आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राब राब राबतो आम्ही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज शेतात बाई राब राब राबते. पण शेतीसंबंधातला निर्णय ती कुठेच घेऊ शकत नाही. कोणती पिकं घ्यायची, हे ती ठरवत नाही. कशा पद्धतीने शेती करायची, याचा ती विचार करत नाही. घरातले पुरुष तिला विचारात घेत नाहीत. तिलाही ती आपली जबाबदारी वाटत नाही. शेती करणाऱ्या पुरुषाच्या कौशल्यांमध्ये, दृष्टिकोनामध्ये आणि अनुभवामध्ये जेवढी वाढ झाली, तेवढी संधी त्याला मिळाली. त्या तुलनेत बाईच्या कौशल्यामध्ये काहीच वाढ झाली नाही. तृणमूल पातळीवर शेतातल्या बाईचे कष्ट कमी होतील आणि तिचे उत्पादन वाढेल, अशी कौशल्ये आणि अवजारे दोन्ही गरजेची आहेत.

शेतीतल्या कामांमध्ये बाई बरोबरीने दिसते, पण तळाची, कष्टाची, किचकट आणि कमी पगाराची कामे बाईच्या वाट्याला येतात. उदाहरणार्थ निंदणी, खुरपणे, पाखडणी वर्षानुवर्षे काय पिढ्यान‌्पिढ्या बायका शेतीची ही किचकट कामं मुकाट्याने करत आल्या आहेत. त्या विरोधात ना त्यांनी कधी आवाज उठवला, ना त्यांच्या कंटाळवाण्या, किचकट कामांचे श्रम कमी करणारी साधी सोपी सुलभ यंत्रे विकसित झाली. आज बऱ्याच महिला कोंबड्या, बकऱ्या, गाई, म्हशी या शेतीपूरक उद्योगात काम करताना दिसतात. पण तिथेही त्यांचे कष्ट जास्त - फायदा शून्य असंच गणित दिसतं.

‘पिकवता येतं पण विकता येत नाही’ ही म्हण शेतकऱ्याच्या संदर्भात बोलताना सर्रास उच्चारात येते. त्यात तथ्यही आहेच. सक्षम बाजारव्यवस्थेचा अभाव हेच शेतीच्या बाजारव्यवस्थेचे मुख्य दुखणे आहे. अलीकडच्या काळात उत्पादनाबाबत जागरुकता चांगली वाढली आहे. उत्तम गुणवत्तेचे दर्जेदार शेतीमाल उत्पादन करण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतो. मात्र त्याच वेळी त्या शेतमालाच्या मार्केटिंगबद्दल अद्यापही तो काहीसा उदासीन आहे. पराधीन आहे. औद्योगिक क्षेत्रात मार्केटिंगला प्राधान्य दिले गेल्याने निश्चित नफा हे ध्येय ठेवून उद्योग यशस्वी होताना दिसतात. त्याच वेळी आजही नफा-तोट्याचा विचार न झाल्याने शेती मात्र संकटात सापडते. बहुतांश वेळी उत्पादन खर्च निघेल इतकेही उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो. शेतीबाबत साहजिकच दृष्टिकोन नकारात्मक होतो. यंदा वर्षभर कांद्याला खर्च निघेल इतका दर मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. दिवाळीत झेंडूला भाव मिळाला नाही, टोमॅटोचे भाव गडगडल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आता तर नोटाबंदी निर्णयामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही. शेतीच्या विकासासाठी महिला स्वत: राब राब राबूनसुद्धा शेतीमालाला भाव नाही म्हटल्यावर त्यांच्या मनाची स्थिती काय होत असावी, याचा विचार केलाय कोणी? भल्या पहाटे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ती बाईच असते ना? तिच्या कष्टाची मोजदाद केली कुणी? कंबर मोडून शेणगोठा साफ करते बाई आणि डेअरीचा पगार घेतो पुरुष, असं चित्र दिसतं. यावर मुक्त गोठा पद्धतीसारखे उपाय आहेत. त्यातून बाईचे श्रम कमी होतात आणि सेंद्रिय शेतीसाठी अत्यावश्यक शेणखत मिळते.

आज शेतीमालाचे अलोट उत्पादन होऊनही बाजारपेठ न मिळणं किंवा मिळालेल्या बाजारात भाव पडणं, ही शेतकऱ्यांची कोंडी करणारी परस्पर विसंगत परिस्थिती दिसते. इतर उत्पादने कितीही मोठ्या प्रमाणात घेतली तरी त्यासाठी खात्रीची बाजारपेठ आणि भाव ठेवण्याचा शेतकऱ्याकडे असलेला अधिकारी या दोन बाबींवर काम होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे उत्पादनासोबतच मार्केटिंग आणि प्रोसेसिंग याही तेवढ्याच शेतीच्या स्वतंत्र गरजा आहेत. त्या आज पूर्णत: दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. शेतीमालासाठी जास्तीत जास्त आणि विकेंद्रित शीतगृहे तयार होणे, साठवणीसाठी गोडाऊन तयार होणे, वीज, पाणी, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणे, फुड प्रोसेसिंगवर प्राधान्याने काम होणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात दुर्दैवी क्षण म्हणजे आपण खात असलेल्या अन्नातील विषारी घटकांचं स्वरूप. सेंद्रिय शेतीचे उत्पादन केवळ महत्त्वाचं नाही, तर विषमुक्त सेंद्रिय उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांनी ते स्वीकारणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सेंद्रिय सेतु शेतकरी आणि ग्राहक यांची चळवळ आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करावा, शहरी ग्राहकांनी सेंद्रिय पदार्थांचा अाग्रह धरावा, एखाद्या कुटुंबाचे आरोग्य या वैयक्तिक मुद्द्यापासून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या व्यापक सामाजिक-अार्थिक प्रश्नांपर्यंत साऱ्यांची उत्तरे सेंद्रिय शेतीत सापडतात.

शेतीचे उत्पादन आणि विक्री या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. शेतकऱ्यानेच विक्री करावी, या मताची मी नाही. शेती सांभाळून विक्रीची जबाबदारी शेतकरी सांभाळू शकत नाही. त्यासाठी उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एक दुवा आवश्यक आहे. तो शोषणावर आधारित व्यापाऱ्याचा असावा की असहकारावर आधारित महिला बचत गटाचा, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतीला शहरात खात्रीचे मार्केट मिळावे, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. महापालिकेपासून खाजगी कंपन्यांच्या सीएसआरपर्यंत सहकार्य मिळालं पाहिजे. कारण शेतीमालाच्या उत्पादनासोबतच बाजारपेठ हे मला माेठे आव्हान वाटते.
बातम्या आणखी आहेत...