आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाक तलाक तलाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शबाना एक हुशार मुलगी. सोशल वर्कमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर पीएचडी करायचं, या ध्यासानं घेरलेली! तिच्या पहिल्या मुलाला नावेदला मुद्दाम दाखवायला म्हणून आलेली! ताजेपणाचा टवटवीतपणा, उत्साहाने बहरणारी शबाना. त्या दिवशी मला भेटायला आली खरी; पण चेहर्‍यावरचं तेज पूर्ण गेलेली, डोळ्यातील भाव बदललेले. मला तर धस्सच झालं. काय झालं असेल हिला? ‘शबाना... कशी आहेस?’ मी विचारले.

उसनं हसू तिने चेहर्‍यावर आणलं. ओठ कमीत कमी विस्तारत मंद स्मित केलं आणि नुसते मानेनेच ‘मी ठीक आहे’ असं सुचवलं. पण माझ्या लक्षात आलं होतं, हिचं काही तरी बिनसलंय ते. मी पण जास्त खोलात न शिरता संशोधन विषयावर चर्चा केली. तिचा मूड चांगला व्हावा, या उद्देशाने कॉफी ऑफर केली.

‘काय म्हणतं तुझं बाळ? आता चालू लागलं असेल दुडूदुडू....’ विषयांतर करण्याच्या इराद्याने मी म्हटले; पण शबाना काही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हती. शेवटी न राहवून मी तिला पाठीवरनं हात फिरवून विचारलंच, ‘काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का?’

तिला रडू आवरेना. माझा हात पकडून रडू लागली. थोडी शांत झाल्यावर म्हणाली, ‘मॅडम, नावेदच्या वडिलांनी दुसरा निकाह केलाय. माझ्यासोबत आता ‘ती’सुद्धा राहायला आलीय. वयाने 18चीच आहे. गरीब घरची आहे. दिसायला बरी आहे; पण त्यामुळे माझं मन संसारात रमेनासं झालंय. खूप चिडचिड होते. आपल्यावर अन्याय झालाय, अशी भावना मनात घर करून आहे. काय करू, काही उमजेनासं झालंय.’

‘अगं, पण असं अचानक कसं काय त्याने दुसरं लग्न केलं?’ मी विचारले. ‘काय सांगू मॅडम! मी नावेदच्या जन्मानंतर त्याच्यामध्ये बिझी झाले. त्यात माझा जॉब, अभ्यास... कदाचित यामुळेच नावेदच्या वडिलांच्या मनात दुसरं लग्न करायचं चाललंय, हे माझ्या लक्षातही आलं नाही. आणि जेव्हा आलं तेव्हा बराच उशीर झाला होता. आता तर त्या घरातही मला राहावंसं वाटत नाही. वाटतं... वाटतं, तलाक घ्यावा. नावेदला घेऊन एकटं राहावं.’ शबाना हमसाहमशी रडू लागली.

