ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम...’ या गाण्यातला एक एक शब्द कर्णेंद्रियातून मन:पटलावर अत्यंत शांतपणे उतरत जातो, मनाला एक आगळी शीतलता, प्रसन्नता देत राहतो. ‘निर्बल से लडाई बलवान की, यह कहानी है दिये और तूफान की...’ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकटांना सामोरे जाताना हे गाणे अनेकांना दहा हत्तींचे बळ देऊन जाते... ‘आधा है चंद्रमा रात आधी...'मधला मधाळ गोडवा मनाला प्रफुल्ल करतो. शीतलता, कोमलता, प्रसन्नता, प्रफुल्लता, कठोरता, शांतता, प्रेमळता, विदारकता... असे अनेक भाव गीतांच्या माळेत गुंफणारा हा शब्दांचा जादूगार म्हणजे, पंडित भरत व्यास. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातल्या सोनेरी गीतांच्या व्यासपर्वाने अवीट गोडीची, बावनकशी सुवर्णझळाळीची अनेक गाणी अजरामर केली आहेत.
बिकानेरनजीकच्या चुरू या गावी भरतजींचा जन्म झाला. त्यांचे पिता पंडित शिवदत्त व्यास हे संस्कृतचे गाढे अभ्यासक. घराणे संस्कृत पंडित ब्राह्मणाचे. पिता वैद्यकी करत. पहिले महायुद्ध संपताना गावात प्लेगची साथ आली. त्या वेळी त्यांच्या वडलांनी गाव न सोडता रुग्णांवर उपचार केले, पुढे त्यातच त्यांना मृत्यूने गाठले. काही काळाने आईचेही छत्र हरपले. भरतजींच्या आजोबांनी मग या तीन भावंडांचे पालनपोषण केले. धाकटे बंधू बृजमोहन पुढे अभिनेते झाले. भरतजींचे संस्कृतचे अध्ययन सुरू होते. पुढे काकांनी त्यांना इंग्रजी शाळेत दाखल केले.
राजस्थानातल्या वाळवंटात शिक्षण घेत असताना भरतजींच्या मनात मात्र काव्याची हिरवळ खुलत होती, वयाप्रमाणे ती फुलत गेली. पुढे उच्च शिक्षणासाठी ते कोलकाता येथे गेले. कोलकात्याच्या सांस्कृतिक वातावरणात भरतजींमधील प्रतिभावंत चांगलाच खुलला. तेथील कविसंमेलनात भरतजींचे नाव गाजू लागले. याच काळात काव्यलेखनाबरोबरच नाटकांचे लेखन भरात होते. त्यांनी त्या काळात लिहिलेली ‘रंगीला मारवाड’, ‘ढोला मारू’ आदी नाटके खूप गाजली. दरम्यान त्यांचा "मरुधारा' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि भरतजींना मुंबई खुणावू लागली. निर्माता-दिग्दर्शक व्ही. एम. व्यास यांच्या "दुहाई'मध्ये भरतजींनी सर्वप्रथम गीतलेखन केले. शांता
आपटे या चित्रपटात नायिका होत्या. त्यानंतर अनेक चित्रपटांतून भरतजींनी गीतलेखन केले. पण भरतजी प्रकाशझोतात आले ते ‘तूफान और दिया’मुळे. शांताराम यांच्या ‘राजकमल फिल्म्स’चा हा चित्रपट.
वसंत देसाई या संगीतकाराबरोबर भरतजींचे सूर जुळले, त्यातून जन्माला आली अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी. ‘मेरी छोटीसी बहन देखो गहने पहन...’, ‘पिया ते कहाँ गये...’, ‘मेरी आन भगवान...’, ‘आया रे आया रे भज्जीवाला...’, ‘आँखो में आँखे डाल के...’, ‘दिल तुमने लिया है...’ आणि ‘यह कहानी है दिये और तूफान की...’ ही भरतजींची गाणी तुफान गाजली. मग आला तो ‘दो आँखे बारह हाथ’. गदिमांची कथा, व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन, वसंत देसाई यांचे संगीत आणि भरतजींची गीते... मग काय विचारायचे... ‘हो उमडे घुमड के आयी रे घटा...’मधला उत्साह, ‘मैं गाऊं तू सो जा...’मधले वात्सल्य, ‘सैयां झूठों का बडा सरताज निकला...’मधला लाडिक ठसका, ‘टक टक धूम धूम...’मधला खट्याळ भाव, या सर्वांवर कडी करणारी ‘ऐ मालिक तेरे बंदे हम' ही प्रार्थना... अशी एकाहून एक सकस, आशयघन गीते भरतजींच्या प्रतिभेची चुणूक दाखवणारी ठरली. शांताराम बापूंच्या चित्रपटांचे गीतकार म्हणून भरतजींचे नाव झाले. त्यानंतर आलेल्या ‘नवरंग’मधून भरतजींनी नवरसातील गीतरूपी काव्य रसिकांना पेश केले.
