आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या नव्या अनुवादित पुस्तकाबद्दल बोलताना डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली म्हणाले की, सामल सदाशिव राव म्हटले की, एक बहुभाषावेत्ता साहित्य व संगीताचा सव्यसाची असलेले, अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येते. उर्दू, फारसी, अरबी, तुर्की, हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत अशा अष्टभाषा प्रावीण्याने त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे. 2011 मध्ये त्यांनी स्वरलयलू म्हणजे स्वरलय हा तेलुगू ग्रंथ लिहिला. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात केसरबाई केरकर, हिराबाई बडोदेकर, गंगुबाई हनगल, बेगम अख्तर, पंडित भीमसेन जोशी, बालगंधर्व, सवाई गंधर्व, पंडित जसराज, बडे गुलाम अली खाँ, उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबरोबरच संगीताच्या विशेष घराण्यांचीही माहिती आहे. संगीतातील आग्रा घराणे, भेंडीबाजार, इंदूर, मेवाड, बनारस अशा घराण्यांची माहिती यात आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर अनेक पुस्तके आहेत. त्यात हे पुस्तक संगीततज्ज्ञांना संदर्भासाठी महत्त्वाचे ठरावे.
अन्य भाषिक संगीततज्ज्ञांनी कोणती पुस्तके लिहिली आहेत याची माहिती अनेकांना असतेच असे नाही. या पार्श्वभूमीवर सामल सदाशिव राव यांचे हे अनुवादित पुस्तक येत आहे. यात अनेक ज्येष्ठ व प्रसिद्ध गायकांचे किस्से व जुन्या आठवणी आहेत. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायकांच्या आठवणीबरोबरच सामल सदाशिव राव यांच्या अभ्यासपूर्ण साहित्याचा परिचयही या निमित्ताने मराठी वाचकांना घडेल, असे डॉ. बोल्ली म्हणाले.
सामल सदाशिव राव यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 85 होते.त्यांची 25 पुस्तके प्रकाशित झाली. त्यांची पत्नी सुलोचना या महाराष्ट्रीयन असल्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांनी केला. ते मुंबईला स्थायिक झाले. ठुमरी, गझल, रुबाया यावर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे, असे बोल्ली यांनी सांगितले.
शब्दांकन - अमोल अंकुलकर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.