मी तिला शांत केलं. पाण्याचा ग्लास समोर केला. पाणी प्याल्यावर ती म्हणाली, ‘खरंच मॅडम, मी घटस्फोट घेऊ शकेन का?’
मुस्लिम कायद्यानुसार विवाह एक साधा करार आहे. त्यामुळे करार संपुष्टात आल्यावर विवाहसुद्धा संपुष्टात येतो. कुराणानुसार घटस्फोट देण्याचा, तलाक देण्याचा अधिकार फक्त मुस्लिम पुरुषांनाच आहे. तो कोणत्याही कारणाशिवाय तसेच न्यायालयात न जाता देता येतो. मुस्लिम कायद्यानुसार तलाक हा नवर्‍याचा अनिर्बंध हक्क असतो. तलाक याचा अर्थ लग्नबंधनातून मुक्त करणे. मुस्लिम महिलांना तलाक मागता येतो, पण तलाक देण्याची प्रक्रिया मात्र पुरुषालाच करावी लागते. मुस्लिम स्त्रीला तलाक हवा असल्यास तिला न्यायालयात धाव घ्यावी लागते. मात्र, मुस्लिम नवर्‍यांना तशी आवश्यकता नाही. नवरा केव्हाही, कुठेही, कधीही, कारण असो वा नसो; पत्नीच्या पश्चात तलाक देऊ शकतो. सुन्नी कायद्यानुसार तलाक देण्यासाठी साक्षीदारांची आवश्यकता नसते; पण शिया कायद्यानुसार तलाक दोन साक्षीदारांच्या समोरच द्यावा लागतो. तसेच तलाक दिल्याची नोटीस पत्नीला देण्याचे बंधन नाही. तलाक तोंडी किंवा लेखी देता येतो.
तलाक दोन तर्‍हेने देतात
०तलाक अहसन - या प्रकारामध्ये नवर्‍याने ‘मी तुला तलाक देतो’ अशी घोषणा करायची असते आणि त्यानंतर पत्नीला तीन महिने ‘इद्दत’ काळ पाळायचा असतो. या काळात पतीला पत्नीशी शारीरिक संबंध ठेवता येत नाही. या काळामध्ये नवरा आपली घोषणा दोन प्रकारे मागे घेऊ शकतो. तलाक दिलेल्या पत्नीशी पुन्हा वैवाहिक संबंध प्रस्थापित करून तलाक ‘इद्दत’ काळात मागे घेतला नाही तर तीन महिन्यांनंतर तलाक कायम होतो आणि त्यानंतर तलाक मागे घेता येत नाही.
०तलाक हसन - या प्रकारच्या तलाकमध्ये तीन ‘तुहर’ काळामध्ये प्रत्येक वेळी एक घोषणा ‘मी तुला तलाक देतो’ करावी लागते. पहिली घोषणा केल्यानंतर दुसरा तुहरचा काळ येईपर्यंतच्या काळात घोषणा मागे घेतली जाऊ शकते. घोषणा मागे घेतली नाही तर दुसर्‍या तुहरच्या काळात दुसरी घोषणा करायची. त्यानंतर तुहरचा तिसरा समय येतो, त्यामध्ये घोषणा मागे घेता येते; पण जर घोषणा मागे घेतली नाही तर तुहरच्या तिसर्‍या काळात तिसरी घोषणा करायची. या तिसर्‍या घोषणेनंतर तलाक पक्का होतो. कारण त्यानंतर घोषणा मागे घेण्याची मुभा नाही. [तुहर म्हणजे पत्नी मासिक पाळीतून मुक्त असते तो काळ.]
याशिवाय ‘तलाक उल बिद्दात’ या प्रकाराने तलाक देता येतो. यामध्येसुद्धा दोन प्रकार आहेत. ‘तीन घोषणायुक्त तलाक’ आणि ‘एकच घोषणा तलाक’. पहिल्या प्रकारामध्ये तलाकच्या तीन घोषणा एका वाक्यात अथवा तीन घोषणा एकाच वेळी, पण वेगवेगळ्या दिल्या जातात. अशा प्रकारे घोषणा दिल्यानंतर लगेचच तलाक अमलात येतो आणि लगेचच पत्नीला ‘इद्दत’ काळ पाळावा लागतो. हा प्रकार भारतात जास्त प्रचलित आहे.

आता प्रश्न आहे की, मुस्लिम स्त्रीला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर ती घेऊ शकते काय? आणि केव्हा? मुस्लिम कायद्यानुसार तलाक देणे हा नवर्‍याचा अधिकार आहे; पण काही वेळेला तलाक देण्याचा आपला हक्क तो पत्नीला देऊ शकतो. म्हणजेच पतीने विवाहाच्या आधी, विवाहाच्या वेळी अथवा विवाहानंतर, तलाक देण्याचा हक्क काही अटींवर पत्नीला दिला असल्यास, काही कारण घडल्यास, अथवा विशिष्ट घटना घडल्यास त्या कारणाच्या आधारावर पत्नी तलाक मागू शकते; पण तलाक देण्याची क्रिया पतीलाच करावी लागते. यास ‘तलाक-ए-तफविज’ असे म्हणतात. परस्पर संमतीनेही पती-पत्नी तलाक देऊ शकतात, त्यास ‘तलाक-ए-मुबारत’ असे म्हणतात. यापुढे जाऊन पत्नीला पतीपासून त्रास होत असेल आणि तिला घटस्फोट हवा असल्यास, तर ती दोघांच्या संमतीने तलाक घेऊ शकते; पण त्या बदल्यात तिला मेहेरचा हक्क किंवा इतर हक्क सोडावे लागतात. ‘तलाक-ए-मुबारत’ अथवा ‘खुल्ला’ तलाक या दोहोंचा परिणाम म्हणजे पत्नीला आपला मेहेरचा हक्क आणि रक्कम दोन्हीही सोडून द्यावे लागते.

तलाक घेतल्यानंतर पती-पत्नी हे नाते संपुष्टात येते, पत्नीने इद्दत पाळणे तिच्यावर बंधनकारक असते, तलाक झाल्यानंतर पत्नीची मेहेरची रक्कम देणे नवर्‍यावर बंधनकारक आहे. तसेच तलाक झाल्यानंतर पत्नीच्या पालनपोषणाच्या जबाबदारीतून इद्दत काळ संपल्यानंतर नवरा मुक्त होतो. नवरा तलाक देतो, त्या वेळी न्यायालयात जाण्याची आवश्यकता नसते; पण स्त्रीला जर विवाह संपुष्टात आणायचा असेल तर मात्र तिला न्यायालयामार्फत घटस्फोट घ्यावा लागतो.
(क्रमश:)
(nbtlawcollege@rediffmail.com)