आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांचा अजरामर होईल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहरने ‘अग्निपथ’चा रिमेक बनवण्याची घोषणा केली. ऋतिक रोशन विजय दीनानाथ चौहान बनला आणि संजय दत्त कांचा. चित्रपटाच्या पहिल्या लूकची त्यामुळेच उत्सुकता होती. जेव्हा करण जोहरने पहिला लूक दाखवला तेव्हा विजय चौहानपेक्षा कांचाच लक्षात राहिला. संपूर्ण पडदाभर तोच व्यापलेला दिसत होता. मूळ अग्निपथ विजय दीनानाथ चौहानचा होता, तर हा नवा अग्निपथ कांचाचा असल्याचेच वाटत होते.
करण जोहरच्या आॅफिसमध्ये गप्पा मारताना संजय दत्तने कांचाच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, दिग्दर्शक करण मल्होत्राने जेव्हा मला अग्निपथची कथा मला ऐकवली तेव्हाच मला ती प्रचंड आवडली. मूळ कांचा चिनाला एका वेगळ्यात रूपात करण मल्होत्रा घेऊन आला होता. मला ही भूमिका साकारणे म्हणजे आव्हान वाटले आणि म्हणूनच मी तयार झालो. कांचा हा अत्यंत विचित्र, अनप्रेडिक्टेबल आहे. तो भगवद्गीता वाचतो आणि आपल्या आयुष्यात तिचा वापरही करतो. मूळ अग्निपथ मी पाहिला होता. त्यामुळे डॅनी साहेबांनी साकारलेली भूमिका माझ्या चांगलीच लक्षात होती. मात्र, त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने भूमिका साकारण्याची संधी मला करण मल्होत्राने दिली.
भूमिकेसाठी काय तयारी केली विचारता संजय दत्त म्हणाला की, तयारी काही नाही. फक्त केस कापले. मात्र, मुळात केस कापण्याचे ठरले नव्हते. प्रॉस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने सुरुवातीला ऋषी कपूर यांच्याबरोबर मी इंदू मिलमध्ये शूटिंग केले. त्यानंतर आमचे शूटिंग दिव येथे होते. तेथे प्रचंड ऊन होते. प्रॉस्थेटिक मेकअपला दोन तास लागत असत. मी एकदा मेकअप केला आणि उन्हामुळे तो पाघळला. त्यामुळे पुन्हा मेकअप करण्यास 2 तास लागणार होते. असे रोज झाले तर शूटिंगमध्ये अडचण निर्माण होईल म्हणून मग मी केस कापण्याचेच ठरवले आणि ते चांगलेच झाले. कारण त्यामुळे कांचाची भूमिका उठावदार झाली; पण अशा प्रकारच्या प्रेक्षकांच्या मनात राहिलेल्या भूमिका पुन्हा पडद्यावर आणणे योग्य वाटते का विचारता संजय दत्त म्हणाला, काही भूमिका अजरामर असतात. त्या सगळ्यांनीच पाहिलेल्या असतात असे नाही. त्या पुन्हा पडद्यावर आल्या तर प्रेक्षकांना त्याची नव्याने ओळख होईल. त्यामुळे त्यात काही वाईट आहे असे वाटत नाही. मात्र, मदर इंडिया, पडोसन, मुझे जीने दो, शोलेतील गब्बर अशा काही भूमिका आहेत ज्या पडद्यावर पुन्हा आणणे शक्य नाही. मदर इंडिया तुम्ही पुन्हा सादर करू शकत नाही. ऋतिकबरोबर तू मिशन कश्मीरमध्ये काम केले होतेस आणि आता पुन्हा एकदा तुम्ही एकत्र आहात. ऋतिकमध्ये काय फरक जाणवला विचारता संजय दत्त म्हणाला, मिशन कश्मीरचे आम्ही जेव्हा शूटिंग सुरू केले होते तेव्हा त्याचा कहो ना प्यार है प्रदर्शितही झाला नव्हता. तो खूपच चांगला अभिनेता आणि डान्सर आहे. आतापर्यंत तू खलनायकांना मारत आलास आता प्रथमच मार खाताना कसे वाटले विचारता संजय दत्त म्हणाला, वाईट वाटले; परंतु ही भूमिकाच अशी आहे की, मला जरी वाईट वाटले तरी प्रेक्षकांना आनंद होईल. कांचा खूपच क्रूर आहे. त्यामुळे त्याला शिक्षा मिळणे आवश्यक आहे, असेच प्रेक्षकांना वाटेल. आतापर्यंत जसा गब्बर प्रचंड लोकप्रिय झाला तसाच कांचाही अजरामर होईल, यात शंका नाही.
तुझा आवडता खलनायक कोण विचारता संजय दत्तने लगेचच अमजद खानचे नाव घेतले. संजय दत्त म्हणाला, पहिल्याच चित्रपटात संजीवकुमार, अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासमोर उभे राहून इतका उत्कृष्ट अभिनय करणे सोपे काम नाही; परंतु अमजद खान यांनी हे करून दाखवले. शोले आणि गब्बर एकमेकांत इतके मिसळले आहेत की त्यांना दूर करूच शकत नाही. मुन्नाभाईचा तिसरा भाग कधी येणार विचारता संजय दत्त म्हणाला, ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ नावाने जो तिसरा भाग येणार होता तो बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी मुन्नाभाईची नवीन कथा मांडण्यात येणार आहे. मी डेट्स दिलेल्या आहेत. त्याचे शूटिंग लवकरच सुरू होईल. ‘मुझे जीने दो’चा रिमेक करणार होता त्याचे काय झाले विचारता संजय दत्त म्हणाला, मुझे जीने दो नव्या रूपात मला आणायचा आहे; परंतु मी अजून त्यास तयार नाही. मी अजंठा फिल्म्सचे पुनरुज्जीवन करणार आहे; परंतु मला चांगली कथा मिळत नाही. मला कलात्मक चित्रपट तयार करायचे नसून मनोरंजक चित्रपट तयार करायचे आहेत. आई नर्गिस व पिता सुनील दत्त यांच्यापैकी तुझ्यावर अभिनयाच्या बाबतीत कोणाचा जास्त प्रभाव आहे विचारता संजय दत्तने आई नर्गिसचे नाव घेतले आणि म्हणाला की, भूमिकेत शिरण्याची कला मला आईकडूनच मिळाली आहे.
shindeckant@gmail.com