आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambika Takalkar Article About Children's Rearing

‘विशेष’ कर्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारा वर्षांपूर्वी साधारण सहा वर्षांच्या नचिताला आरती माझ्याकडे प्रवेशासाठी घेऊन आली होती. सर्व चाचण्या करून आम्ही तिला आमच्या शाळेत प्रवेश द्यायचे ठरवले. ती मतिमंद असली तरीही ट्रेन करण्यासारखी होती. एक वर्तन समस्या सोडली तर तिच्याकडे शिकण्यासारखे आणि आमच्याकडे शिकवण्यासारखे खूप काही होते; परंतु तिच्या आईवडिलांना त्यांच्या कामामुळे शाळेत आणा-सोडायला वेळ नव्हता. त्यांनी घरीच एक आया ठेवली, ती तिचे सगळे करत असे. कुठेही काहीही कमी पडता कामा नये, अशी आरतीची धमकी. पैसा कितीही खर्च करीन; पण तिचा प्रत्येक हट्ट पुरवा, असा आदेश होता. आपण आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाही या भावनेपोटी त्या तिचं खूप मोठं नुकसान करत होत्या. वेळोवेळी समजावून त्यांना ते कळत होतं; पण वळत नव्हतं. काही वर्षांतच आरती कंपनीची सीईओ झाली होती. पती परदेशात असे, सहा महिन्यांतून एकदा येई आणि नचिता पण मोठी झाली होती, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या. नैसर्गिकरीत्या स्त्रीसुलभ भावनाही तिच्यात विकसित होत होत्या; पण आईवडिलांचा पुरेसा सहवास नसल्याने कळीचे फूल होतानाचा त्रास, त्या वेळेसची तिची मानसिकता, तिच्यात होणारे बदल यासंदर्भात तिला मायेची ऊब, शिकवण, काय चांगलं काय वाईट याचं प्रशिक्षण नाही मिळालं. कोणता स्पर्श आपला, कोणता परका, कोणता चांगला, कोणता वाईट हेही तिला कधी सांगितलं गेलं नव्हतं. कारण ते सांगण्यासाठी आई होतीच कुठे तिच्यासोबत? तिला सांभाळणारी आया अडाणी, हुकमाची दावेदार, पैशाची नोकर, पण तरीही तिच्यावर वेडी माया असणारी.

नचिता मोठी होत जाताना तिला अनेक स्पर्श हवेहवेसे वाटू लागले. ती आणि आयाखेरीज सहसा कुणीच नसायचं. आयाला कधी कधी बाहेर जावे लागायचे तेव्हा ती तिच्या एका भाच्याला नचिताजवळ थांबवायची आणि बाहेर जाऊन यायची. तो हळूहळू नचिताचा गैरफायदा घ्यायला लागला. तिच्यासोबत अनेक प्रकारचे चाळे करू लागला. नचिता आधी हात लावू देत नसली तरी तिला हळूहळू तो स्पर्श, तो सहवास हवाहवासा वाटू लागला. तिला हवी असणारी मायेची ऊब ती इथे शोधू लागली. आयाच्या एक दिवस हे लक्षात आले, पण भीतीने ती गप्प राहिली. पण एक दिवस तीही वेळ आली, तिला हे सर्व आरतीला सांगावे लागलेच.

अशा किती तरी वयात येणार्‍या नचिता किंवा विशेष मुलं-मुली आईबाबांच्या निष्काळजीमुळे किंवा या गिधाड्या समाजाच्या वासनेला बळी पडत असतील.
आरती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिने पहिला प्रश्न हा विचारला, ‘या मुलांच्या लैंगिक समस्या काय असतात अन् त्यावर उपाययोजना काय असाव्यात?’

या प्रश्नापूर्वी काही माहिती बघूया.
मूल सर्वसाधारण असो वा विशेष, त्याच्या वाढीचा प्रत्येक टप्पा सारखा असतो. मानसिक जडणघडणीमध्ये जरी काही कमी-जास्त असले तरी शारीरिक जडणघडण मात्र सारखीच असते. सर्वसाधारण मुलाला आपण कळत नकळत वयाच्या तिसर्‍या वर्षापासून लिंगभाव शिकवत असतो; पण विशेष मुलांच्या बाबतीत मात्र आपण त्यांना सर्वसामान्य वर्तणूक न देता विशेषच देतो आणि इथून आपल्या वागण्यात चुकत जातो. प्रत्येक पालकाचा स्वत:च्या मुलाला स्वीकारण्याचा कालावधी अन् तीव्रता वेगवेगळी असते, पण एकदा मुलाचा स्वीकार झाला की खरी जबाबदारी सुरू होते, ती आयुष्यभरासाठी.

