आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळच्या दयाराम शिवदास विद्यालयातील उपशिक्षिका सीमा भारंबे यांनी साहित्य सेवेचा वसा जोपासला आहे. ‘पॅराप्लेझिया’ नावाच्या दुर्धर व्याधीने ग्रासलेल्या पतीला आत्मिक बळ देण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यावर त्या ‘लढा’ ही कादंबरी लिहीत आहेत. कादंबरी लिखाणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, लवकरच ती वाचकांच्या भेटीला येणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीचे तुणतुणे तर सारेच नेभळट लोक वाजवत असतात. कारण त्यांच्या हातात तेवढेच असते. वाजवत बसणे, गळा काढून रडणे आणि सारे खापर परिस्थितीच्या माथी फोडून पळ काढणे. मात्र, माणसाच्या अंगी असलेली ही प्रवृत्ती बदलली पाहिजे म्हणून सीमा भारंबे यांनी ‘लढा’ कादंबरी लिहिण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. पती चेतन बोरोले यांना अपघातानंतर ‘पॅराप्लेझिया’ (शरीराचे अवयव निकामी होणे) व्याधी जडली. तिच्यावर मात करण्यासाठी कोणकोणते शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत? व्याधीने ग्रस्त असतानाही आपला पती चेहर्यावर कोणत्याही प्रकारचे दु:ख का दिसू देत नाही? त्यांच्या अंतर्मनात कुटुंबाविषयी सुरू असलेली घालमेल काय? हे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
यश अन् अपयश आपल्या हातात नसते; पण यशस्वी प्रयत्न करणे आपल्या हातात निश्चितच असते. दु:खानुभवाचे सूर माणसाच्या मनाला जागं करतात. शब्द काय किंवा सूर काय, जेव्हा अनुभवाच्या दु:खगंधातून उचंबळून येतात, तेव्हा ते अधिकच मधुर होतात. मात्र, त्यासाठी गरज असते ती धैर्याने लढा उभारण्याची, हा संदेश त्या नव्या धाटणीच्या कादंबरीतून समाजमनाला देऊ इच्छितात. पत्नीने आपल्या पतीच्या शुश्रूषेसाठी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले पाहिजे. व्याधी दुर्धर असली तरी एके दिवशी तिचे निराकरण होईलच, अशा सकारात्मक दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे, असं हळव्या शब्दात सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे, हे कादंबरीचे हस्तलिखित पानं चिकित्सकपणे वाचल्यावर सहज लक्षात येते.
ध्येय हे चित्राच्या चांदणीसारखे दूरस्थ असाध्यच दिसते; पण म्हणून ध्येयवादी हताश होत नाही, तो झेपावतोच. हरलो असे वाटले की हार ठरलेलीच असते. हरलो नाही असे वाटेपर्यंत खेळत राहिलो तर विजय मिळतोच, हाच विचार डोळ्यासमोर ठेवून माणसाने लढले पाहिजे, असा संदेश आपल्याला या नव्या कादंबरीतून द्यायचा आहे, असे भारंबे या आवर्जून नमूद करतात.
अस्सल जाणिवेच्या दर्जेदार कथांमधून उद्बोधन आणि प्रबोधन होत असते. वैचारिक ग्रंथांनी, विद्वत्ताप्रचुर भाषणांनी जो परिणाम साधला जाणार नाही, तो कथालेखनाच्या शैलीतून साधला जातो. म्हणूनच सीमा भारंबे यांनी चंद्रग्रहण, कुंकवाचा धनी, चक्रव्यूह, परिणाम, दाग, अर्घ्य, मैत्री यासह सामाजिक आशय मांडणार्या 10 कथा लिहिल्या आहेत. सामाजिक संवेदना चेतवणार्या या कथांचा समावेश असलेला त्यांचा ‘चंद्रगहण’ हा नवा कथासंग्रहसुद्धा लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
आयुष्याच्या वाटेवर येणारे गोड, कटु अनुभवांचे मिश्रण असलेला त्यांचा ‘नियती’ कथासंग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. मोजक्या शब्दांत आपला विचार समाजापर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी कल्पना, वास्तविकता, व्यक्तिचित्रण अशा त्रिवेणी संगमाचे दर्शन ‘मोगर्याची फुले’ या काव्यसंग्रहातून घडवले आहे. त्यातील ‘मायानगरीच्या गर्दीत या मज माणूस दिसला भला, गांधी टोपी अन् पांढरा सदरा तो आहे मुंबईचा डबेवाला’ ही कविता त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भुसावळातील कार्यक्रमात ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’चे सरचिटणीस गंगाराम तळेकर यांना फ्रेम करून भेट दिली होती.
तळेकरांनी कौतुक करून जी शाबासकीची थाप दिली, त्यातून नव्या उभारीने पुन्हा लिहिण्याचे बळ मिळाले. पती चेतन बोरोले यांची अक्षरांशी जी निखळ मैत्री आहे, त्यातूनच ‘लढा’ कादंबरीच्या माध्यमातून अतिशय नाजूक विषय हाताळण्याचे बळ मिळते आहे, असेही त्या नव्या लेखनाच्या संदर्भात नमूद केल्याशिवाय राहत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.