आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहिरातींचा आस्वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टेलिव्हिजनच्या जन्मापासून जाहिरातींकरिता एक उत्कृष्ट माध्यम उपलब्ध झालं आहे. याशिवाय आता पूर्वीप्रमाणे पुरचुंड्या नसून माल सुरेख पॅकेटमध्ये किंवा डब्यांमध्ये मिळू लागला आहे. तेव्हा त्यावरसुद्धा आपल्या मालाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख केल्यास खप वाढायला निश्चितच मदत होते. या जाहिराती खाण्या-पिण्याच्या गोष्टींबद्दल असतील तर ‘सोने पे सुहागा,’ पाहूनच तोंडाला पाणी सुटणार आणि हात आपोआप पर्सकडे जाणार.

आपल्या दिवसाची सुरुवात होते चहानेच, म्हणूनच प्रीमियम चहा ‘जागो रे’ म्हणून हाक देताना आढळतो. तर परिवार चहा असतो ‘मस्त चहा.’ तर पटाखा चाय म्हणजे ‘गजब का स्वाद’ देणारा. मराठीत चहा पुल्लिंगी असला तरी हिंदीत तो स्त्रीलिंगी असतो. त्यावर कडी म्हणजे आणखी एक परिवार चहा, तो आहे ‘जसा हवा तसा चहा.’ वाघ आणि बकरी कधी एका घाटावर पाणी पिताना दिसतील का? पण वाघबकरी चहा मात्र ‘परफेक्ट नाती जोडी’ असं म्हटलं जातं. रेड लेबल चहा तर ‘स्वस्थ राहा मस्त राहा’चाच संदेश देणारा. तो ग्रीन टी असला तर विचारायलाच नको. त्यात तर अँटिऑ क्सिडंट, कॅन्सरपासून बचाव इथपर्यंतची वैशिष्ट्य सामावलेली आहेत. तेव्हा चहा हे असं सर्वगुणसंपन्न पेय असताना त्याच्या प्रेमात पडत लोक चहाबाज होणार नाहीत का?

आता चटण्या मसाल्यांचा स्वाद घेऊ. बोरकूट म्हणजे तर ‘चवच अशी न्यारी की पुन्हा पुन्हा न्यावी घरी.’ एक चटणी म्हणजे ‘स्वाद हमारा विश्वास तुम्हारा’ या महाराष्ट्रातल्या छान चटणीचा स्वाद मात्र ‘तुम्हारा’ शब्दाने कमी झाला. यमक जुळणी तर ठीक आहे, परंतु हिंदीत तुम्हाला हा शब्द मराठीच्या ‘तू’सारखा एकेरी असतो. तेव्हा ‘आपका’ चटणीचा स्वाद वाढवणार ठरलं असतं. ‘चवीने खाणार त्याला केप्र देणार’ खरं ना? तर एक मसाला म्हणजे खरोखरच असली ‘असली मसाले सच सच MDHl’ बेडेकर मसाले तर पिढी दर पिढी चालत आलेले. एक मसाला तर ‘लाइफची टेस्ट’ वाढवणारा म्हटला गेला. मसाले जेवणाची चव वाढवतात हे खरं, पण काय ते घराची बिघडलेली चव परत रुळावर आणू शकतील? माझं उत्तर अर्थात होकारार्थी आहे. कारण आमच्या इथे आहे ‘सास बहू का झगडा मिटाने वाला, देव का दिव्य मसाला.’
थंडीचे दिवस सुरू झाले की आमच्या इथे तीळ आणि गुळाची ‘गजक’ नावाची एक स्वादिष्ट चीज तयार करू लागतात, कुरकुरीत आणि चिकीसारखी पट्टीवाली! पुष्कळदा त्यात सुका मेवा, मावा वगैरे घालून त्याची किंमत पैशाच्या आणि कॅलरीजच्या हिशेबाने वाढते. आता गजकच्या डब्यांवर ‘शाही लोग शाही पसंद’ किंवा ‘ऊँचे लोग ऊँची पसंद’ लिहिलेलं असतं. मग आपणही शाही आहोत हे दाखवणं आलंच. त्यात ‘सर्दियों का टॉनिक’ लिहिलेलं असलं तर वाईट चवीची टॉनिक्स कोण घेणार? अंग्रेजियत इथेच राहिली तेव्हा गजक ''Winter's gift'' पण होतं. त्यात हा ‘स्वाद दिल से’ आणि त्यातही ‘विश्वास और शुद्धता का अहसास’ दिलेला असला तर विचार करायची गरजच नाही. या गजबमध्ये ‘रेशे रेशे में मिठास’ आणि ‘स्वाद लाजवाब’ असला तर ‘खाये जाव खाये जाव’ अशीच अस्वस्था व्हायची. नाती काय फक्त वाघबकरी चहाच जोडतो? छे! गजकच्या डब्यांवर पण ‘स्वाद जो रिश्ते जोडे’ हा संदेश असतोच. ते खरंही आहे. तिळगूळ देताना आपण म्हणतोच ना, ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला.’ पुढे तर आम्ही हेपण म्हणत असू की ‘तिळगूळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका.’ तिळगूळ खाल्ल्यानंतर तुमच्या स्वभावात तिळाची स्निग्धता व वाणीत गुळाचा गोडवा येणारच येणार. तेव्हा भांडायची वेळ येतेच कुठे? म्हणूनच सगळे ‘गिले शिकवे’ दूर करणारा व ‘रिश्ते’ जोडणारा एकमेव पदार्थ म्हणजे गजकच. दूसरा न कोई!

कानपूरच्या दुकानातल्या डब्यावर लाडवांची जाहिरात पाहिली. त्यावर लिहिलं होतं. ‘ठग्गू के लड्डू’ आता ठग्गू हे मालकाचं नाव आहे की लाडवाचा काही प्रकार, काही कल्पना नाही. महत्त्वाचं म्हणजे पुढे हेही लिहिलं होतं की ‘ऐसा कोई नहीं सगा, जिसको हमने नहीं ठगा’ म्हणजे आमचा असा कुठलाच नातेवाईक, सुहृद नाही ज्याला आम्ही लुटलं, मूर्ख बनवलं नसेल. कलियुगात इतकं खरं बोलणारा कुणी असू शकेल यावर विश्वास ठेवावा लागेल. कारण सत्यवादी हरिश्चंद्राचा काळ संपला तरी त्याचे वंशज आजही जिवंत आहेत आणि जग जे चाललंय ते याच बळावर.
सत्यमेव जयते!