आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार आणि अध्यात्मिक सुखही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या ठिकाणी भगवान शंकराने अमरत्वाचा संजीवनी मंत्र पार्वतीला सांगितला, ती गुंफा अमरनाथची गुंफा म्हणून ओळखली जाते. अमरनाथ गुंफेत दरवर्षी तयार होणारे बर्फाचे शिवलिंग हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानला जातो. 12 ते 14 फुटांपर्यंत उंची असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यास लाखो भाविकांची गर्दी ओसंडत असते. अमरनाथची यात्रा साधारणत: दीड महिना चालते. नारळी पौर्णिमेला यात्रा संपते.

श्रीनगरहून दोन-अडीच तासांच्या अंतरावर बालताल या ठिकाणापासून अमरनाथची यात्रा सुरू होते. या मार्गावर सोनमर्ग हे निसर्गसंपन्न ठिकाणही आहे. यात्रेचा दुसरा मार्ग जम्मूहून यायचे झाल्यास पहलगाममार्गे हा आहे. हा मार्ग थोडा लांबचा आहे, तर बालतालचा मार्ग जास्त चढाईचा आणि खडतर आहे. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात हे दोन्ही मार्ग एकत्र मिळून गुंफेपर्यंत जातात. बालतालहून पायी निघाल्यास डोंगर पार करून आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. खालून गुंफेपर्यंत जायला घोडेवाले दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतात. येथे डोलीचीदेखील सोय आहे. त्याचे दर बरेच चढे आहेत. हेलिपॅडपासून गुंफेपर्यंत जाऊन यायला घोडेवाले एक हजार रुपये माणसी घेतात. यात्रेतील गर्दी वाढत जाते, तसा हा दरही वाढत जातो. पाऊस सुरू झाला, बर्फ कोसळला, कडा कोसळला वगैरे कोणतीही आपत्ती आली तर येथे कोणत्या गोष्टींना किती पैसे मोजावे लागतील याचा नेम नसतो. अमरनाथ यात्रेला जाताना गरम कपडे, हातमोजे आणि बर्फातील शूज वापरणे गरजेचे ठरते.

हेलिकॉप्टरने गुंफेच्या आधी चार किमीवर उतरल्यावर तेथून चालतही जाता येते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, येथे काळोख लवकर पडतो. त्यामुळे सायंकाळी पाचनंतर हवामानाचा काही अंदाज सांगता येत नाही. तेव्हा एका दिवसात दर्शन करायचे असेल तर सकाळी लवकरचे हेलिकॉप्टर पकडून दुपारी दर्शन घेऊन संध्याकाळी हेलिकॉप्टर सेवा बंद व्हायच्या आत खाली उतरणे शहाणपणाचे ठरते. अन्यथा अमरनाथला एखाद्या तंबूत मुक्काम करून दुसर्‍या दिवशी सकाळी खाली उतरावे लागेल. यात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी तंबू ठोकून राहण्याची, जेवणाची, गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. दुकानदार आपले सामान, बॅग ठेवायला पैसे घेत नसले तरी त्यांच्याकडून प्रसाद वगैरे घेण्याची त्यांची मागणी असते. येथे सारे काही बालतालहून वरती खेचरांवर लादून आणावे लागत असल्याने सर्वच वस्तूंच्या किमती चढ्या असतात.

प्रत्यक्ष गुंफेच्या ठिकाणी जेथे बर्फाचे शिवलिंग आहे, तेथे आता कोणालाच प्रवेश मिळत नाही. त्याभोवती संरक्षक कठडा उभारण्यात आला आहे. मात्र, अगदी चार फुटांवरून शिवलिंगाचे दर्शन घेता येते. त्या ठिकाणी कोणालाही सॅक, बॅग घेऊन जाता येत नाही. मोबाइल तसेच कॅमेर्‍याला शिवलिंगाच्या ठिकाणी परवानगी नाही.

यात्रेला होत असलेली अलोट गर्दी पाहता जम्मू-काश्मीर प्रशासन ग्रुपने ठरावीक यात्रेकरूंना यात्रेसाठी पाठवत असते. त्याचे पासेस जम्मू, श्रीनगरलाच मिळतात. त्यावर तुमच्या दर्शनाची तारीख दिलेली असते. नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद- दुसरा दिवस व्यर्थ गेला की, तेथे सर्वच गोष्टींची तारांबळ उडते. एकीकडे लाखोंच्या संख्येने आलेले भाविक आणि त्यांची सोय करताना सगळ्याच यंत्रणेवर ताण पडतो. त्यामुळे अनेकदा यात्रेकरू दर्शनाविना रखडले जातात. अशा वेळी सुका मेवा, चीज यांसारखे उष्मांक निर्माण करणारे पदार्थ सोबत बाळगावेत. ज्या ठिकाणी क्सिजनचा पुरवठा कमी असतो, अशा ठिकाणी भरपूर पाणी पीत राहावे, म्हणजे मळमळल्यासारखे जाणवत नाही. प्रवासात जीन्स घातलेली असेल तर उत्तम. घोड्यावर बसताना त्यावर ब्लँकेट वगैरे घालायला सांगावे. पहाडी प्रदेशातील लोकांप्रमाणे शहरी माणसांना घोड्यावर बसण्याची सवय नसते, त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. घोड्याच्या खोगिराला हाताने पकडायचे असल्याने आणि रस्ता खाचखळग्यातून, डोंगरातून जाणारा असल्याने हातमोजे (हँडग्लोव्हज) असलेले उत्तम.

डोंगरदर्‍यांत वावरणार्‍या या घोड्यांना तेथील अरुंद वाटेने चालण्याची सवय असते. त्यामुळे ते जरी दरीच्या कडेने चालत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नसते. बर्फातून चालताना अंगावरील कपडे, बूट, मोजे ओले राहणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे ठरते. यात्रेकरूंना दिलेले ओळखपत्र गळ्यात बाळगणे येथे महत्त्वाचे आहे. सर्व अडचणींवर मात करून पुरती दमछाक झाल्यावर जेव्हा बर्फाच्या अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन घडते, तेव्हा श्रम सार्थकी

हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय
श्रीनगरला दाल लेकच्या किनार्‍याला राजभवनच्या पुढे असलेल्या हॉटेल सेंटॉर येथे अमरनाथसाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग करता येते. आता नलाइनदेखील बुकिंग करता येते. बालतालहून पंचतरणीचे हेलिकॉप्टर भाडे तीन हजार जाणे-येणे, तर पहलगामहून हेलिकॉप्टरने पाच हजार भाडे होते. मात्र, खराब हवामानामुळे अनेकदा हेलिकॉप्टरची राइड बंद होते. त्यामुळे अमरनाथला आल्यावर हेलिकॉप्टरनेच जाता येईल, असे गृहीत धरू नका. हेलिकॉप्टरची बालतालहून सुटणारी राइड पाच मिनिटांची असली तरी पाच मिनिटांत आपण 14 हजार फुटांच्या वर जातो. अशा वेळी नवीन माणसांना, अनेकांना अचानक उंचावर गेल्याने प्राणवायूच्या कमतरतेमुळे डोके दुखणे, हातापायात पेटके येणे, उलटी आल्यासारखे वाटणे, अस्वस्थ वाटणे, आदी प्रकार होतात. हेलिकॉप्टरदेखील थेट गुहेपर्यंत आता जात नाही. पंचतरणी येथील हेलिपॅडहून घोड्यावरून पाऊण-एक तासात आपल्याला गुंफेपर्यंत जाता येते.