आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाॅस्टेल लाइफची मजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षणासाठी घरदार सोडून कुटुंबीयांपासून दूर राहणार्‍या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी नाही. गावाकडे शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्वत:चं गाव, घर सोडून शहरात यावं लागतं आणि मग हॉस्टेलवरच्या एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. हॉस्टेलचे दिवस ही विद्यार्थ्यांसाठी अनेक नव्या अनुभवांची पाठशाळा असते. घरी सगळे लाडकोड चालतात. सकाळी बेडजवळ चहा मिळतो. कॉलेजला जाताना इस्त्रीचे कपडे समोर तयार असतात. संध्याकाळी परतल्यावर पोटात ढकलण्यासाठी आयतं काही तरी मिळत असतं. पण हॉस्टेलवर हे सारं कुठलं मिळायला? तिथे प्रत्येक गोष्ट स्वत:ची स्वत:च करावी लागते. वेगवेगळ्या गावांतील, परिस्थितीतील मुलं एकत्र असल्यामुळे सर्वांशी जमवून घ्यावं लागतं. क्रमिक पुस्तकात, घरी शिकता आल्या नसत्या अशा अनेक गोष्टी हॉस्टेल जीवनात शिकता येतात. क्षमेचं महत्त्व लक्षात येतं आणि आत्मविश्वासही वाढतो. जुळवून घेण्याचं कौशल्य अंगी बाणवता येतं. मदतीचं समाधान वेगळंच.

नीताचा अनुभव पाहा. ‘गाव काॅलेजपासून जवळ होतं, पण हॉस्टेल कंपल्सरी असल्यामुळे आमच्याही नशिबी हॉस्टेलला राहणं आलं. मी वेळेवर गेले. पण काही मुली बर्‍याच लांबून आलेल्या होत्या, त्यामुळे दोन दिवस अगोदर व काही दुसर्‍या राज्यातल्या असल्यामुळे तीन दिवस अगोदर हॉस्टेलला हजर झाल्या होत्या. सगळ्या रूम फुल झाल्या होत्या. आमचा बाडबिस्तर त्या रूममध्ये टाकला, तेवढ्यात त्या मुलीपण आल्या. मी पटकन ओळख करायला पुढे झाले. पण त्यांना मराठी कळत नव्हतं. मोडकंतोडकं इंग्रजी, हिंदी वापरत संभाषणाला सुरुवात केली. लवकरच आमची घट्ट मैत्री झाली. आम्ही नर्सिंग कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेतलेली होती. त्यामुळे हॉस्पिटलशी आमचा रोजचा संपर्क असायचा. रोज वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट बघायला मिळायचे. इमर्जन्सी, अपघात रोजच असायचे.’

ती हॉस्टेलमध्ये राहायला लागून जेमतेम महिन्याभरात एक भीषण अपघात झाला. बाईच्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता. ती जागेवरच मरण पावली; पण नवर्‍याची आशा वेडी होती. तो तिला हॉस्पिटलला घेऊन आला. डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगताच त्याच्या आक्रोशाला पारावार उरला नाही. ‘तो प्रसंग आमच्या मनाला खूप लागला. त्या बाईचा तो रक्तबंबाळ देह डोळ्यासमोरून जात नव्हता. सगळीकडे स्मशानशांतता पसरली होती.’ तेवढ्यात त्यांच्या सिनियर्स आल्या. त्यांना हा सगळा प्रकार समजला. त्या खूप जोरजोरात हसायला लागल्या. त्यांनी ज्युनियर्सना समजावलं. आपल्या व्यवसायात असले प्रसंग रोज येणार. त्यासाठी आपलं मन तयार झालं पाहिजे. वॉर्डमधलं वॉर्डमध्येच सोडून द्यायचं, रूमवर ते सगळं विसरायचं. भावविवश झाल्यास रुग्णसेवा कशी करणार? असेच अनुभव तुम्हालाही आले असतील ना?

अलका पिंगळे, नाशिक