आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व व्याधींचे कारण अग्निमांद्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती कमी होणे
आपण दैनंदिन जीवन जगत असताना, आपल्या शरीरातील विविध संस्थांमध्ये विविध स्वरूपाची कार्ये सुरू असतात. शरीराच्या विविध प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहतात. या सर्व प्रक्रिया चालण्यासाठी लागणारी ऊर्जा आपणास आहारामार्फत मिळते.

आपण जो पंचभौतिक आहार सेवन करतो तो त्याच स्वरूपात शरीराला उपयुक्त नसतो. त्यामुळे त्याचे शारीरिक पंचभौतिक पदार्थात रूपांतर करण्याचे कार्य आपल्या जठराग्नीद्वारे होत असते. याच बाह्य पंचभौतिक घटकाच्या, शारीरिक पंचभौतिक घटकात रूपांतर प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ज्या वेळी काही कारणास्तव ही पचनशक्ती बिघडते, त्या वेळी अग्निमांद्य निर्माण होते. शरीराचे बल, स्वास्थ्य, वर्ण, कांती, उत्साह, ओज, आयुष्य हे सर्व अग्नीवर अवलंबून असते. त्यामुळे साहजिकच जोपर्यंत अग्नी प्राकृत तोपर्यंत शरीर प्राकृत अवस्थेत असते, अग्नी बिघडला की शरीराचे गणित बिघडते. अग्निमांद्य घडले म्हणजे अग्नीच्या पचन सामर्थ्यात विकृती निर्माण होते व शरीरपोषणाची क्रिया मंदावते.

अग्निमांद्याची कारणे
* योग्य वेळी जेवण न घेणे (अनियमित भोजन)
* अति प्रमाणात आहाराचे सेवन
* विरुद्ध आहाराचे सेवन (उदा. दूध+केळे, दूध+मांसाहार आदी.)
* असात्म्य, आहार पदार्थांचे सेवन
* अतिशीत, अतिउष्ण पदार्थांचे सेवन
* निरनिराळ्या व्याधींमुळे शरीर क्षीण होणे
* मलमूत्रादी अधारणीय वेगांचे धारण करणे
* काम, क्रोध, भय, चिंता, शोक यासारखे मानसिक घटक
* अतिजागरण
* अत्याधिक प्रमाणात बेकरीच्या पदार्थांचे सेवन करणे
* अत्याधिक जंक फूड (फास्ट फूड)सेवन
* तंबाखू, मद्यपान, गुटखा, धूम्रपान यांची सवय
यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ हे दोष विविध स्वरूपात दूषित होऊन अग्नीस (जठराग्नी) दूषित करतात व अग्निमांद्य उत्पन्न होते.
अग्निमांद्याची लक्षणे
अन्नाचे पचन योग्य प्रकारे न झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे उत्पन्न होतात.
* भूक न लागणे
* पोट जड वाटणे
* पोट फुगल्यासारखे वाटणे
* करपट ढेकर येणे
* आळस वाटणे (कशातही चित्त न लागणे)
* मुखदुर्गंधी
* दुर्गंधित, अनियमित स्वरूपात्मक मलप्रवृत्ती
* झोपेवर परिणाम होणे
* स्वभाव चिडचिडा होणे
* वेळेवर योग्य चिकित्सा न केल्यास उपद्रव स्वरूपात गंभीर व्याधींची उत्पत्ती होते.

उपचार : अशा स्वरूपात्मक लक्षणे दिसली असता, वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. आयुर्वेद शास्त्रात यावर अतिशय परिपूर्ण चिकित्सा आहे. याबाबत कुठलेही लक्षण दिसले असता वेळ न दवडता ताबडतोब योग्य ती चिकित्सा करवून घ्यावी. आयुर्वेदातील पंचकर्म, तसेच शमन चिकित्सा आदींचा रुग्ण व व्याधी अवस्था बघून परिपूर्ण इलाज केला जातो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ती चिकित्सा करवून घेऊन आरोग्यमय राहावे. कारण म्हटलेच आहे ना... ‘आरोग्यम् धनसंपदा!’

simplyrahul123@yahoo.com