सी. रामचंद्र यांच्या सुरेल संगीताने भरतजींच्या गीतांची खुमारी आणखी सुरेल केली. एका कवीच्या जीवनावर आधारित ‘नवरंग’ची कथा म्हणजे भरतजींसमोर मोठे आव्हान होते. मात्र चतुरस्र प्रतिभेच्या भरतजींनी हे आव्हान लीलया पेलले. ‘श्यामल श्यामल बदन, कोमल कोमल चरन, तेरे मुखपे है चंदा गगन का जडा, बडे मन से विधाता ने तुझको घडा...’ असे तिच्या सौंदर्याचे स्वर्गीय वर्णन असो, की ‘तू छुपी है कहाँ...’मधला तडपवणारा विरह असो... ‘आधा है चंद्रमा रात आधी...’मधली प्रेमळ व्याकुळता, अधीरता असो किंवा ‘आरे जा रे हट नटखट ना छू मेरा घुंघट...’मधला खट्याळपणा, ‘कारी कारी अँधियारी...’मधला गहरा भाव, गाण्यातली वास्तवता, तसेच ‘ये माटी सभी की कहानी’मधला सत्यभाव अशी नवरसातील नवरंगी गाणी देत भरतजींनी "नवरंग' खुलवला. त्यानंतर आलेला याच टीमचा ‘स्त्री’. या चित्रपटातही भरतजींनी ‘कब आओगे प्राण प्रिया...’, ‘झिलमिल झिलमिल लहरों का आँचल...’, ‘तू ही मेरा सहारा...’,सारखी आशयसंपन्न गीते लिहिली. ‘गूंज उठी शहनाई’मध्ये पुन्हा एकदा वसंत देसाई यांच्या सुरेल चालींनी भरतजींची गीते बहरली. यातील ‘दिल का खिलौना हाय टूट गया...’, ‘आँखिया भूल गयी सोना...’, ‘तेरी शहनाई बोले, हौले हौले घुंघट पट खोल..., ‘मैंने पीना सीख लिया...’सारखी अवीट गोडीची गाणी भरतजींच्या अभिजात प्रतिभेची जाण देणारी ठरली.
एस. एन. त्रिपाठी यांच्याबरोबरही भरतजींचे चांगले ट्युनिंग जमले. ‘नैनों से नैनों की बात...’ आणि ‘मनभावन संगीत सुहावन...’(चंद्रमुखी), ‘आ लाैट के आ जा मेरे मीत...’, ‘रात सुहानी झूमे जवानी...’(रानी रुपमती) ही त्याची काही उदाहरणे. ‘जनम जनम के फेरे’मधले भरतजींचे ‘जरा सामने तो आओ छलिये...’ हे गाणे त्या काळी बिनाका गीतमालाचे टॉपर गीत ठरले होते. ‘ये कौन चित्रकार है...’(बूँद जो बन गयी ज्योती), ‘गोरी नैन तुम्हारे क्या कहने...’(पौर्णिमा), ‘तुम गगन के चंद्रमा...’(सत्यवान सावित्री), ‘चोरी चोरी मत देखो...’(अमरसिंह राठोड)सारखी लोकप्रिय गाणीही भरतजींनी दिली. हाँ दीवाना हूँ... म्हणत आलेल्या गीतकार भरत व्यास यांनी अशी निर्मळ भावांची अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत, त्यांची सर कशालाही न येणारी आहे.
kajaykulkarni@gmail.com