आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत नव्या पुस्तकांचे: सार्थकी आयुष्याचा गौरव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या वडिलांच्या ऋणातून तसे पाहता कोणीही मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांच्यावर आठवणीपर लेखन करून काहीतरी उतराई होण्याचा प्रयत्न प्रा. बाळासाहेब बोरसे यांनी आपल्या वडिलांवरील (रघुनाथ बोरसे) सार्थक या पुस्तकाचे संपादन करून केला आहे. मनोगत अर्पणपत्रिका आणि रघुनाथ बोरसे यांनी लिहिलेले माझी जडणघडण हे प्रकरण खूपच सुंदर व प्रामाणिक मनोगत आहे. पुस्तकात बाळासाहेब बोरसे यांचे संपादकीय तसेच त्यांच नाते पिता-पुत्राचे, तपस्वी पी.एस.आय, आमचे बोरसे दादा, माझे व्याही दादासाहेब बोरसे, दादा एक स्नेही, माझे पोलिस वर्दीतील वडील, आमचे पोलिस दादा, आमचे रघुनाथ तात्यासाहेब, संस्मरणीय व्यक्तिमत्त्व : माझे मामा, माझे सासरे :दादा, दादांचे विचार आदी प्रकरणांसह दादांची मुले, सुना, नातवंडे-पतवंडे आणि वंशावळ देऊन घराण्याचा वर्तमान इतिहास नोंदवण्याचा हा थोडा व्यक्तिगत कुटुंब, आप्तेष्टांपुरताच हा मर्यादित प्रयत्न रंजक झाला आहे. रघुनाथराव बोरसेंचे व्यक्तिचित्रण तर अफलातून झाले आहे. पुस्तकात छायाचित्रेही आहेत. गावाकडल्या गोष्टींची आठवण यात आहे. प्रत्येकाला असे लेखन वाचून आपणही असे करावे, अशी प्रेरणा देणारे हे नितळ-सहज लेखन आहे. प्रा. डॉ. एकनाथ पगार, देवळा, जि. नाशिक यांची मलपृष्ठावरील छोटेखानी प्रस्तावना थोडक्यात व्यक्ती-विचार परीक्षण करते.
संपादक - बाळासाहेब बोरसे, प्रकाशन - साक्षी प्रकाशन, औरंगाबाद.,
पृष्ठसंख्या - 108, मूल्य - 150 रु.


‘छत्रपती संभाजी गीता’
जिजाऊ माता, शिवाजी महाराज, शंभुराजे ही महाराष्ट्राची दैवते आहेत. ‘छत्रपती संभाजी गीता’ हे काव्यमय पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचे लेखक रामदास बयाजी दळवी पाटील यांनी संभाजीराजांच्या जीवनावर काव्यमय लिखाण करून मराठी साहित्यात मोलाची भरच टाकली आहे. संभाजीराजांचे कार्य अफाट, त्यांचा पराक्रम व धर्मावर निष्ठा अपार होती. त्यांचे जीवन व कर्तृत्वाची समाजाला ओळख झाली पाहिजे. हाच उद्देश या काव्यमय पुस्तकाचा आहे.
लेखक - रचनाकार- रामदास बयाजी दळवी पाटील
प्रकाशन- कैलास पब्लिकेशन्स, किंमत- 200 रुपये, पृष्ठे- 224


वाचकांशी समरस होणारे अंगणातले दिवस
प्राइस, फाशी, आक्रमण, बाकी सारा अंधार, अस्तित्व, महाकवच, महामंत्र, बीजं उद्याची, शापीत खुबा, अलौकिक स्त्री, वेध अशा सत्तरहून अधिक लोकप्रिय कादंबर्‍या लिहिणारे भास्कर देशमुख यांचे हे नवे पुस्तक थोडे वेगळे आहे. प्रथम पुरुषी एकवचनी पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकाला नगर जिल्ह्यातील मांडवगण या पुरातन गावाची पार्श्वभूमी लाभली आहे. गावातील सिद्धेश्वराचं मंदिर, घर, शाळा, शाळेतील निरोप समारंभ, शाळेतील मुली, ग्रंथालय, हिवाळ्यात भरणारी यात्रा, त्यासाठी करावा लागणारा बैलगाडीतला प्रवास, गाणी ऐकवणारा ग्रामोफोन, जनावरांचे डॉक्टर अशा वळणांनी कथानक पुढे सरकते. कथानकाला साजेशी रेखाचित्रे दिल्याने वाचक त्याकाळाशी लगेच समरस होतो. या पुस्तकातील प्रसंग वाचकांना आपल्या जीवनातही घडले असावेत, अशी अनुभूती देतात.
लेखक- भास्कर देशमुख, अहमदनगर, मनोरमा प्रकाशन, मुंबई, पाने - 212, मूल्य - 225 रुपये