आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मधाळ’ गाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडे अरमान से रखा है बलम तेरी कसम, प्यार की दुनिया में ये पहला कदम... असे जाहीर करत त्याने चित्रपटसृष्टीतल्या आपल्या आगमनाची वर्दी दिली. पुढे 40 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्याने हे बोल अक्षरश: खरे ठरवले. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक अवीट गोडीची, मनात सातत्याने रुंजी घालणारी गाणी लिहिणारा हा गीतकार. इंदिवर म्हणून तुम्ही-आम्ही याला ओळखतो. खरे नाव श्यामलाल. इंदिवर हे त्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले नाव. इंदिवर म्हणजे नीलकमळ. कमळ ज्याप्रमाणे आपल्यातल्या मकरंदाने भ्रमराला गुंग करते, त्याचप्रमाणे इंदिवरच्या गाण्यातला मधाळ गोडवा रसिकांचे भान हरपवतो.
‘मल्हार’ची गाणी गाजली आणि इंदिवरच्या काव्यप्रतिभेला जणू बहर आला. प्रेम, सुख, दु:ख, नदी, निसर्ग, मृत्यू अशा भावविश्वाचा नवा अर्थ त्याला उमगू लागला. विविध पद्य तरंगातून इंदिवरने हे भावविश्व अत्यंत भावपूर्ण आणि सोप्या शब्दांत आपल्या गीतातून रसिकमनापर्यंत पोहोचवले. आपल्या गाण्यांनी चित्रपट खुलला पाहिजे, त्या चित्रपटाचा बाज-भाव गीतातून रसिकांपर्यंत अचूक पोहोचला पाहिजे, असे मानणारा इंदिवर हा पहिलाच गीतकार. ‘सफर’मध्ये इंदिवर लिहितात, नदिया चले, चले रे धारा... तुझको चलना होगा... चित्रपटाचे कथानक असे एका गाण्यातून उलगडून दाखवण्याची किमया केवळ इंदिवरच करू जाणे. अशी अनेक गाणी इंदिवर यांच्या शब्दसामर्थ्याने अजरामर आहेत.
जिंदगी का सफर है ए कैसा सफर, कोई समजा नही कोई जाना नही (सफर) या गाण्यातून जीवनातील वास्तवतेचे भान तो करून देतो, तर मधुबन खुशबू देता है(साजन बिना सुहागन)मधून जीवन सार्थकी लावण्याचे तत्त्वज्ञान सांगण्यासही विसरत नाही. जीवन से भरी तेरी आँखे(सफर)मधून जीवन जगण्याचा वेगळा अर्थ तो सांगतो. ‘पास बैठो तबियत बहल जाएगी’(पुनर्मिलन)मधून तिच्या सहवासाची ओढ तो व्यक्त करतो. चंदन सा बदन (सरस्वती चंद्र) अशी अद्वितीय शब्दरचना इंदिवरच करू जाणे. समर्पक उपमा, कानाला सुखावत मनात घर करणारे मधाळ शब्द, बोलीभाषेचा उत्तम वापर ही इंदिवरच्या लेखणीची मुख्य बलस्थाने. तेरे चेहरे मे वो जादू है (धर्मात्मा) म्हणत तिच्या प्रेमात पडण्याचे कारण जसे इंदिवर सांगतो, तसेच ‘तेरा साथ है कितना प्यारा’ (जाँबाज) असे सांगत ‘हमने तुमसे प्यार किया है जितना कौन करेगा इतना’ (दुल्हा दुल्हन) असे तिला सांगण्याचे धाडस इंदिवरच करू शकतो. प्रेमातले मार्दव, ओढ, सहवास यावर भाष्य करताना इंदिवरची लेखणी जणू मोरपीस होते. प्रेमभंगातून आलेली निराशा, विश्वासघात सांगताना त्याची लेखणी थेट काळजाला हात घालते. कस्मे वादे प्यार वफा(उपकार)मधून हे सर्व सांगतो, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. अगदी जवळच्या व्यक्तीने केलेला घात वर्णन करताना इंदिवरची लेखणी अंगार ओतते, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है उम्रभर का गम हमे इनाम दिया है (आखीर क्यों) हे ऐकल्यानंतर हे पटते. कोई जब तुम्हारा हृदय तोड दे (पूरब और पश्चिम) असे प्रेमाचे उदात्त वर्णन करण्यासाठी इंदिवरचीच लेखणी हवी. केवळ प्रेमच नव्हे, तर मानवी नातेसंबंधावर इंदिवरच्या लेखणीतून अनेक अविस्मरणीय गानमोती आलेले आहेत. मैं तो भूल चली बाबूल का देस (सरस्वती चंद्र) हे गाणे आपल्याला विसरता येणे शक्य आहे का? प्रत्येक लग्नात आजही आवर्जून वाजणाºया मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियाँ (सच्चा झुठा)मधला सच्चा भाव आपल्या मनात कायमचा कोरला गेला आहेच की.
काळानुरूप बदल स्वीकारत नव्या पिढीच्या आवडीनुसार गीतलेखन करणारा व्यावसायिक गीतकार, असाही इंदिवर यांचा बºयाच वेळा उल्लेख होतो. ज्या काळात जे चालते त्यानुसार मी गाणी देणार, हे त्यावर इंदिवर यांचे उत्तर! आधी कल्याणजी आनंदजी आणि नंतरच्या काळात बप्पी लाहिरी यांच्यासोबत इंदिवर यांचे खरे सूर जुळले. जिंदगी को बहोत प्यार हमने किया मौत से भी मोहब्बत निभाऐंगे हम, असे सांगत मृत्यूशी दोस्ती करणारा अफलातून गीतकार आपल्यालाही सांगून गेला आहे, हम छोड चले है महफिल को याद आए कभी तो मत रोना... आता बोला. आपल्या अनेक गीतांमुळे रसिकांच्या मनात घर केलेल्या या गीतकाराने जीवनाची वास्तवता नेहमीच नेमक्या शब्दांत मांडली. प्रेमातील आर्जव आणि मार्दव मधाळ शब्दांनी खुलवणारा इंदिवर एके ठिकाणी म्हणतो... चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना..