आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alaka Pingale Article About Women's Self Help Groups, Divya Marathi

महिलांसाठी वरदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अथक, विनातक्रार काम करणे हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक मोठा गुणविशेष आहे. पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त काम करणार्‍या स्त्रिया घरातल्या, शेतातल्या कामाला अखंड जुंपलेल्या असतात. त्यांचे श्रम पुरुषांना दिसत नाहीत, शिवाय इतके श्रम करूनही त्यांच्या श्रमांची पर्वा केली जात नाही. हा दैवदुर्विलासच म्हटला पाहिजे. भल्या पहाटे शेतात हजर राहून घरातील भांडी घासूघासू आणि स्वयंपाक रांधूरांधू जन्मभर हात रखरखीत करून घेणारी स्त्री इतकी झिजते कशासाठी हे प्रश्न पुरुषांना पडलेच पाहिजेच. एवढे कष्ट करूनही ती आपलं अस्तित्व सिद्ध करून निश्चयाच्या बळावर नावीन्याचा वेध घेत बचत गटाची स्थापना करते.

महिला काटक, संयमी, समजंस प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी असते. तिच्या अंगी जिद्द, चिकाटी व प्रबळ आत्मविश्वास असतो. चूल, मूल आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी तसेच शेती व्यवसाय व जोडधंद्याचीही देखभाल करणारी महिला जणू शक्तीच आहे. तिच्या कर्तृत्व व चिकाटीने तसेच दूरदृष्टीने भलेभले चकित होतात. तिच्या कला, कौशल्य व चिकाटीला साहाय्य केले व समाजातील विविध व्यवसाय, उद्योग, गृहउद्योग, स्वयंउद्योग तिला उपलब्ध करून देऊन आर्थिक पाठबळ तिच्या पाठीशी उभे केले तर विकास प्रक्रिया अधिक गतिमान होईल. महिलांना स्वत:चे प्रयत्न स्वत: सोडवण्याची क्षमता प्राप्त होईल म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी व त्यांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी महिला धोरण फार वर्षांपूर्वीच जाहीर केले. विविध उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा आरंभ केलेला आहे. त्या स्वत:च्या परिश्रमातून स्वावलंबी व्हाव्यात त्यांच्याकडे समाजाने समदृष्टीने पाहावे व महिलांना समाजात समानतेचे स्थान मिळावे त्यांच्या बळाचा फायदा विकास प्रक्रियेला लाभावा अशा उपक्रमाचे नाव म्हणजे स्वयंसाहाय्यता बचत गट. महिला बचत गटाच्या माध्यमातून आज महिलांनी उच्च टप्पा गाठला आहे. बचत गटाच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी झाल्या आहेत. गावोगावी बचत गट म्हणजे महिलांना सशक्त सबल व सक्षमीकरणासाठी मिळालेले एक वरदान होय.

बचत गट चळवळीने महिलांचा आर्थिक विकास साधण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे. महिलांमध्ये नवे काही तरी करण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे.

महिला मुळातच काटकसरी असतात; पण त्यांना बचतीची सवय जडावी त्यांच्यातील कार्यकुशल महिलेला स्वत:चा व्यवसाय आरंभ करण्यासाठी कर्जाऊ पैसे घेण्यापेक्षा गटातील महिलांनी जमा केलेले पैसे मिळावे, सावकारी कर्जापेक्षा आपले कर्ज योग्य अशी भावना महिलांमध्ये निर्माण व्हावी. महिलांनी एकत्र यावे अडीअडचणी समजून घ्याव्यात व एकमोकींच्या निकडीचा, सुखदु:खाचाही विचार करावा. यासाठी या समविचारी महिला एकत्र येतात व महिला बचत गटाचा 8 ते 10, 15 सदस्यांचा गट तयार होतो. या बचत गटाला नाव दिले जाते. दर महिन्याला प्रत्येक महिलेची येणारी बचत सहा महिन्यांपर्यंत एकत्र केली जाते. जमा झालेली रक्कम कोणाच्याही घरी न ठेवता गटाच्या नावे बँकेत खाते उघडून जमा केली जाते जेणेकरून त्यावर व्याज मिळते. ज्या महिलेला पैशाची निकड असेल किंवा तिला व्यवसाय उभारावयाचा असेल तर तिला वाजवी दराने या खात्यातून रक्कम काढून देण्यात येते.

घेतलेले कर्ज विहित मुदतीत हप्त्याहप्त्याने परत फेडणे बंधनकारक असे हे सर्व बचत गटाच्या नियम व अटीनुसार चालते. यातून प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की यात महिलांची एकी निर्माण होते. गरजा भागवल्या जातात व विचारांच्या देवाणघेवाणीचे संघटन पाहायला मिळते. बचत गटामध्ये येऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करीत असताना महिलांना, आत्मविश्वास आलेला असून स्वत:च्या कुवतीची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे महिलांनाही मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे हे समजले आहे.

काही गावांमध्ये महिलांनी 100 रुपयांप्रमाणे 10 हजार रुपये रक्कम एकत्रित केली त्यानंतर गरजेप्रमाणे अंतर्गत कर्ज देण्यास सुरुवात केली. गावात सावकार 10 टक्के दराने कर्ज देत असत, मात्र बचत गटाच्या माध्यमातून 2 टक्के दराने कर्ज मिळू लागल्याने घरच्या मंडळीनेदेखील महिलांना प्रोत्साहन देण्यात सुरुवात केली. पुढे या महिला बियाणे खरेदी करताना एकत्रित खरेदी करू लागल्या. त्याचाही फायदा शेतकर्‍यांना झाला. त्यामुळे गावची पुरुष मंडळी महिलांना सहकार्य करण्यास पुढे येऊ लागली. गावातला सावकाराचा व्यवसाय बंद झाला. कृषी विभागाने या महिलांना फळप्रक्रिया आणि इतर प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यातून अनेक बचत गटांनी वेगवेगळे व्यवसाय करण्यास प्रारंभ केलेला दिसतो. या महिला दुग्धउत्पादनात मागे राहिल्या नाहीत, तर नाशिक जिल्ह्यातील जाखोरी गावच्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून रेशीम उद्योगही सुरू केलेला आहे. या महिला शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी परस्परांसाठी एक मजबूत आधार निर्माण केला आहे.

बचत गट म्हणजे महिलांसाठी वरदान होय. बचत गटामुळे केवळ आर्थिक विकासाचे मार्ग संधी खुली होते असे नाही. विविध प्रशिक्षण, बाहेरील जगाचा अनुभव. संघटन कार्याचा व विचारांचा प्रभाव यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास येतो. तसे घरात, बँकेत आणि पर्यायाने गावात महिलांची पत व एक सामाजिक दर्जा निर्माण होतो. बचत गट हे स्वावलंबनाचे, मानसिक व वैचारिक, आर्थिक उन्नतीचे आणि सामाजिक प्रगतीचे उत्तम माध्यम आहे. बचत गटामुळे महिलांची गतिशीलता वाढते व त्यासोबत आत्मविश्वासही वाढतो. महिलांना आपल्या दैनंदिन अडचणी सोडवणे सहज शक्य होते.