आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हायाच्या सुट्या लागल्या शाईले की आम्हाले गावाले जायाचे वेध लागून जात व्हते. उन्हायाच्या सुटीत आखाजी येत व्हती. आखाजीने आम्ही मामाच्या गायी जात व्हतो. मायले बी आशा लागून जात व्हती आखाजीच्या सणाची. आमच्या खान्देशात धूमधडाक्यात साजरा व्हत व्हता आखाजीचा सण. दिवाईपेकशाबी आखाजीची धामधूम जास्ती राहात व्हती. उन्हाया आसल्यानं शेतीबाळीची कामं उरकून जायेत राहात व्हती. झालं लग्न यावांच्ही गरदी कमी हून जायेल राहात व्हती. आशानं आशा मोडाख्यावर वैशाख शुद्ध तृतीयाचे आखाजी येत व्हती. आखाजीची तयारी तशी मयन्हाभर आधीपासून सुरू हून जात व्हती. आखाजीले सासुरवाशिनी माहेरी येत व्हत्या. त्या माहेरी येतीच तेव्हा स्वागताची तयारी केल्हया जात व्हती. क-होडे, पापडं, बिबड्या, शेवाया, कुरडाया आशानं आसं करून ठिवल्या जात व्हतं त्येंच्यासाठी. घरदार सारवून पोतारून सावरून ठिवल्या जात व्हतं. मडक्यांच्या उडतनी भरून ठिवल्या जात व्हत्या. सासुरवाशिनी चार-आठ दिवस आधीच येत व्हत्या माहेरात. त्या आल्यावर कान्होले, सांजो-या तयल्या जात व्हत्या. शेवाया, कुरडाया आन् आमरस पुरणपोळीचा पाहुणचार व्हत व्हता. बाळगोपाळांसगट मस्त पंगती झडत व्हत्या. माहेरवाशिनी झोक्यावर बसून गाणे म्हणत व्हत्या. त्येंच्या गाण्यांचे सूर या गल्लीतून त्या गल्लीत घुमत व्हते. गाव कसं हुरळून जात व्हतं.
दूरदूर सासर असलेल्या माहेरवाशिनींच्या भेटी घडत होत्या. गप्पांचा फळ सरता सरत नव्हता त्येंचा. आपुलकीनं एकमेकींच्या चौकशा करत व्हत्या. जिवाभावाच्या मैत्रिणी भेटत व्हत्या. माया, ममता वसांडून वाहात व्हती घराघरातून, मनामनातून.
या आनंदाचा आस्वाद आम्ही लेकरं मनमुराद घेत व्हतो. मामाच्या घरी गेल्हो तरी आमच्यासाठी आनंद राहात व्हता, आन नही गेल्हो तरी आनंद राहात व्हता. काहून की आमच्या घरी बी आखाजी साजरी व्हत व्हती. माय परत्येक आखाजीले माहेरी जात व्हती, आसं नव्हतं. कधीकधी त्ये सासरच्या घरी आखाजी साजरी करत व्हती. सासू-सास-यांची आगारी टाकत व्हती. श्रद्धेनं घागर भरत व्हती. माहेरी आलेल्या नंदांचंही आवभगत करत व्हती. चार-पाच नंदा व्हत्या मायले. तिच्यातल्या तीन्ही चा-ही तरी हामखास टपकत व्हत्या आखाजीले. त्या, त्येंची लेकरं आसं सम्दं बि-हाड उतरत व्हतं. चिल्या-पाल्यांन्हं घर भरून जात व्हतं. त्या सम्यायचा खोर काढत व्हती माय, आनंदानं सन साजरा करत व्हती.
नंदांसाठी माय शेवाया कुरडाया करून ठिवत व्हती. गहू इकत घ्यायची आयपत राहात नव्हती तिची ताव्हा. म्हणून मंग मोलमजूरी करून गहू कमावत व्हती. कष्ट क-याले माय मांघी सरत नव्हती. मघ्या नंदा येतीन आय, त्येंच्यासाठी गोडधोड करीन, मायेनं खावू घालीन त्येंव्हे, मानानं न्हावू घालीन, साडी-चोळी नेसवून वाढी लाइन. आशानं आशी कामना राहात व्हती तिची. त्येवढ्यासाठी माय झटत व्हती. आखाजीची तयारी करत व्हती. तव्हंढ्यासारकी राबत व्हती त्येंच्यापुढी, भांडेकुंडे नेटनेटके ठिवत व्हती. माय जशी नंदांल्हे जीव तावत व्हती तसा बाप बी बहिणींसाठी जीव तोडत व्हता. बहिणी-भाच्यांसाठी खायाले घरात गोडधोड आणत व्हता. कामधंदा खेडून बहिणींच्या तोंडापुढी बसत व्हता. दिवस दिवसभर बोलत बसत व्हता त्येंच्याशी. बालपणीचे दिवस आठवत व्हते बापाले तव्हा. त्येंच्या लहानपणीच्या गोष्टी येत व्हत्या ताव्हा उजीडात.