आज जर मूल चार वर्षांचं असेल तर दहा वर्षांनंतर काय हा प्रश्न प्रत्येक बाबतीत जर विचारत गेलो तर आपल्या
पाल्यास नुसतं भावनिक नाही, तर तांत्रिक दृष्टिकोनातून परिपूर्ण बनवता येईल. उदा. खूपदा आपण बघतो की चौदा-पंधरा वर्षांचा विशेष मुलगा सरळ हॉलमध्येच पँट काढून टॉयलेटमध्ये जातो. पालकास लाजिरवाणं वाटतं अन् त्यातल्या त्यात घरी कुणी आलेलं असेल किंवा आपण कुणाकडे गेलेलो असू अथवा शाळेतून अशा प्रकारची तक्रार येते तेव्हा... पण ही समस्या येऊ नये म्हणून आपण मूल अगदी लहान असल्यापासून काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीपासूनच मुलाला बाथरूमजवळ जाऊनच पँट काढायची हे शिकवलं पाहिजे. सुरुवातीस त्रास होईल, पण एकदा लागलेली सवय पुढे नेहमीसाठी कामी येईल. स्वमग्न मुलांना तर या गोष्टी एकदा रुटीनमध्ये शिकवल्या तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात.
अशाच छोट्या छोट्या गोष्टींतून आपण त्यांना शिकवू शकतो. सुरुवातीस स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, आई, बाबा, भाऊ, बहीण हे प्रत्यक्षात तसेच फ्लॅश कार्ड तसेच छोट्या छोट्या गाेष्टींमधून सांगावं. त्यानंतर मुख्य भाग म्हणजे शारीरिक अवयवांची ओळख. आपण फक्त कान, नाक, तोंड, हात, पाय, अशी जुजबी ओळख शिकवतो अन् नंतर सोडून देतो. या प्राथमिक अवयवांनंतर हळूहळू शरीराच्या सर्व भागांची ओळख तसेच त्याचं कार्य काय हे सारखंसारखं समजावून सांगितलं पाहिजे. हे अवघड आहे आणि प्रत्येक मुलाच्या बाबतीत वेगळे निकष आहेत, पण प्रयत्न तर केलेच पाहिजेत.

खूप सारे मुलांचे पालक आणखी एक समस्या घेऊन येतात ते म्हणजे मूल साधारणपणे किशोरवयात आल्यानंतर स्वत:च्या लैंगिक अवयवांना नेहमी हात लावतं. बर्‍याचदा असं आढळून येतं की आपल्या गुप्त अंगाची स्वच्छता व्यवस्थित न केल्यामुळे बर्‍याच समस्या निर्माण होतात. अशा वेळी वडिलांनी मुलाला अंघोळ घालताना शिकवलं पाहिजे स्वच्छता व काळजी कशी घ्यायची ते.

मुलींना वयात आल्यानंतर आईने अगदी न चिडता या सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्यात. तसेच चार दिवसांत कशी काळजी घ्यायची, शरीराच्या कुठल्या भागाला कुणालाही हात लावू द्यायचा नाही अन् कुणी लावलाच तर कसा प्रतिकार करायचा हे प्रात्यक्षिकाने समजावून दिलं पाहिजे. स्पर्श कसे असायला हवेत आणि कसे नकोत याची जाणीव करून द्यायला हवी. दरवाजा लावून कपडे बदलणे, बाथरूममधून कपडे घालून येणे या सगळ्या गोष्टी शिकवता येतात. बाहेर वावरताना कशी काळजी घेतली पाहिजे, हेही सांगितले पाहिजे, तेही आवश्यक असेल तर सतत.

पण हे सगळं झालं विशेष मुलांची कशी काळजी घ्यायची किंवा त्यांना स्वरक्षण कसे करायचे याबद्दल; पण या मुलांच्या लैगिक समस्यांचं काय? त्यांच्या समस्या अगदी सर्वसाधारण मुलांसारख्या असतात; पण त्यांना त्या सांगता येत नाहीत. वयात आल्यानंतर त्यांनाही विरुद्धलिंगी स्पर्श आवडू लागतात. त्यांनाही प्रेमभावना सर्वसामान्यांसारखी निर्माण होते. मग काय करायचे? त्यांना व्यक्त होण्याचे साधन दिले पाहिजे. त्यांच्या भावना दडपून न टाकता सहज व्यक्त होऊ द्याव्यात. काय चूक, काय बरोबर याची त्यांना जाणीव करून देता येते. आईवडिलांनी एकमेकांशी वागताना सहज असं वागणं ठेवलं पाहिजे. मुलांसमोर केलेलं कुठलंही वर्तन ते स्वतः अनुकरण करू बघतात किंवा त्यांना तसे करावे वाटते.
मुलांच्या भावनिक किंवा लैंगिक समस्या तर आपण थांबवू शकत नाही; पण त्या अयोग्य हातात जाणार नाहीत याची काळजी नक्की घेऊ शकतो. आपल्या मुलाला /मुलीला आपण कुणाजवळ सोडत आहोत, कुठल्या शाळेत जात आहे, तिथले शिक्षक कसे आहेत, ज्या बसमधून जात आहे ती सुरक्षित आहे का, बाहेर जाताना आपण आपल्या पाल्यास योग्य व्यक्तीजवळ सोडून जात आहोत का, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास आपल्या पाल्यास सुरक्षा देण्यास जास्त उपयोगी ठरतात. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती उपाययोजना करू शकतो.

हे सर्व झाले मतिमंद, स्वमग्न आणि बहुविकलांग मुलांच्या बाबतीत. पण मुलास जर फक्त शारीरिक अपंगत्व असेल आणि मानसिकदृष्ट्या ते अतिशय नॉर्मल असेल तर सगळ्यात मोठा भावनांचा कोंडमारा होतो तो या मुलांचा. आपली बुद्धिमत्ता सर्वसाधारण मुलांसारखी असताना किंवा किंबहुना थोडी जास्तच असताना फक्त शारीरिक असमर्थ असल्यामुळे आपणास दुर्लक्षित केलं जातं, ही जाणीव खूप त्रासदायक असते. पण त्यांची बुद्धिमत्ता पातळी चांगली असल्यामुळे समुपदेशन केल्यास ती योग्य प्रकारे समजू शकतात. नचिताच्या आईच्या चेहर्‍यावरची काळजी जरी मिटली नसली तरी ती जाताना एक नवा दृष्टिकोन मात्र सोबत घेऊन गेली.

अंबिका टाकळकर, औरंगाबाद
ambikanidhu@gmail.com
(लेखिका औरंगाबादेतील आरंभ ऑटिझम सेंटरच्या संचालक आहेत.)