आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshada Gandurde Article About Equal Opportunity

मुलींची मर्यादा कुणी ठरवली?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्मा आली लेक|
बाप म्हणती कचरा|
आई म्हणती असूद्या|
माझ्या जीवाला आसरा|
नमस्कार! मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. मी सरकारी शाळेत जाते. मी लहानपणी मुंबईत मामाकडे असायची. अकरा वर्षांची झाल्यावर आई मला नाशिकला घेऊन आली. मुंबईत होते, तेव्हा माझे विचार अगदी शहरी लोकांप्रमाणे होते. मुलामुलींमधला भेदभाव तिथे जाणवला नाही. तेव्हा मला माहीत नव्हते, मुलामुलींमध्ये भेद असतो कारण तेव्हा मी लहान होते. बघायला गेलं तर आता मुलामुलींमध्ये भेदभाव दिसत नाही. संधी, समानता, स्वातंत्र्य, हक्क किंवा अधिकार यांमध्ये मुलींना मुलांसारखा सन्मान आहे. यामध्ये काहीही फरक नाही, असे शहरी लोकांना वाटते. नाशिकही एक शहर आहे, पण शहरातील ठरावीक भागांत प्रत्येक गोष्टीला समदृष्टीने बघण्याचा उल्लेख करतात. मीही अशाच एका भागामध्ये राहते.
आता मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन, त्या वाचून तुम्ही म्हणाल हे अजूनही चालू आहे! सरकारी शाळेत गरीब घरातील मुले येतात. दुसरी-तिसरी किंवा सहावी-सातवी शिकून झाल्यावर मुलांना घरी ठेवणे हे आता प्रत्येक घरात होत नाही. कारण लोक आता शिक्षणाविषयी सजग झाले आहेत. पण काही लोक मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध घरी बसवतात. नंतर घरातील कामात जुंपून देतात. मग ती मुलगी १६ -१७ वर्षांची झाली की तिचे लग्न उरकतात. त्यानंतर वर्ष- दीड वर्षात ती आई होते, नवरा चांगला असेल तर ठीक नाही तर मारझोड, भांडण किंवा नवरा दारू पितो, सासू-सासरे त्रास देतात, असे कानावर पडते. पण हे सगळे का होते? तुम्हाला माहीत आहे का? मी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
आईवडिलांना वाटते, मुलगी जास्त शिकली तर वाईट वळणाला लागेल, तिला घरातलं काम येणार नाही, उद्या तिचे लग्न होईल तेव्हा तिला काम नाही आले तर, कसं होईल या मुलीचं! लोक काय म्हणतील. नक्कीच आईवडिलांना दोष. खूप लाडावून जास्त शिकवलं नी घेतलं स्वतःच्या गळ्यात पाडून.
पण तुम्ही मला सांगा, त्या मुलीची मर्यादा ही लग्न आणि संसारापर्यंतच आहे, हे कोणी ठरवले? आई शिकलेली नाही तरी ती म्हणते शीक. लग्न नाही केलं तरी चालेल, मग इतर लोक असा विचार का नाही करत. कितीही शिका, पण लग्न करा असे का? एखाद्या मुलीने लग्न नाही केले आणि शिकली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली तर खूप लोक तिची प्रशंसा करतील, पण तिने लग्न नाही केले तर तिच्याकडे बघण्याच्या नजरा बदलतात. तिला सौभाग्याचे लेणे नाही मिळाले, तिला मातृत्व नाही मिळाले, असे म्हणून तिच्या चुका काढतात. पण असे का? त्यांच्यामधील चुगलखोर वृत्ती किंवा त्यांचे विचार अजूनही मागासलेले आहेत.
१५९८ ते १७९५ या काळात होऊन गेलेल्या जिजाऊ भोसले, अहिल्याबाई होळकर या दोघी जणी पतीच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत, कारण त्यांनी समाजकल्याणाला जास्त महत्त्व दिले. तसेच सध्याच्या काळातील महिला लग्न न करता समाजकल्याणासाठी आपले जीवन का नाही देऊ शकत? त्यांचे मन असूनसुद्धा आईवडिलांच्या दबावामुळे त्या हे करू शकत नाहीत. समाजाने याकडे बघण्याची दृष्टी बदलली तर नक्कीच आईवडील या गोष्टीला मंजुरी देतील. शहरातील माणसे आपल्या विचारांमध्ये जेवढी उन्नती करत आहेत, तेवढेच ग्रामीण भागातील लोक पूर्वीच्या विचारांतून तसूभरही हलण्याचा प्रयत्न करत नाहीत.
माझे आईवडील आम्हा दोघी बहिणींना खूपच पाठिंबा देतात. त्यांनी आम्हा बहिणींना जन्म दिला. आजपर्यंत आमच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही, या गोष्टींचा मला आनंदच नव्हे, तर अभिमानच आहे. म्हणतात ना आगीतून गेल्याशिवाय सोन्याला आकार व सौंदर्य प्राप्त होत नाही. तसेच गरिबीतून गेल्याशिवाय मुलामुलींमधील गुण व महत्त्वाकांक्षा
जागणार नाहीत. याच मुलामुलींवर आपल्या देशाचे भविष्य आहे.