आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alka Pingle Article About Terrace Garden, Divya Marathi

बाग फुलवा परसदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्ग आणि मानवाचं अतूट नातं असल्यामुळेच काँक्रीटच्या जंगलात राहणारी शहरी माणसं निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर पार रमून जातात. म्हणून गावाकडून परत शहरात जाताना त्यांचे पाय जड होतात. त्यामुळेच शहरात किंवा छोट्या जागेतही झाडं लावायला अनेकांना आवडतं.

आपण आपल्या घराच्या परिसरात, सोसायटीत अनेक झाडं लावू शकतो. झोपाळ्याच्या बाजूने वर चढणारे वेल आणि झोपाळ्याच्या डिझाइनला शोभणाऱ्या आकर्षक कुंड्यांच्या स्टँडची मांडणी तुमच्या बागेला एक वेगळे स्वरूप देते. बंगल्याच्या पुढच्या भागात पुरेशी जागा असेल तर टेराकोटाच्या किंवा चिनी मातीच्या ट्रेमध्ये तयार केलेले कमळाचे छोटे सुंदर तळे मन वेधून घेते. बांबू आणि वेलीच्या साहाय्याने तयार केलेल्या कोप-यातला सुंदर मांडव ही बैठकीची खास व्यवस्था ठरू शकते.

आपल्याला देवपूजेत जास्वंद, मोगरा, झेंडू, चाफा, शेवंती, तगर, जाई-जुई, पारिजातक, सोनटक्का, गुलछडी, तुळस, बेल, दूर्वा इत्यादी फुले व वनस्पती दररोज लागतात. हे सगळे बाजारातून आपण विकत घेतो तेव्हा त्यासाठी पडेल ती किंमत देतो. परंतु ती फुले ताजी असतीलच याची शाश्वती नसते. आपण आपल्या घराजवळ जिथे मोकळी जागा असेल तिथेही फुलझाडे लावली तर आपल्याला रोज ताजी फुले मिळू शकतात. त्याचप्रमाणे काही वेलवर्गीय भाज्या व फळे आहेत, त्यांचे वेल आपण घराजवळ जोपासू शकतो. आपण भलेमोठे कलिंगड खातो ते कलिंगड वेलीला लागलेले फळ असते. पण त्यांच्या वेलीसाठी भक्कम मांडवाची आवश्यकता असते. जाईजुई वगळता बहुतेक वेलींना मांडवाची आवश्यकता असते. काकडी, तोंडली, कारली, दुधी भोपळा व मोठा डांगर भोपळाही वेलीवरच लागतो. द्राक्षांचे घड वेलीवर लटकलेले पाहताना फारच रंगत वाटते. सर्व वेल आपण घरीच आपल्या परसदारी किंवा मोकळ्या जागी लावले तर अनेक वेलवर्गीय भाज्यांची व फळाची लज्जत आपण चाखू शकतो.

मसाल्यात लागणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे मिरची, जायपत्री, हळद, कोथिंबीर, कढीलिंबदेखील आपण घरच्या घरी पिकवू शकतो. गणेशपर्वात काही लोक गणपतीला एकवीस प्रकारच्या पत्री वाहतात. बेल, शमी, दूर्वा, माका, मधुमालती, बोरं, धोत्रा, आघाडा, तुळस, पांढरी रुई, कण्हेर, अगस्ता, डाळिंब, पिंपळ, जाई, देवदार, केवडा या पत्री आपण घरी पिकवून गणेशाला वाहू शकतो. ढोबळी मिरची, भेंडी या भाज्यांची छोटी झुडपे असतात, ती लहानसा वाफा करून आपण लावू शकतो. हे सर्व मी माझ्या बागेत व शेतात लावले आहे. त्यातून मिळणारा आनंद मनसोक्त अनुभवते आहे.