Home | Magazine | Rasik | after-osama-govind-talwalkar

ओसामानंतर...

गोविंद तळवलकर, ज्येष्ठ ग्रंथकार | Update - Jun 02, 2011, 12:11 PM IST

अमेरिकेप्रमाणेच इंग्लंड व युरोप यांच्याही परिस्थितीत ओसामाच्या निर्गमनामुळे विशेष फरक पडणार नाही. तेथे वाढलेल्या मुस्लिम युवकांवर अतिरेकी इस्लामवादाचा प्रभाव पडत गेला असून...

 • after-osama-govind-talwalkar

  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आवाका असलेला व्यासंग, विषय, वैविध्य, सुस्पष्ट विचार आणि टोकदार भाष्य ही ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांच्या लिखाणाची खास वैशिष्ट्ये. मराठी वृत्तपत्रसृष्टीवर व्यापक प्रभाव असलेले तळवलकर गेली सहा दशके आपल्या ठाशीव विचारांनी मराठी वाचकांचे वाचनविश्व समृद्ध करीत आले आहेत. त्यांच्या लेखणीतून उतरलेले हे सदर दर पंधरवड्याला प्रसिद्ध होईल.

  अमेरिकन खास सुरक्षा सैनिक पथकाने ओसामाचा अंत केला असला तरी जगभर मोठे बदल होण्याची नजीकच्या काळात शक्यता नाही. ओसामाचा विश्वासार्ह ठावठिकाणा मिळाल्यास त्याला ठार मारण्याचा आदेश आपण देऊ, असे आश्वासन बराक ओबामा यांनी गेल्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार-मोहिमेत दिले होते. आता होणाऱ्या निवडणुकीच्या दीड वर्ष आधी ते पुरे केले. ओबामा यांचा फेरनिवडणुकीतील विजयही ओसामाच्या अंतामुळे सुलभ होणार नाही. एकच होणार आहे की, ओबामा यांच्यापाशी निर्धार व कणखरपणा नाही, ही टीका रिपब्लिकन पक्षास थांबवावी लागेल.
  अमेरिकेप्रमाणेच इंग्लंड व युरोप यांच्याही परिस्थितीत ओसामाच्या निर्गमनामुळे विशेष फरक पडणार नाही. तेथे वाढलेल्या मुस्लिम युवकांवर अतिरेकी इस्लामवादाचा प्रभाव पडत गेला असून, त्यातील काही पाकिस्तानात जाऊन दहशतवादाचे धडे घेतात आणि घातपात, आत्मघातकी बॉम्बफेक इत्यादी शिकतात. यातही खंड पडणार नाही.
  परंतु दहशतवादाचा अवलंब न करता पश्चिम आशियात जी उलथापालथ झाली व होत आहे त्यामुळे तो सारा विभाग लक्षणीय प्रमाणात बदलत आहे. या बदललेल्या पश्चिम आशियाशी ओबामा व पाश्चात्त्य जगाला व्यवहार करावा लागेल. त्या भागात लष्कराच्या बळावर दीर्घ काळ चाललेल्या काही व्यक्तींच्या राजवटींना जागृत लोकशक्तीने टक्कर दिली. ट्युनिशियापासून सुरुवात झाली. मग इजिप्तमधील हजारो-लाखो असंतुष्टांनी धरणे धरले आणि मुबारक यांना निवृत्त होण्यास भाग पाडले. इजिप्तमधील लोक एकाएकी उठाव करण्यास तयार झाले नाहीत आणि अमेरिकेसह कोणत्याही पाश्चात्त्य देशाची त्यामागे नैतिक वा भौतिक प्रेरणा नव्हती. दुसरीच एक प्रेरणा लोकांना मिळाली होती. तिचा उगम आजच्या फेसबुक इत्यादी तांत्रिक साधनही नाही. ही साधने बंद करून लोक कामाला लागल्यावर काय करायचे याचे मार्गदर्शन करणारी संघटना सर्बियात अनुभवसंपन्न झालेली होती.
  पश्चिम आशियातील वसंत
  सर्बियात मिलोसेविच याच्या हुकूमशाहीच्या विरुद्ध तरुण मंडळी १९९ च्या दशकात उठाव करीत होती व यशस्वीही झाली. या तरुणांनी आपला अनुभव मर्यादित न राहू देता इतर हुकूमशहांना सरळ करण्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले. त्यांनी सेंटर फॉर अप्लाइड नॉनव्हायोलंट अॅक्शन (कॅन्व्हास) या नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना हरारेपासून ब्रम्हदेशापर्यंतच्या पन्नास देशांतील तिचे सदस्य स्वत:ला 'ऑटपोर' म्हणतात. या सर्बियन शब्दाचा अर्थ प्रतिकार असा आहे. अहिंसक रीतीने कसे संघटन करायचे आणि प्रतिकार करायचा याविषयी त्यांनी एक कार्यक्रम तयार केला आहे. अदेल या इजिप्तच्या तरुणाने बेलिग्रेडमध्ये जाऊन ते शिक्षण घेतले आणि तो कैरोला परतला. परतल्यावर त्याने फेसबुक, इंटरनेट इत्यादींचा उपयोग करून लोकांत प्रचार केला. यामुळे कैरोतच नव्हे तर इतरत्रही मुबारकविरोधी मोठी निदर्शने होऊन कारभार थंडावला. तेव्हा इजिप्तमधील उठाव असा स्वयंप्रेरित होता. येमेन, लिबिया, सिरिया इत्यादी देशांत उठाव होत आहेत. या तिन्ही देशांचे राज्यकर्ते लष्करी बळाचा वापर करीत आहेत आणि पाश्चात्य देशांना आज ना उद्या हस्तक्षेप करणे भाग पडेल. 