आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीनत्व सिद्ध करणा-या भाषा विद्वानांच्या पाठीशी सर्वच घटकांनी उभे राहिले पाहिजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न स्वागतार्ह आहेत. वास्तविक पाहता मायबोली मराठीचा अभिजातपणा संत साहित्याने कधीच सिद्ध केला आहे. मात्र, अभिरुचीची जी घसरण सुरू आहे, ती चिंताजनक आहे. विचारांची प्रगल्भता कृतीतून जशी कळते, त्याआधी आपल्याकडे असलेला शब्दभांडार आशयघनत्व सिद्ध करतो. भाषेचा विकृत संकर झालेली आजची मोठी दयनीय घडी आहे. वाचन ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे, असं वाटावं इतकी भयानक अवस्था सध्याच्या पिढीची आहे. ‘ऐकणं’ आणि ‘बघणं’ या गोष्टी समजून सांगण्याची गरज आहे; तरच मराठीचे अभिजातपण व अभिरुची टिकून राहील.


मराठीत विपुल वाङ्मयनिर्मिती...
केंद्रसरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, यासाठी प्राचीन काळातील वाङ्मय, मराठी भाषेचा उगम आणि त्या उगमातून प्राचीनत्व सिद्ध करणारे पुरावे हवे आहेत. ते गोळा करण्याचेही प्रयत्न भाषा विद्वानांकडून सुरू आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वच घटकांनी उभे राहिले पाहिजे. मराठीचा अभिजात दर्जा ठरवताना पूर्वग्रहदूषित भाषेची शुद्धता, वाङ्मयातील प्रतिभेची मक्तेदारी हा उच्चवर्गीयांचा गैरसमज आधी गळून पडला पाहिजे. जीवनातल्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणा-या ज्ञानशाखा जेवढ्या प्रमाणात असतील तेवढ्या प्रमाणात त्या भाषेची अभिजातता सिद्ध होते. व्यावहारिक दृष्टीने बघितले तर मराठी भाषा ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीने मागे नाही. कारण तिच्यामध्ये आजपर्यंत झालेली विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती, विज्ञान, कृषिविषयक माहिती, संस्कृतीकोश, शब्दकोश यांची संख्या विपुल आहे. कुठल्याही अभिजात भाषेसाठी या बाबी आवश्यक असतात.


बोलीभाषांचे अभिजाततेला बळ
मराठी भाषेपासून अनेक बोलीभाषा निर्माण झाल्या आहेत. मराठीच्या अभिजाततेला हे एक प्रकारचे बळच आहे. जुन्या, नव्या रोगांच्या उपचारांची माहितीही मराठीत आलेली आहे. तसेच कायदेविषयक पुस्तके व अभ्यासक्रम मराठीत येऊन धडकला आहे. म्हणून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्यास कोणाची हरकत नसावी. भाषेची अभिरुची टिकवून ठेवण्यासाठी कृ.प्र. खाडीलकर, प्रा. वसंत कानेटकर, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, ना. सी. फडके, विंदा करंदीकर, राम गणेश गडकरी, पु.ल. देशपांडे, वा.रा. कांत, भा.रा. तांबे, माधव ज्युलियन या प्रतिभावंत साहित्यिकांच्या ग्रंथसंपदेचे चिकित्सकपणे वाचन केले पाहिजे. नुसते वाचन नव्हे तर त्यावर विचारमंथनही केले पाहिजे.


संत साहित्य चिकित्सकपणे अभ्यासावे
अभिजाततेपासून आपण आणखी दूर जाऊ नये, म्हणून कसदार मराठी लिहायचे तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे लोकजीवनाचे व अध्यात्मातील वैविध्य सांगणारे साहित्य डोळसपणे अभ्यासले पाहिजे. महाभारताला ज्ञानेश्वरांनी परमार्थाची जन्मभूमी म्हटले आहे. त्याच ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ला अनेक साहित्यिकांच्या साहित्याची जन्मभूमी म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. प्रत्येक लेखक आपल्या कुवतीनुसार शब्दब्रह्माचा सागर लेखणीच्या दमदार (शब्दसामर्थ्य) रवीने घुसळतो, तेव्हाच नवीन साहित्य हाती येते. अर्थात, आपल्या ज्ञानभाषेचे महत्त्व जपण्यासाठी त्यात परभाषेतील शब्दांची भेसळ कटाक्षाने टाळली पाहिजे.


सावरकरांच्या साहित्याचा जागर व्हावा...
अभिजात मराठीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह त्यांच्या ग्रंथसंपदेत केला आहे. ‘श्वान बिचारे पोटही भरते चघळुनिया तुकडे, शेणामाजी बांधून वाडे नांदती शेणकिडे’ अशा कवितेतून ते जीवन काय आहे? हे समर्पक शब्दात सांगतात. अर्थात, अतिशय कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगण्याचं सामर्थ्य हे फक्त मराठीतच आहे. मात्र, गरज आहे ती फक्त स्वभाषेत शुद्ध बोलण्याची अन् शुद्ध लिहिण्याची आणि शुद्धपणे इतरांना समजवण्याची.

मौखिक
परंपरांचाही विचार करणे अपेक्षित
लिखित साहित्याबरोबरच मौखिक परंपरा, लोकसाहित्यातील वैविध्यही भाषेची अभिजातता ठरवताना विचारात घेणे अपेक्षितच आहे. महाराष्‍ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या समाज प्रबोधन चळवळीत लोकसंगीताचा वाटा मोठा आहे. सत्यशोधकी तमाशे व आंबेडकरी जलसे हा लोकप्रिय लोकसंगीताचाच एक भाग आहे. आंबेडकरी जलशांमध्ये पूर्वी आठ ते दहा शाहीर असायचे. ते बतावणीचा वापर समाजप्रबोधनासाठी करायचे. त्यांच्या प्रत्येक बतावणीतील शब्द हा भाषावैभवाची उंची किती आहे? याची साक्ष द्यायचा. ज्यांचा उल्लेख लोकसंस्कृतीचे उपासक असा केला जातो त्या गोंधळी, भुत्ये, वाघ्ये, वासुदेव यांनी जोपासलेली परंपरा हीसुद्धा मराठीचे अभिजातपण कायम ठेवण्यासाठी मोलाची आहे.

आनंदा पाटील, भुसावळ