आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv. Asmita Vaidya's Article About Pregnancy Leaves Law For Women Employees

प्रसूतीपश्चात कायदेशीर सवलती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसूती काळातल्या दिवसांचा पगार मिळणं हा नोकरी करणा-या महिलांचा अिधकार आहे. याव्यतिरिक्त प्रसूतीच्या रजेवर जाणा-या महिलांच्या अिधकारासंदर्भात जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख

परवा सीमाकडे सहजच बसायला गेले होते. दुपारी २ वाजता मला दारात बघून तिला आश्चर्यच वाटले. ती म्हणाली, ‘अगं रागिणी तू! मला वाटलं, वंदनाच आली. जवळच ऑफिस असल्याने दुपारी जेवायला येते ती. आणि सध्या पहिल्या बाळंतपणाला म्हणून माहेरी आलीय ती!’
‘अगं, पण सुटी नाही का घेतली तिने?’ माझा प्रश्न.
नाही ना. तिच्या बॉसने अजून तरी सुटी द्यायला नकार दिलाय. आणि या कॉम्पिटिशनच्या काळात तर तिला तिचे काम पूर्ण करायचे आहे
तेही बाळंतपणाच्या आधी! नाही तर नोकरीवरचा क्लेम जाईल, असं म्हणत होती ती.’
‘अगं पण सुट्या...’
‘हो ना! मी पण तिला म्हटलं, की नको बाई तडतड करत जाऊ या दिवसांत, जप जरा; पण तिचे आपले एकच, सुट्या नाही मिळत.’
‘अगं सीमा, कायद्याने तिला बाळंतपणासाठी सुटी घेण्याचा अधिकार दिला आहे. या वेळी नोकरीचा कुठे विचार करतेस?’
‘पण वंदना म्हणते, की नोकरी पक्की होण्यासाठी तरी तिला कामावर जावेच लागेल.’
‘काही तरीच काय बोलतेस...’ मी तिला जरा रागातच बोलले.
कायद्याने नोकरी करणा-या महिलांना सुलभ प्रसूती कायदा १९६१ अंतर्गत, बाळंतपण व्यवस्थित व्हावे आणि त्या अनुषंगाने इतर लाभांसाठी तरतुदी केल्या आहेत. आता विषय निघालाय म्हणून सुलभ प्रसूती कायदा (Maternity Benefit Act 1961) मधल्या तरतुदींबद्दल सविस्तर सांगते. मी सांगू लागले-

हा कायदा मुख्यत्वेकरून नोकरी करणा-या वा कामावर जाणा-या महिलांसाठी केला आहे. सर्व कारखाने, बागकाम, खाणी, घोडेस्वारी वा डोंबा-याचा खेळ किंवा सर्कस किंवा इतर कोणतेही कार्यालय जिथे स्त्रिया काम करतात, अशा सर्व सरकारी किंवा खासगी कार्यालये तसेच अशी सर्व दुकाने जिथे दहापेक्षा जास्त व्यक्ती नोकरी करतात, त्यांना हा कायदा लागू होतो. एवढंच नाही तर अस्थायी स्वरूपी वा रोजाने काम करणा-या स्त्रियांनासुद्धा हा कायदा लागू होतो.

नोकरी करणा-या स्त्रियांना बाळंतपण होण्याच्या अगोदर व नंतर असे एकंदरीत १२ आठवडे पूर्ण पगारी सुटी तर मिळतेच आणि त्याव्यतिरिक्त तिला सरासरी प्रतिदिन वेतनाएवढी अतिरिक्त रक्कमसुद्धा मातृत्व लाभ म्हणून मिळते. तिला तिच्या अपेक्षित प्रसूती काळाच्या पूर्वी जास्तीत जास्त सहा आठवडे आणि प्रसूतीनंतर सहा आठवडे अशी एकूण १२ आठवडे सुटी मिळते आणि आता तर सुटी जवळपास २४ आठवड्यांपर्यंतसुद्धा मिळू शकते. आणि म्हणूनच प्रसूतीच्या काळात म्हणजेच सहा आठवडे प्रसूतीनंतर नोकरीस बोलावून काम करून घेणे कायद्याने प्रतिबंधित आहे.
याशिवाय गर्भवती स्त्रीला कुठल्याही प्रकारचे जड काम किंवा कठीण काम अधिकारी किंवा मालकाने सांगू नये, ज्यामुळे तिला किंवा तिच्या बाळाला हानी पोहोचेल.
प्रसूतीनंतर स्त्री कामावर आल्यानंतर बालक १५ महिन्यांचे होईस्तोवर दिवसाच्या कामात बालकाला दूध पाजणे व त्याची काळजी घेण्यासाठी संबंधित कामगार स्त्रीला दोन वेळेस मध्यंतर मिळतील, हे दोन मध्यंतर नेहमीच्या कामकाजातील मध्यंतराव्यतिरिक्त असतील. मध्यंतर जवळपास १५ ते २० मिनिटांचे असेल.
आणि मुख्य म्हणजे, ती प्रसूती कारणाने कामावर येत नसेल आणि बाळंतपणासाठी सुटीवर असेल तर तिच्या पगारात कपात करता येत नाही. तसेच त्या स्त्रीला बडतर्फ करता येणार नाही किंवा नोकरीवरून काढता येणार नाही. समजा, मालकाने अथवा अधिका-याने असे केल्यास त्याला तीन महिने ते एक वर्षापर्यंत दोन हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल.
‘अगं बाई, एवढे सारे कायद्याचे संरक्षण असताना माझी पोर नोकरी टिकावी यासाठी तडतड करतेय. आता ती जेवायला आली ना की सारे समजावून सांगते. फार बरं झालं रागिणी, तू सुलभ प्रसूती कायद्याअंतर्गत येणा-या तरतुदींबद्दल मला माहिती दिलीस. बरं, आता छान चहा घेऊन जा हं...’ सीमा म्हणाली. सीमाच्या हातचा चहा घेऊन मी निघाले.
nbtlawcollege@rediffmail.com