आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदाहरणार्थ 70 एम.एम.नेमाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदीच्या मुळांचा किंवा ऋषीच्या कुळाचा शोध कधी संपूच नये आणि त्या प्रक्रियेत रोज नवं, नजर विस्फारणारं काहीतरी हाती लागत जावं, असं काहीसं मराठी विश्वात ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडेंबाबत घडत आलं आहे. त्यांचे चाहते, त्यांचे अनुयायी, त्यांचे टीकाकार, त्यांचे कट्टर विरोधक गेली कित्येक वर्षं या भाषाप्रभूचं भाव आणि विचारविश्व समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आले आहेत. कुणाला त्यांना जागतिक साहित्याच्या चश्म्यातून तोलायचं आहे, कुणाला सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यातून त्यांच्या विचारांचं विच्छेदन करायचं आहे...
मात्र, भटक्या-विमुक्त लोककलावंताच्या जातीत जन्मलेल्या नवतरुण अक्षय इंडीकरने परिस्थितीला शिंगावर घेत नेमाडेंवर ‘उदाहरणार्थ नेमाडे’ नावाची फिल्म बनवलीय... त्याचाच हा लेखाजोखा...
एप्रिल २०१४. स्थळ फिल्म इन्स्टिट्यूटची माझी खोली. मी आरशासमोर उभा राहून, मला सांगायच्या मुद्द्यांची उजळणी करत होतो... मन धास्तावलं होतं.
उणंपुरं साडेपंधरा वर्षाचं वय असताना सोलापूर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षण घ्यायला आलो होतो. त्या दिवसापासून गेली दहा वर्षे ज्यांच्या साहित्याने मनावर मोहिनी घातली होती, त्या भालचंद्र नेमाडे यांच्याकडे त्यांच्या ‘देखणी’ कवितासंग्रहामधल्या कवितांचा ‘यात्रा’ नावाच्या माझ्या पहिल्या पूर्ण लांबीच्या मराठी चित्रपटामध्ये वापर करण्याची परवानगी मागण्यासाठी आणि ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या त्यांच्यावरच्या चित्रपटाची कल्पना ऐकवण्यासाठी, कधी अचानक उगवणारे तर कधी लुप्त होणारे रस्ते, ढगांचे थवे, उन्हं आणि धर्मनिरपेक्ष गर्दी अंगावर घेत, पुणे-मुंबई असा रेल्वेच्या जनरल बोगीतला प्रवास करत निघालो...
जगात तुम्ही कुठेही राहात असला, तरी मुंबईत तुमचा किमान एक मित्र असला पाहिजे, असं नेमाडेंनी म्हणून ठेवलं आहे, ते मुंबईत पाऊल ठेवल्यावर आठवलं...
आपल्या अस्तित्वाला दडपून टाकणाऱ्या मुंबईची अक्राळविक्राळ व्यवस्था बघत साहित्य अकादमीच्या ऑफिसात पोहोचलो. मनात अनेक विचार गोंधळ घालत होते. त्यात नेमाडेच का? त्यांच्या साहित्याने मला काय दिलं? त्यांच्या थेट बोलण्याने त्यांनी ओढवून घेतलेले वाद, अनेकांनी प्रयत्न करून न जमलेली त्यांच्यावरची फिल्म वगैरे वगैरे. असं सगळं असताना हा जगविख्यात भाषाप्रभू आपल्याला काय म्हणेल, याची प्रचंड धाकधूक मनात होती.
साहित्य अकादमीचं ऑफिस. सकाळचे दहा वाजले होते. लगबगीने नेमाडेबाबा आले. आपल्या लांबसडक बोटांनी हस्तांदोलन करून, ‘या अक्षय बसा...’ असं खूप प्रेमाने स्वागत करते झाले. शेजारी बसवून आस्थेने चौकशी करून घेतली. मुंबईतले रस्ते, लोकलचा मार्ग, नाष्टा झाला का, तू मुळचा कुठला वगैरे वगैरे बोलत राहिले. मनावरचं दडपण थोडंसं कमी झालं. मी २४ वर्षांचा पोरगा आणि ते जवळपास ७६ वर्षांचे ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिक. पण आमच्यातलं वयाचं अंतर सुळ्ळकन गळून पडलं. मी २५ वर्षांच्या ‘पांडुरंग सांगवीकर’शीच बोलत असल्यासारखं मला वाटू लागलं. त्यांनी विचारलं, काय काम बोला? मी म्हणालो, तुमच्यावर एक ‘उदाहरणार्थ नेमाडे’ नावाची फिल्म करायचीय. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने; ज्यात तुम्ही स्वतः जसेच्या तसे असणार आहात. तुमच्या कादंबरीमधील नायक, तुमच्या कविता, लोकसंगीत, आणि अनेक क्षण, प्रसंग यांनी बनलेली ही फिल्म असणार आहे. त्यांनी माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तत्काळ होकार दिला. कर तुला जशी करायची तशी फिल्म कर. सिनेमातला प्रत्येक शॉट संपूर्ण ताकदीने घे, जसा मी माझ्या कवितेतला प्रत्येक शब्द ताकदीने वापरतो तसा, असा सल्ला देऊन, माझ्या ‘यात्रा’ या सिनेमासाठी ‘देखणी’मधील हव्या त्या ओळी वापरायचीसुद्धा परवानगी देऊन टाकली. आणि म्हणाले, अक्षय, तुझ्याएवढा असतानाच मी ‘कोसला’ लिहिलीय. तू व्यवस्थित समजू शकतोस ती भावना...
माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. माझे हातपाय आनंदाने थरथर कापत होते. ज्या गोष्टीसाठी महिनाभर मी तयारी करत होतो, ती गोष्ट अशी काही मिनिटांत साध्य होईल, अशी कल्पना स्वप्नातसुद्धा केली नव्हती. ज्यांचं साहित्य मी मुग्ध होऊन वाचत होतो, पचवत होतो, त्या विलक्षण कलावंतासोबत माझी ‘यात्रा’ सुरू झाली होती. मात्र ‘यात्रा’ ही फिल्म बाजूला सारून मी ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या फिल्मच्या यात्रेत सामील झालो होतो. नेमाडेंनी तीन दिवस चित्रपटासाठी देण्याचे कबूल केले होते, मात्र त्या तीन दिवसांचे २५ दिवस कधी होत गेले, ते समजलं नाही आणि २०१५ हे पूर्ण वर्ष माझं ‘नेमाडमय’ होऊन गेलं...

