आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई झाल्यावर.....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई व्हायची जर पहिलीच वेळ असेल तर आपल्याला बरेच सल्ले ऐकायला मिळतात. हेच कर, तेच करू नकोस, असंच खा, एवढंच खा, बाळाला त्रास होईल, दूधच पी... ही सल्ल्यांची मालिका सुरूच राहते. त्यामुळे होतं काय, की आपण एकदम किंकर्तव्यमूढ होऊन जातो. म्हणूनच स्तनपानासंबंधित अशाच काही प्रश्नांची ही उत्तरे.
1. स्तनपान करणा-या आईला अधिक पोषणाची आवश्यकता असते का?
हो. तिला सर्वसाधारणपणे तिच्या नेहमीच्या गरजेपेक्षा 500 ते 600 किलोकॅलरी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. आईच्या स्वत:च्या पोषणाबरोबरच बाळाचे दूध तयार करण्यासाठी अधिक पोषणाची गरज भासते. दूध तयार करण्यासाठी आईच्या आहारातून पुरेशी पोषक तत्त्वे मिळाली नाहीत तर ती आईच्या शरीरातून घेतली जातात पण दुधातील पोषक तत्त्वांचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे आईच्या आरोग्यास धोका संभवतो. म्हणून बाळंतिणीचा आहार हा सर्व पोषक तत्त्वांनी युक्त असा हवा. त्यात प्रथिने, सर्व प्रकारची जीवनसत्त्वे (अ, ब, क, ड आणि के) आणि खनिज पदार्थ (विशेषत: लोह आणि कॅल्शियम) यांचा समावेश असला पाहिजे.
आहारात विविध प्रकारची धान्ये, मोड आलेली कडधान्ये, सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असला पाहिजे. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेलं आणि ताजं अन्नं खावं; त्यात जीवनसत्त्वे जास्त टिकून राहिलेली असतात.
2. आईने खाल्लेल्या अन्नाचा तिच्या दुधावर काही परिणाम होतो का?
दुधातील सर्व घटक आईच्या जेवणावर अवलंबून नसतात. आईच्या जेवणात पुरेसे कॅल्शियम नसेल तर ते तिच्या हाडांमधून घेतले जाते, पण दुधातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होत नाही. एका संशोधनात कुपोषित आणि निरोगी आयांच्या दुधामधील पोषक तत्त्वांचे प्रमाण जवळपास सारखेच असल्याचे आढळले आहे.
3. स्तनपान सुरू असताना पाणी किंवा द्रव पदार्थांचे किती सेवन करावे?
स्तनपान सुरू असताना मुद्दाम खूप जास्त किंवा कमी पाणी प्यायची गरज नाही. पण नियमितपणे थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे. दिवसातून साधारण 8 ते 10 पेले पाणी प्यायला हवे. ब-याचदा बाळाला दूध पाजताना किंवा पाजल्यानंतर आईला तहान लागते. तेव्हा पाण्याचा पेला जवळ घेऊन बसणे इष्ट ठरते. शक्यतो गोड, साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे. त्यामुळे वजन वाढण्याची भीती असते. चहा-कॉफीसारख्या उत्तेजक पेयांचेही अतिरिक्त सेवन करू नये.
असा समज आहे की आईने पाणी प्यायल्यास दूध पातळ होते आणि त्यामुळे बाळाला कमी पोषण मिळते. हा समज अत्यंत चुकीचा आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. पाणी कमी प्यायल्याने आईला मूत्राशयाचे रोग होण्याचा संभव असतो.
4. बाळंत झाल्यावर सुरुवातीला दुधाऐवजी चिकट घट्ट द्रव किंवा चीक स्रवतो. तो बाळाला पाजणे कितपत योग्य आहे?
सुरुवातीला येणा-या पिवळसर घट्ट चिकाला नवस्तन्य म्हणतात आणि बाळासाठी तो अत्यंत गरजेचा असतो. नवस्तन्य दुधामध्ये बाळासाठी अत्यंत आवश्यक अशी प्रथिने, अनेक अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एका अर्थी नवस्तन्य दूध हा बाळाचा पहिला बूस्टर डोस असतो म्हणा ना!
5. बाळाला स्तनपानाशिवाय आणखी काही आहार द्यायची आवश्यकता असते का?
नाही. पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर काहीही द्यायची आवश्यकता नाही. आईच्या दुधातील पोषक तत्त्वे बाळाच्या गरजेनुसार असतात. प्रत्येक आईचे दूध तिच्या बाळासाठी खास तयार केलेले असते. जागतिक आरोग्य संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूधच पाजावे. आईच्या दुधामध्ये 90% पाण्याचा अंश असतो. त्यामुळे बाळाची पाण्याची गरज आईच्या दुधामधूनच भागते. शिवाय पाणी स्वच्छ उकळून घेतलेले नसल्यास बाळाला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मधाच्या चाटणाची किंवा साखरेच्या पाण्याचीदेखील बाळाला आवश्यकता नसते.
थोडक्यात, बाळंतिणीसाठी योग्य आहार म्हणजे साधा, विविध गोष्टींचा समावेश असलेला संतुलित आहार आणि बाळासाठी पहिले सहा महिने आईचे दूध हाच संपूर्ण आहार. अजूनही काही अनुत्तरित प्रश्न जर मनात असतील तर ई-मेलद्वारे अवश्य कळवा.
बाळंतिणीसाठी कॅल्शियम व लोहयुक्त पाककृती :
पालकाची कोशिंबीर, वाढणी - दोघांसाठी
जिन्नस :
*   पालकाची धुतलेली पाने - 100 ग्रॅ (10 ते 12 पाने)
*   घट्ट दही - 1 वाटी
*   साखर - चवीप्रमाणे
* मीठ - चवीप्रमाणे
कृती :
* पालकाची धुतलेली ताजी पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्यांना बारीक, लांब पट्ट्यांमध्ये उभे चिरावे.
* दह्यात मीठ व साखर घालून ते चांगले फेटून घावे.
वाढण्याआधी थोडा वेळ पालक दह्यात घालून छान मिसळून घ्यावा म्हणजे खाताना पालक कुरकुरीत राहतो. दही थंड असल्यास सॅलड जास्त छान लागते.
फायदे :
* दह्यातून आपल्याला उत्तम प्रतीची प्रथिने मिळतात.
* दही व पालक कॅल्शियमचे खूप चांगले स्त्रोत आहेत.
* पालकातून लोहदेखील चांगल्या प्रमाणात मिळते.