संबंध असला पाहिजे. आणि एवढेच नाही तर नोकरीमध्ये असल्यामुळे, जे काम करण्यासाठी कामगाराला ठेवले आहे ते काम करत असताना किंवा त्यासाठीचे काम करताना अपघात झाला तर नुकसान भरपाई मिळते. थोडक्यात म्हणजे अपघात आणि काम यांचा संबंध असलाच पाहिजे.

नुकसान भरपाईची रक्कम कामगाराला मिळणार्‍या पगारावरून निश्चित केली जाते. या कायद्याच्या कलम 4(1)(अ)(ब)(क) आणि (ड) यामध्ये नुकसान भरपाई किती द्यायची आणि त्याचा हिशोब कसा करावयाचा याबद्दलची पद्धत दिली आहे. अपघातात कामगारास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, अपघातात मृत्यू झाल्यास, तात्पुरते वा अंशत: अपंगत्व आल्यास किंवा तात्पुरते पूर्ण अपंगत्व आल्यास मालकाला या कायद्याच्या तरतुदींनुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल. दुखापत झाल्यापासून एक महिन्यात नुकसान भरपाई द्यावी लागले. अन्यथा मालकाला नुकसान भरपाईच्या रकमेवर 12 टक्के दराने सरळ व्याज द्यावे लागेल. मालकाला नुकसान भरपाईची रक्कम नेहमी नुकसान भरपाई आयुक्तामार्फतच द्यावी लागते. तसेच नुकसान भरपाईची रक्कम जर स्त्री कामगार किंवा अज्ञान कामगाराला मिळणार असेल तर नुकसान भरपाई आयुक्ताने ती रक्कम त्यांना फायदा होईल अशा ठिकाणी गुंतवावी. या कायद्याअंतर्गत येणार्‍या सर्वच तक्रारी नुकसान भरपाई आयुक्ताकडेच कराव्या लागतात. कामगाराचे वय, मासिक वेतन, अपघातामुळे झालेली शारीरिक हानी आणि इजा, कामगाराचा सेवाकाल या सर्व बाबींचा विचार करूनच नुकसान भरपाईची रक्कम ठरविली जाते. अपघाताव्यतिरिक्त कामाच्या स्वरूपामुळे कामगाराला आजार झाल्यास(occupational disease) या कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई मिळते. भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी कसा हिशेब करावयाचा यासाठीच्या तरतुदीसुद्धा या कायद्याअंतर्गत आहेत. या कायद्यात मिळणार्‍या नुकसान भरपाईची मागणी करण्याची पद्धत थोडक्यात दिलेली आहे. या कायद्याखाली मिळणार्‍या नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी कामगार नुकसान भरपाई आयुक्तांकडे ठरावीक नमुन्यात अर्ज केला पाहिजे. असा अर्ज करण्यापूर्वी कामगाराने मालकाला अपघाताची नोटीस दिली पाहिजे आणि त्यामध्ये अपघाताचा तपशील दिला पाहिजे. मालमत्ता हवी असल्यास कामगाराने वैद्यकीय तपासणीसाठी हजर झाले पाहिजे. हे सर्व त्याने अर्ज करण्यापूर्वी केले पाहिजे. अर्ज अपघात झाल्यापासून दोन वर्षांच्या आत किंवा मृत्यू झाल्यापासून दोन वर्षांच्या आत करावयास हवा. अर्जाचा निर्णय करण्यासाठी आयुक्तांना या प्रकरणात ज्या कोणा व्यक्तीला विशेष माहिती असेल, त्या व्यक्तीची मदत घेता येईल. या कायद्याखाली ज्या कोणा व्यक्तीने रक्कम द्यायची असेल तिच्याकडून आयुक्तांना जमीन महसुलाच्या बाकीप्रमाणे वसूल करता येते.
nbtlawcollege@rediffmail.com