आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv Asmita Vaidya Article About Food Adulteration

अन्नात भेसळ ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुषमा नुसती गोंधळली होती. सुटीत राहायला आलेल्या भाचरांना मोठ्या कौतुकाने तिने ‘बंबईया चौपाटी’वर नेले होते. त्यामुळे सारेच खूश होते. मेन्यू फारच मोठा होता. ज्याला जे हवे ते मागवायचे ठरले. कोणी पावभाजी, मसाला डोसा, छोले भटोरे, पुलाव, सांबार वडा, इडली सांबार, पिझ्झा, बर्गर वगैरे वगैरे. शेवटी सा-यांनीच थंडगार पेय घेतले आणि घरी निघाले. अचानक एका भाचीला मळमळायला लागले आणि तिने पोटात कसंतरी होत असल्याची तक्रार केली. दोनच मिनिटांनी तिला रस्त्यावरच वांती झाली. एकामागून एक सा-याच मुलांच्या या तक्रारी सुरू झाल्या आणि तिलाही अपचन झाल्यासारखे वाटले. त्यामुळे ती गोंधळली. तिने लगेचच फॅमिली डॉक्टर देशमुख यांना फोन केला आणि घरी यावयास सांगितले.
सगळ्या मुलांना झोपवले. मुलांच्या उलट्या आणि जुलाब चालूच होते. तिने साखर-मीठ पाणी तयार केले आणि प्रत्येकाला देत होती. नक्कीच अन्नात गडबड होती. तिला काळजी लागली होती. तेवढ्यात डॉ. देशमुख आल्या. मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगून त्यांनी औषधे दिली. सुषमा स्वत:लाच दोष देत होती. डॉ. देशमुखांनी सांगितले, बाहेरचे खाणे म्हणजे हल्ली रिस्कच झाली आहे. कशात काय मिसळून भेसळ केली असेल याचा नेमच नाही. खरंय त्यांचं. तिखटात विटांचा भुरका, लाकडाचा भुरका, सरबतात रंग, तेलात, तुपात, खव्यात, दुधात, सॉस, जेली, लोणची यांत भेसळ. आता तर कुठलाही बाहेरचा पदार्थ विकत घेतला तर प्रथम त्या पदार्थाबद्दल भेसळीच्या शंकेने घ्यावे का नको, असे वाटते आणि विकत घ्यायची भीतीच वाटते.

अन्न सुरक्षितता आणि मानक कायदा 2006मध्ये मंजूर करण्यात आला. या आधी अन्न भेसळ संबंधित सर्व कायद्यांना निरस्त करून 2006मध्ये अन्न सुरक्षितता आणि मानक कायदा तयार करण्यात आला. या कायद्याद्वारे अन्न सुरक्षितता आणि मानक अधिकार कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयाद्वारे अन्नपदार्थांचे वैज्ञनिक परिमाणांवर आधारित निर्माण, साठवण, वाटप, विक्री आणि आवक यांविषयीचे नियमन केले जाते, तसेच माणसाला खाण्यासाठी कुठलाही अन्नपदार्थ कसा सुरक्षित असेल, याविषयी खात्री करून देण्याचे काम केले जाते. अन्न सुरक्षितता आणि मानक अधिकार कार्यालयाची स्थापना दिल्ली येथे करून सर्व राज्यांत अन्न सुरक्षितता आणि मानक कार्यालयाची स्थापना केली जाते. या कार्यालयात एक अध्यक्ष आणि 22 सदस्य काम बघतात. यात कृषी, वाणिज्य, ग्राहकांविषयीचे, अन्न प्रक्रिया, आरोग्य, विधान कार्य, लघु उद्योग या मंत्रालयातील प्रतिनिधी, तसेच अन्न वैज्ञानिकी किंवा तंत्रज्ञानी, शेतकरी आणि उद्योजक व्यापारी यांचेही प्रतिनिधी असतात. या अधिकार कार्यालयाची कामे म्हणजे सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांची मानके तयार करणे व तसे सूचित करणे, कुठलाही अन्नपदार्थ केव्हापर्यंत वापरता येईल, तसेच त्यानंतर वापरल्यास त्याचे दुष्परिणाम याबद्दलची माहिती देणे, भारत सरकारला कुठल्याही अन्नपदार्थाबाबतची सखोल माहिती देऊन त्याचा विपरीत परिणाम होत असल्यास तसे कळविणे. या व्यतिरिक्त सर्वसामान्यांपर्यंत अन्न भेसळ आणि अन्न वापराबद्दलची माहिती पोहोचवणे, भारतभर लोक, ग्राहक, पंचायत यांचे जाळे तयार करून अन्न सुरक्षितता तसेच त्या संदर्भात इतर बाबींवर जागरुकता निर्माण करणे.
या कायद्याअंतर्गत कुठल्याही पदार्थामध्ये अनैसर्गिक प्रक्रिया करून त्यास विक्रीस उपलब्ध करता येत नाही. दूषित पदार्थ, नैसर्गिक विषाणू तयार होणारे पदार्थ अथवा धातूमिश्रित पदार्थ विक्रीस उपलब्ध नसावेत आणि कुठल्याही पदार्थात प्राण्यांसाठीच्या औषधांचा, कीटकनाशकांचा, जंतुनाशकाचा वापर करता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही व्यक्तीस जननशास्त्राने बदल केलेले (जेनेटिकली मॉडिफाईड) अन्ननिर्मिती करण्यास प्रतिबंध आहे. खाण्यासाठी तयार अन्नपदार्थांचे आवरण व त्यावरील सूचना या कायद्यात सांगितल्याप्रमाणेच असणे आवश्यक आहे. अन्न भेसळ रोखण्याच्या उद्देशाने अन्न व्यापार करणा-यांवर (Food business operator) काही जबाबदा-या टाकल्या आहेत. जसे जो पदार्थ ग्रहण करण्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही, ब्रँडेड नाही, ज्या पदार्थांच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे त्या पदार्थांचा परवाना घेतलेला नाही, अशा अन्नपदार्थांचे निर्माण, साठवण, वितरण व विक्री कोणीही करू शकत नाही.

या कायद्याअंतर्गत राज्य सरकार अन्न सुरक्षितता आयुक्त नियुक्त करते. भेसळयुक्त पदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण आणि विकी प्रतिबंधित करणे, कायद्यानुसार परिमाणानुसार अन्नपदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण व विक्री होते आहे अथवा नाही याची सर्वेक्षण करणे, अन्न भेसळ प्रतिबंधाबाबतची जागरुकता शिबिरे घेणे, अन्न सुरक्षितता आणि त्याबद्दलची मानके याबद्दल माहिती देणे ही कामे आयुक्तांना करावयाची आहेत.
nbtlawcollege@rediffmail.com