आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिकांच्या गळ्यातील 'बावरा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलशनकुमार मेहता. तो निव्वळ बावळट वाटायचा, दिसायचा. रेल्वेत लिपिक. यांच्या मनमार्गावर मात्र कवितांची गाडी धावायची. चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याचे त्याचे स्वप्न. तो सारखा स्टुडिओत चकरा मारायचा. संगीतकार कल्याणजी-आनंदजी त्या वेळी ‘सट्टा बाजार’ला संगीत देत होते. त्यांनी याला गीतकार म्हणून जबाबदारी दिली. या पठ्ठ्याने ती आनंदाने स्वीकारली. तुम्हे याद होगा कभी हम मिले थे...सारखे अविस्मरणीय युगुलगीत याच्या लेखणीतून उतरले. तो नेहमी फुलाफुलांचे रंगीबेरंगी शर्ट घालून वावरायचा. त्याचा हा बावळा वेश पाहून वितरक शांतीलाल पटेल यांनी त्याला नाव दिले- बावरा. झाले, गुलशनकुमार मेहता ‘गुलशन बावरा’ बनला. बावरा म्हणजे बावळट, वेडा. त्याच्या गुलशन लेखणीतून उतरलेल्या अनेक गीतांनी रसिकांना वेडं केलं आहे. त्याने आपल्याला मिळालेली उपाधी खर्‍या अर्थाने सार्थ ठरवली. साध्या, सोप्या, आशयघन शब्दांतून रसिकांच्या कर्णपटलातून काळजात उतरणारा हा गीतकार. विषय कोणताही असो, सिच्युएशन कोणतीही असो, गुलशन बावराने तो विषय त्यातील आशयासह रसिकांपर्यंत अगदी लीलया पोहोचवला. म्हणूनच हा ‘गुलशन’ रसिकांच्या गळ्यातील ‘बावरा’ ताईत बनला.

फाळणीचे दिवस. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला. लाहोरनजीकच्या शेखीपुरा गावात धर्मांधांच्या एका टोळक्याने लालचंद मेहताच्या हवेलीवर हल्ला केला. गुलशन तेव्हा अवघा दहा-अकरा वर्षांचा होता. त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या वडलांची, काकाची निर्घृण हत्या करण्यात आली. तो आणि त्याचा भाऊ कसेबसे तेथून निसटले आणि एका कारवाँसोबत भारतात आले. जयपूर येथे काही काळ बहिणीकडे राहिल्यानंतर भावाला नोकरी लागल्याने गुलशन दिल्लीत आला. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला रेल्वेत लिपिक पदाची नोकरी लागली. तो मुंबईत दाखल झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून कविता करणार्‍या गुलशनचे कविमन रेल्वेच्या खडखडाटात रमेना. त्याच्या गीतकार होण्याच्या स्वप्नाला मुंबापुरीत अधिक आशा वाटू लागली. त्याचे गीतलेखन सुरूच होते. त्याने मग स्टुडिओत चकरा मारण्यास सुरुवात केली. कल्याणजी वीरजी शहा यांनी त्याला पहिला ब्रेक दिला. ‘चंद्रसेना’ चित्रपटासाठी त्याने पहिले चित्रपट गीत लिहिले. लताच्या आवाजातील ते गीत होते, मैं क्या जानू कहां लागे ये सावन मतवाला रे... हे गाणे बर्‍यापैकी गाजले. कल्याणजी-आनंदजींबरोबर बावरा यांचे सूर जुळले. त्यातून अनेक अविस्मरणीय गाणी या त्रयींनी दिली. त्याचप्रमाणे आरडींबरोबर गुलशन बावरा यांची जोडी जमली. मुळात आरडी हा प्रायोगिक संगीतकार. त्याने चाल सुचवावी, नोटेशन द्यावेत आणि बावरा यांनी त्याबरहुकूम गाणी द्यावीत, असे समीकरण ठरले आणि जन्माला आली अवीट गोडीची गाणी. रसिकांना वेड लावणारी, वेडं करणारी.

मेरे देश की धरती सोना उगले(उपकार)मधली देशभक्ती असो, की यारी है इमान मेरा(जंजीर)मधला अतूट मैत्रीचा धागा असो, बावरांच्या लेखणीने त्याला चार चांद लावले आहेत. वादा कर ले साजना, तेरे बिना मैं ना रहू(हाथ की सफाई)मधला निर्व्याज प्रेमभाव, हमे और जीने की चाहत ना होती(अगर तुम ना होते)मधली ओढ, मौसम मस्ताना(सत्ते पे सत्ता)मधली प्रसन्नता, कस्मे वादे निभायेंगे हम(कस्मे वादे)मधला दृढ विश्वास, तू तू है वही, दिल ने जिसे अपना कहा(जो वादा रहा)मधली वचनबद्धता, सपना मेरा तूट गया(खेल खेल में)मधला अपेक्षाभंग, चांदी की दीवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड दिया(विश्वास)मधील प्रेमभंगाचे दु:ख, आती रहेंगी बहारे(कस्मे वादे)मधला आशावाद, जिंदगी मिल के बिताएंगे(सत्ते पे सत्ता)मधला एकात्मभाव, एक बात दिल में आयी है(राम तेरे कितने नाम)मधली निरागसता, जीवन के हर मोड पे(झूठा कहीं का)मधली सकारात्मकता, पीने वालों को पीने का बहाना(हाथ की सफाई)मधला खट्याळपणा, बना के क्यों बिगाडा रे(जंजीर)मधले नैराश्य, प्यार हमे किस मोड पे ले आया(सत्ते पे सत्ता)मधली प्रेमाची महती, बचके रहना रे(पुकार)मधला सावधपणा, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे(खेल खेल में)मधला बिनधास्तपणा, हमने तुमको प्यार किया है जितना, कौन करेगा उतना(दूल्हा दुल्हन)असा भाबडा सवाल विचारण्यासाठी बावरा यांचीच लेखणी हवी.

स्वत: पडद्यावर झळकायचे वेड गुलशन बावरा यांना होते. पवित्र पापी, प्यार की कहानी, शहजादासह अनेक चित्रपटांत ते पडद्यावर दिसतात. ‘जंजीर’मधील ‘दीवाने हैं दीवानों को’ या गाण्यात पेटी वाजवताना बावरा दिसतात. त्या काळी सर्वाधिक मानधन घेणार्‍या गुलशन बावरा यांनी कधीच तडजोड केली नाही. ते म्हणत, ज्यांना पाच हजार मिळाल्यानंतरही समाधान होत नाही, त्यांना पाच कोटी मिळाले तरी समाधान होणार नाही. त्यामुळे जे मिळते आहे त्यात समाधान मानून आनंदात जगावे. याच सूत्रावर त्यांनी फाळणीतील दु:ख विसरून गीतलेखन केले. ‘दुनिया मेरी जेब मे’मध्ये बावरा एका गाण्यात म्हणतात, ठोकर पे है सारा जमाना, जो बन जाए मेरा निशाना, क्योंकि सारी की सारी ये दुनिया मेरी जेब में... आता बोला! बावळट दिसणार्‍या या गीतकाराने आपल्या आशयघन गाण्यांनी रसिकांना वेड लावले, एवढे मात्र नक्की.
kajaykulkarni@gmail.com