अस्तित्ववादी चिंतातुरता, परकेपण, स्थलांतर, शेकडो जिवंत व्यक्तिरेखा, अशा थीम घेऊन साहित्य निर्माण करणाऱ्या या अस्सल देशीवादी माणसाला सिनेमातून सलाम कारायचं माझ्या मनात कधीपासूनच होतं. ‘एफटीआयआय’चं शिक्षण अडीच वर्षांनंतर व्यक्तिगत कारणांनी सोडलेलं असलं, तरीसुद्धा त्या अडीच वर्षांच्या काळात मी दररोज एक, याप्रमाणे जागतिक आणि देशी सिनेमा अधाश्यासारखा बघत होतो. त्या सगळ्यातून पहिल्या डॉक्युफिक्शन फिल्ममध्ये काय काय गोष्टी करायच्या, यापेक्षा काय काय नाही करायचं, हे जास्त प्रकर्षाने डोक्यात येत गेलं. सगळ्या कादंबऱ्यांचं पारायण तर झालंच होतं, ‘देखणी’मधल्या कविता अक्षरश: तोंडपाठ होत्या, आता या फिल्मसाठी त्यांच्यावर लिहिलेली ओळ न् ओळ मी मिळवून वाचत होतो. या महान माणसाला चित्रपटातून कसं मांडायचं, याचा आराखडा डोक्यात येत होता. मात्र, तसं करताना होणारी अवस्था बघता, हत्ती आणि सात आंधळ्यांची कथाच सारखी-सारखी आठवत होती. पण नेमाडेंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला अधिकाधिक मोठं धाडस करायला भाग पाडत होता. अक्षरश: तीस दिवस त्यांच्यावर आम्ही आमचा कॅमेरा रोखून ठेवला होता. त्यांनी ते कोणतीच हरकत न घेता आम्हाला करू दिलं. आम्ही त्यांच्या अत्यंत खाजगी आयुष्यात डोकावत असतानासुद्धा त्यांनी एका शब्दानेही नकार दिला नाही.