आम्ही आन् आमच्या आत्याचे पो-हं लयलय मस्त्या करत व्हतो. दंगलच उसळत व्हती जणू घरात. मस्त्या करून, खेळ खेळून दमतो की माय आम्हाले सांजो-या, कान्होले, करंज्या, शंकरपाढे असे गरमागरम देत व्हती. गोडधोड खायची मजा येत व्हती. घरामांधी आमच्या पिंपळाचं झाड व्हतं. झाडाले त्या उंच झोके बांधून देत व्हता. दुफारच्या भर उन्हात बहिणी तठी झोके खेत व्हत्या. झोक्यावर बसून भावाचे गाणे म्हणत व्हत्या. काय करू अन् काय नही बहिणींसाठी आसं बापाले वाटत व्हतं. खिशात आशिन नशिन त्येवढी रक्कम बहिणींसाठी खर्च क-याची तयारी राहात व्हती त्येची. गोडधोड जेवन आसो का भर दुफारच्या रणरणत्या उन्हात थंडगार गुल्फ्या खावाडन्या आसो, हात आखडता घेत नव्हता तो.
जसजसा आखाजीचा सन जवळ येत व्हता तसतसा उत्साह वाहून जात व्हता बापाचा. घरामंधी तो न्यारन्याज्या वस्तू आनंत व्हता. आझून एक राहात व्हतं तेंच्या मनात, त्ये म्हंजे आखाजी झाल्यावर बहिणींल्हे वाटी लावताना त्येल्हे भारीतल्या भारी साळी-चोळीचा आहेर देणे. त्यासाठी पैसा जमा करून ठिवत व्हता तो. त्या पैशांतून थोडेफार सयपाकपाण्यावर खर्च व्हत व्हते. बाकीचे बहिणींच्ह्या साळी-चोळीसाठी राखून ठिवत व्हता. त्या पैशांल्हे हात लावत नव्हता बाप. पण व्हत काय व्हतं, जसजशी आखाजी जोय येत व्हती तसतशी तगमग वाढून जात व्हती बापाची. तोंडाते पाणी सुटत व्हतं त्येच्या.
गावात पत्ता जोरात चालत व्हता आखाजीच्या दिसात. जसजशी आखाजी जोय येत व्हती त्येचा जोर वाढून जात व्हता. काही काही कानावर येत व्हतं. आमुक एवढे जिकला. ढमुक तेवढे जिकला. तसा बापाले पत्ता कुट्याचा नांद नव्हता, सालभर तो चुकून पत्त्याच्या डावाकडी जात नव्हता. पण आखाजीच्या सनाले परत्येकझन पत्त्याची वाट चोखाळत व्हता. गावातला कोन्ही आसो या डावातून सुटत नव्हता. प्रथाच व्हती तशी. तिल्हे कोन्ही अवहेरू शकत नव्हता. बहिणींसाठी ‘झोका’ आन् भावांसाठी ‘पत्ता’ आसं आखाजीचं महत्त्व व्हतं! आखाजीले माहेरवाशीन जशी झोक्यावर बशासाठी आसूसलेली राहात व्हती तसा भावू पत्ता खेळण्यासाठी तरफडा करत व्हता. गावातला हर गडीमाणूस पत्त्याच्या डावात रमून जात व्हता. मझ्या बापबी येल्हे आपवाद राहात नव्हता. आखाजी जवळ आली की तो तरफडा क-याले लागून जात व्हता. आपोआप पाणी सुटत व्हतं तोंडाले त्येच्या, नही म्हनलं तरी मन धाव घेत व्हतं.
सालभर बाप पत्त्याले हात लावत नव्हता. आखाजीच्या दिशी मातर नाट मोड्या म्हणून जात व्हता. प्रथा म्हणून जात व्हता. दुसरं म्हन्जे मनात आशा राहात व्हती. जिकलो कधी तं भारीतली भारी साळी-चोळी घ्यून देता इन बहिणींल्हे. आन्धी दोन दिवस मुक्काम वाढवता इन त्येंच्या. आनंदी आनंदात भर पडीन.
आशानं आशा आपेकशा सपनांच्हा डोलारा घ्यून जात व्हता बाप पत्याच्या डावाकडे. आखाजीचा दिवस आसल्यानं कोन्ही इरोध करत नव्हतं कोन्हाले. माय बी आडवत नव्हती बापाले. आखाजीच्या आंधारात इवलासा किरण तपापत व्हता तिच्या डोयांपुढी. पण कशानं काही व्हत नव्हतं. उलट जवळचं साठवेल किडीकमिडीक बाप पत्त्यात हारून जात व्हता. कशानं काही खरं व्हत नव्हतं. लयन्ही व्हत नव्हती बापले आखाजी. दात इचकत घरी परतत व्हता तो.
दुस-यी दिशी बिच्या-या बयन्ही इरमयेल तोंडानं सासरचा रस्ता धरत व्हत्या...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.