'पश्चिम आशियातील वसंत' अशा शब्दांत त्याचे वर्णन होत असले, तरी हा वसंत पुरता बहरण्यास बरेच खतपाणी घालावे लागणार आहे.
  दोन देशांत राज्यकर्ते बदलले. निवडणुकीचे वेळापत्रक तयार होत आहे. नंतर कोणते राजकीय चित्र दिसणार हे स्पष्ट नाही. पण जे बदल झाले व होणार त्यास ओसामा कारणीभूत नव्हता. उठाव करणारांनी त्याचे चित्र मिरविले नाही आणि तो खतम झाल्यावर अमेरिकेच्या विरुद्ध निदर्शने केली नाहीत. उलट अमेरिकेकडून आर्थिक व लष्करी मदत यांची मागणी होत आहे. मुबारक इत्यादींवर संक्रांत आल्यामुळे सौदी अरेबियाच्या राजांनी ओबामा यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि चीनशी संधान बांधू असा सूचक इशारा दिला. तथापि आपल्याला बंडास तोंड द्यावे लागू नये म्हणून ब:याच मोठ्या रकमेचे लोकांत वाटप करून इतरही काही सवलती लोकांना दिल्या. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूड ही अतिरेकी इस्लामी संघटना ऐंशी वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे. त्याचबरोबर सलाफी हा आणखी एक अतिरेकी इस्लामी विचारपंथ आहे. त्याच्याच सदस्यांनी इजिप्तमधील काही ख्रिश्चनांवर हल्ले केले आणि दोन चर्च जाळली. पण ही लाट पसरलेली नाही. मुबारकविरोधी निदर्शने झाली तेव्हा ब्रदरहूड आणि इतर सलाफी संघटना पहिल्या काही दिवसांत स्वस्थ होत्या आणि नंतर त्या सामील झाल्या. मुबारक व इस्रायल यांना अमेरिका पाठिंबा देत होती. यामुळे निदर्शक प्रथम ओबामा यांचा निषेध करीत होते. उठावाच्या प्रारंभी तीन चार दिवस ओबामा गप्प होते; आणि मुबारक यांची राजवट स्थिर असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले होते. मुबारक इस्रायलशी सलोखा करून होता आणि तो जर दूर झाला तर हे संबंध बदलले जाण्याचा धोका अमेरिकेला वाटत असल्यामुळे ओबामा संदिग्ध भूमिका घेत होते. इस्रायलसंबंधीचे आतापर्यंतचे धोरण इजिप्त पुढे चालविणार नाही, हे उघड झाले आहे. हमास आणि पॅलेस्टाइनमधील अराफतचा फाता पक्ष या जहाल पक्षांच्यात तडजोड घडवून आणण्यात नव्या इजिप्शियन राज्यकरत्यानी पुढाकार घेऊन हे दाखवून दिले आहे. यामुळे जी सीमारेषा ६७ सालीच सोडण्याचा आदेश देणारा ठराव युनोने दिला होता.
  तो धुडकावण्याच्या इस्रायलच्या धोरणाविरुद्ध गुळमुळीत भू्मिका ओबामा अजूनही घेत राहणार की काय याकडे लक्ष राहील. आता इजिप्त व काही अरब देशांत निवडणूक होईल तेव्हा ब्रदरहूडसारख्या धर्मवादी संघटना सहभागी होतील. त्यांचे काही उमेदवार निवडून येतील आणि काहींचा मंत्रिमंडळातही समावेश होईल. पश्चिम आशियातील लोकांनी ओसामाचा त्याग करून ते अंतर्मुख बनले. पुढील मार्ग खडतर आहे. पण त्यांच्यात वैचारिक परिवर्तन होत आहे. ते नागरी समाज तयार करू पाहत असून, लोकांच्या हाती सत्ता देऊ पहात आहेत. धर्माकडे पाठ फिरविली जाणार नसेल, पण मध्ययुगीन समाजाचे चित्र आणि त्याचे पुरस्कर्ते यांच्या मागे ते जाऊ इच्छित नाहीत. याउलट पाकिस्तानात आहे. ओसामाची छायाचित्रे मिरवत हजारो जणांचे मोर्चे निघाले आणि एक ओसामा गेला तरी कोट्यवधी ओसामा आहेत अशा घोषणा एकट्या पाकिस्तानात झाल्या; इतर कोणत्याही मुस्लिम देशांत नाही. ओसामाच्या पश्चात पाकशी अमेरिका कसे वागणार, हा स्वतंत्र विषय आहे.

Trending