माझ्यासारख्या भटक्या-विमुक्त लोककलावंत जातीत जन्माला आलेल्या, अनेक पिढ्या स्थलांतराची झळ पोहोचलेल्या, पूर्वजांच्या जनुकीय स्मृती नेणिवेत दडलेल्या माझ्यासारख्या एका नवागताला दंतकथा बनलेला हा माणूस कॅमेऱ्यात टिपण्याचं हे शिवधनुष्य पेलायचं होतं. पण गोष्टी घडत गेल्या. मी फिल्म बनवत नव्हतो, ही फिल्म मला बनवत होती...
हा दुर्मीळ अनुभव सिनेमा माध्यमातून उभा करण्यासाठी, नेमाडेंचं साहित्य जगण्यात अनुभवणारी टीम मला हवी होती. ती आपसूक मिळत गेली. स्वप्नील शेटे या प्रगल्भ तरुण मित्रावर मी प्रचंड विश्वासाने कॅमेरा सोपवला. फिल्मसाठी ठरवलेल्या गोष्टी हळूहळू अपेक्षित रूप धारण करत गेल्यावर पूर्वनियोजित आवाका दुपटीने विस्तारणारा ठरला. महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहिला, तो म्हणजे आर्थिक. मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला. असून असून घरात किती मिळकत असणार? पण काम थांबवायचं नव्हतं. माझे वडील संजय इंडीकर यांनी आमच्या घरच्या कर्जाचे हप्ते थांबवून, काही महिन्यांची मिळकत मला देऊन पूर्ण एकाग्र होऊन काम करायला सांगितलं. पण तेवढ्यावर भागणार नव्हतं. मग आमच्या टीममधील कार्यकारी निर्माती तेजश्री कांबळे यांनी या कामावर विश्वास ठेवून शक्य तेवढी आर्थिक मदत देऊ केली, आणि सगळ्या प्रक्रियेला नवा आयाम दिला. त्यानंतर एका क्षणाला सगळ्या टीमला विश्वासात घेऊन मी कर्ज घेण्याचा प्रस्ताव मांडला. काही लाखांचं कर्ज उचलणे हा अनुभव माझ्यासारख्या विद्यार्थी दशा नुकत्याच ओलांडलेल्या पोराला थोडासा अवघड वाटत होता.

पण विद्यार्थी म्हणून पुण्यात जगत असताना, शेकडो सिनेमे बघताना, खिशात पुरेसे पैसे नसताना, आर्थिक तडजोड कधी केली नव्हती. तर स्वतःचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट करताना आर्थिक तडजोड कशी करणार? तांत्रिकदृष्ट्या, लोकेशन्सच्या अंगाने आम्ही जे जे वाटतंय, ते ते करत जात होतो. डोक्यावर कर्ज असण्याचं दडपण खूप छोटं वाटत होतं, कारण पडद्यावर येणारं फळ खूप आनंददायी होतं.

