आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॉबर्ट गिल: प्रियकरापलीकडचा प्रज्ञावंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार आणि त्याकाळात त्याला भेटलेली प्रेमिका पारो... हा चित्रकार, छायाचित्रकार आणि सैन्यात अधिकारी असलेल्या रॉबर्ट गिलच्या आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. 26 सप्टेंबर 1804 ला लंडनच्या बिशपगेट येथे जन्माला आलेला गिल वयाच्या 19 व्या वर्षी पी.पी.ग्रेलीमर यांच्या शिफारशीने जेम्स पॅटीस यांच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला. 1843 पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. तो लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होता. कोर्ट ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून 1 ऑक्टोबर 1844ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली. त्यात त्याला एक सहाय्यक ड्राफ्समन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले. 13 मे 1845 ला सतरा सुरक्षा जवानांसह तो अजिंठ्याला आला. अजिंठा परिसरातील सैन्य प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहात होता. सप्टेंबर 1845 ला त्याचे रंग व कॅनव्हास अजिंठ्याला आले. यावेळी स्थानिक भारतीय जमातीच्या पारो या भारतीय तरुणीशी त्याची ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. परंतु रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही. नोव्हेंबर 1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे सन 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला. रॉबर्ट गिलच्या एकूणच कामगिरीची दखल घेऊन 1 एप्रिल 1854 ला त्याला लष्करातील मेजर पदावर पदोन्नतीही देण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर रॉबर्टने चित्रनिर्मितीच्या कामातील दुसरा टप्पा सुरू केला. त्याच्या या चित्रनिर्मितीच्या दोन वर्षांत (1954-55) भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते. सन 1845 ते 1856 या 11 वर्षांच्या सहवासातून त्यांना कुठलेही अपत्य झाले नाही किंवा होणार होते असाही उल्लेख दिसून येत नाही. परंतु पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात अजिंठा गावात बांधली. ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत. आज या कबरीच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे! पारोच्या विरहाने रॉबर्ट गिल दु:खात आरपार बुडाला हे अर्धसत्य आहे. कारण वयाच्या 52 व्या वर्षी 1856ला तो अजिंठा येथे असताना अ‍ॅनी नामक स्त्री त्याच्या सहवासात आल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. अ‍ॅनीने रॉबर्टच्या सहवासात 26 फेब्रुवारी 1866 ला मिल्ड्रेड मेरी गिल या मुलीला व त्यानंतर रॉबर्ट (बग्गी) गिल या मुलाला मुंबई येथे जन्म दिला असल्याच्या नोंदी आहेत. सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. याच कालखंडात त्याने अजिंठ्याची 29 चित्रे साकारली. त्यातले शेवटचे चित्र जुलै 1863 ला त्याने पूर्ण केले. डिसेंबर 1866 ला तो अजिंठ्यात असताना त्याची चित्रे जळाली, त्यातली 1850 ते 1854 या कालखंडातील पाच चित्रे शिल्लक ती www.vam.ac.uk (http://collections.vam.ac.uk/item/O115446/oil-painting-copy-of-painting-inside-the/) वेबसाईटवर आजही पाहायला मिळतात. अजिंठ्याची चित्रकला आणि त्या अनुषंगाने रॉबर्ट गिलच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात घडलेल्या घटना हा त्याच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. त्यानंतर त्याने 1863 ला 200 स्टेरीओग्राफिक प्रकाशचित्रांची 200 दृश्ये लंडनला पाठवली होती. या फोटोग्राफीच्या माध्यमातून अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकला यांची प्रकाशचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. त्याची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली आहे. आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाइटवर ही प्रकाशचित्रे हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. दुर्दैवाने याची नोंद भारतातल्या कोणत्याही साहित्यिकाने किंवा प्रसारमाध्यमांनी घेतलेली नाही, ही खेदजनक बाब आहे. रॉबर्ट गिलच्या प्रकाशचित्रांमुळे हा ठेवा ख-या अर्थाने जगासमोर आला. ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. 1864 साली त्याच्या या प्रकाशचित्रांचा संग्रह असलेली “One Hundred Stereoscopic Illustrations of Architecture and Natural History in Western India, photographed by Major Gill”,, शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन व याच प्रकारचा दुसरा छोटा खंड जॉन मुरॉय यांनी प्रसिद्ध केला, त्याचं नाव होतं “The Rock-Cut Temples of India, illustrated by seventy-four photographs taken on the spot by Major Gill”, याचंही शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन यांनी केले होते. अर्थातच त्याचे काम केवळ अजिंठा या विश्वविख्यात नावापुरते सिमीत ठेवणे उचित ठरणार नाही. लोणार या जगप्रसिद्ध सरोवराची, अमरावतीच्या जवळ मेळघाटात असलेल्या जैन तीर्थक्षेत्र मुक्तगीरीच्या मंदिर-शिल्पसमूहाची सचित्र ओळख जगाला करून देणारा रॉबर्ट गिल हा जगातला पहिला प्रकाशचित्रकार आहे. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. www.users.globalenet.co.uk वर उपलब्ध माहितीनुसार 1867 ला तत्कालीन शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1868 त्याला शासनाने डेलमियर लेन्सचा कॅमेरा व केमिकल्स दिली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च 1870 ला हे काम पूर्ण केले आणि 1872-73 ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला दिला. एप्रिल 1879 च्या पहिल्या आठवड्यात खान्देशातल्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या एका दवाखान्यात रोबर्ट गिल उष्माघाताने फणफणत होता. त्यातच 10 एप्रिल 1879 ला त्याचे निधन झाले त्याच्या निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या दफनभूमीत त्याचे दफन करण्यात आले, तेथे त्याचे थडगे आजही आहे. अजिंठा चित्रपटाच्या निमित्ताने मी पुन्हा त्याच्या थडग्यावर गेलो त्याच्यावर एक पाटी मला कोरलेली दिसते... प्रत्येक 10 एप्रिलला सर्वत्र उन्हाचे लक्ष लक्ष प्रकाशकिरण पडलेले असताना त्याच्या या थडग्यात मात्र अंधार असतो. वर रात्र असो वा दिवस तिथं फक्त अवस असते. सर्वत्र त्याच्या रंगांची आतषबाजी सुरु असताना हा मात्र अंधार बनून राहिला आहे... किती वर्षे लोटली? अजून किती शिल्लक आहेत मित्रा ...? तप्त अंगार घेऊन उन्हाचे दिवस आले की, मी मानाने तुझ्या थडग्याभोवती घिरट्या घालू लागतो. अंधार बनून खानदेशच्या मातीत विलीन झालेला तू, केव्हातरी भेटशील या आशेनं माझ्यासकट सारे प्रकाशकण तुझ्यासाठी वर्षानुवर्षे थांबली आहेत... ranjitlrajput@gmail.com