खानदेश आणि परिसर, तिथली माती, त्या मातीचा गंध आमच्या सिनेमात यावा, तिथलं लोकसंगीत, खानदेशी वह्या, विविध सण आम्हाला नेमाडेंच्या गावात राहून टिपता यावेत, यासाठी शूटिंगच्या आधी मी अनेक दिवस जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील नेमाडेंच्या ‘डोंगर-सांगावी’मधील घरी जाऊन राहिलो. सोबत नेमाडेंच्या कादंबरीमधील नायक साकारणारा ‘एफटीआयआय’चा अभिनेता संजय मोरेसुद्धा होता. भूमिका करण्यापेक्षा तो ती जगू पाहात होता. खानदेशचा सातपुडा आम्हाला पुन्हा पुन्हा खेचून घेत होता, शूटिंग आणि शूटिंगच्या आधी माझा पत्ता, ‘डोंगर-सांगावी’ असा होऊन गेला होता. नेमाडेबाबांनी त्यांचं घर आमच्यासाठी अक्षरश: खुलं केलं होतं...

याच काळात डोंगर-सांगवीतील खानदेशी मौखिक परंपरा जवळून बघता आल्या, महानुभवी मठ, लीळाचरित्र समजून घेता आले. ओव्या, गवळण, अभंग, हरिपाठ अशा अनेक मौखिक परंपरा सिनेमात उतरवण्याचा प्रयत्न करायचं ठरलं. या फिल्मच्या प्रक्रियेत अनेक ज्ञात-अज्ञात माणसांनी योगदान दिलं, त्यात अग्रस्थानी नेमाडेंच्या गावातील सर्व लोक होते. ‘डोंगर-सांगवी’मधील प्रत्येक घराचं दार आमच्या टीमसाठी सदैव खुलं होतं. आम्ही पुणे, मुंबई, जळगाव, भुसावळ, अजिंठा, फर्गसन, पुणे आणि परिसर अशा जवळपास १५ ठिकाणी शूटिंग केलं. कधी नेमाडेंच्या सोबत, कधी त्यांच्याशिवाय आमची नट मंडळी घेऊन.

नेमाडेंच्या साहित्यात अनेक रस्ते येतात, ‘कोसला’मधला गावाकडून पुण्याचा रस्ता, ‘चतुष्ट्य’मध्ये चांगदेवचे अनेक रस्ते, ‘हिंदू’ तर अख्खी प्रवासातच उलगडत जाते. अशा रस्त्यांवर आम्ही प्रवास करून, डिसेंबर २०१५मध्ये शूटिंग पूर्ण केलं, सिनेमा मांडण्याचे दोन ढोबळ प्रकार मी स्वतःसाठी करून ठेवले आहेत. त्यात पहिला म्हणजे, स्थल-कालात सिनेमा घडणे आणि दुसरा प्रकार उलगडणे. मी दुसऱ्या प्रकारे ही फिल्म करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच नेमाडेंच्या सोबत केलेल्या प्रवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबत त्यांच्या साहित्यातील सौंदर्यस्थळं उलगडत गेली. ही प्रक्रिया अगदी ‘कोसला’च्या हस्तलिखितापर्यंत जाते. नेमाडेंच्या सोबतच्या मुलाखतीतून अनेक अनवट प्रश्न नेमाडे आपल्यासमोर सुटे करतात. अगदी त्यांना पडणाऱ्या स्वप्नांनासुद्धा ते व्यक्त करत जातात. अनेक गमतीदार प्रसंगसुद्धा या प्रक्रियेत घडले, त्यांचासुद्धा समावेश आम्ही करत गेलो. संकलन करणारी क्षमा पाडळकर या रचनेसाठी झटतेय. मी टिपणं काढत, पेपर एडिट करत सगळी ‘समृद्ध अडगळ’ एडिटिंगच्या प्रक्रियेत सहभागी होतोय. सध्या फिल्म निर्मिती प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. संकलन, ध्वनी, संगीत, ग्राफिक्स अशी अनेक गुंतागुंतीची कामं आमच्या आमच्या पातळीवर जुळवणी करत चालू आहेत. अनेकांच्या मौल्यवान योगदानातून इथपर्यंतची प्रक्रिया सुरळीत पार पडली. पुढील प्रक्रियासुद्धा अशीच पार पडेल, अशी आशा आहे.

फिल्मचं फेसबुक पेज– उदाहरणार्थ नेमाडे
(Udaharnarth nemade)
(akshayindikar1@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...