आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व समावेशक शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईचं अश्विनी हॉस्पिटल. सायकॉलॉजिस्टच्या केबिनमध्ये एक आई अतिशय चिंतित, गोंधळलेल्या मनानं बसली होती. सोबत तिचा अडीच वर्षांचा मुलगा खेळत होता. एका जागेवर बसत नव्हता. ते सोडलं तर कुणाला पाहून वाटणारही नाही की, हा मुलगा ऑटिस्टिक आहे, त्याच्यात काही वैगुण्य आहे म्हणून. मग त्याला कसं स्पेशल स्कूलमध्ये टाकायचं? स्पेशल स्कूलमध्ये किती प्रकारची अन‌् किती तीव्रतेच्या समस्या असलेली मुलं असतील. तिथे माझ्या छोट्या बछड्याचा कसा टिकाव लागेल. नाही, माझं मूल खूप छान आहे, त्याला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तो उपचारानंतर नीट होईल. नॉर्मल मुलांच्या शाळेत घातलं तर तो नॉर्मल होईल, स्पेशल मुलांच्या शाळेत अजूनच स्पेशल... मग नकोच तिकडे. नॉर्मल शाळेत एबीसीडी शिकवतात, तिथे ऐकलंय की, नुसते ठोकळे शिकवतात. दुसऱ्या मुलांचं पाहून माझा मुलगा नको ते वागायला लागला तर? तो जास्तच ऑटिस्टिक झाला तर? नको त्या गोष्टी शिकून यायला लागला तर? मोठी मतिमंद मुलं त्याला मारायला लागली तर? कोणी इजा केली अन‌् त्याच्याकडे शिक्षकांनी दुर्लक्ष केलं तर? अशा एक ना अनेक विचारांच्या लाटांवर लाटा आदळत होत्या. त्यामुळेच आपल्या मुलाला कुठल्या शाळेत टाकू, हे विचारायला ती या मानसोपचार तज्ज्ञाकडे आली होती.

आपलं मूल विकलांग आहे, हे कळल्यापासून डॉक्टर, थेरपी यांमध्ये गुरफटलेल्या आईबाबांच्या डोक्यात शाळेचा प्रश्नच नसतो. पण जसजसा वेळ जातो तसतसा त्यांच्याही डोक्यात हा विचार येतोच की, आता पुढे काय? वयानुसार तीन वर्षांचं मूल शाळेत जायला हवं. पण बहुतांशी स्पेशल स्कूल्स मूल सहा वर्षांचं झाल्याशिवाय शाळेत घेत नाहीत.

प्रत्येक पालकाला वाटत असतं की, आपलं मूल कसंही असलं तरी नॉर्मल शाळेतच जावं. RTE कायद्यानुसार प्रत्येक मुलाला समाविष्ट करून घेतलं पाहिजे. पण आपल्याकडच्या किती शाळा हे नियम पाळतात? शाळांमध्ये जिथे साधारण मुलांनाच शिकवायची दैना असते तिथे विशेष मुलांकडे काय लक्ष देणार? एकेका वर्गात ४०-४५ मुलं असतात, तिथे आपल्या एखाद-दुसऱ्या विशेष मुलाकडे खरंच लक्ष दिलं जाईल का? मूल शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर किती शाळांमध्ये रॅम्प/ व्हीलचेअर असते? बाकीची मुलं ही मुलंच असतात, साहजिकच ती विशेष मुलांना सतावतात. तेव्हा पालकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

मुलाची तीव्रता, त्याची क्षमता, जवळपास असणाऱ्या सोयीसुविधा व त्याची जडणघडण यांवर ठरवलं पाहिजे की, आपल्या मुलाला कुठल्या शाळेत टाकायचं. दोन्हीही शाळांच्या जशा नकारात्मक गोष्टी आहेत तशा सकारात्मक पण अाहेतच. शाळा नॉर्मल असो की स्पेशल, मुलाला शाळेत टाकताना पालकांनी काही गोष्टी आवर्जून पडताळून पाहाव्यात.

आपण जिथे राहतो तिथे आसपास किती स्पेशल स्कूल आहेत, त्यातल्या त्यात जवळ कुठली आहे जेणेकरून मुलांस ने-आण करणं सोयीचं जाईल, त्यातल्या सोयीसुविधा काय आहेत, तिथले शिक्षकवृंद, असणाऱ्या सोयीसुविधा आपल्या मुलाशी निगडित आहेत, याची खात्री करून घ्यावी.

नॉर्मल स्कूल असेल तर मुलाकडे तितके लक्ष दिले जाईल का, शॅडो टीचरची गरज पडली तर आपण ती द्यायला हवी, तिचा खर्च पुन्हा वेगळा आला, रिसोर्स रूम असायला हवी, आपल्या पाल्यासाठी वेगळा तास, वेगळा वेळ दिला जावा. दुसरी मुलं त्याला त्रास देणार नाहीत याची काळजी घ्यावी. विशेष शाळांना नियम असतो की, मूल सहा वर्षाचं झाल्याशिवाय त्याला प्रवेश नसतो. पण काही शाळा early Interventionच्या सुविधा देतात, ज्यामध्ये मुलाला तीन ते सहा वर्षापर्यंत प्राथमिक गोष्टी शिकवल्या जातात, तसेच थेरपी दिली जाते. मग पुढील प्रवेशासाठी निश्चित केलं जातं.

आजकाल मोठ्या शहरांमध्ये इनक्लुजिव्ह (सर्वसमावेशक) शाळा निघत आहेत, जिथे दोन्ही मुलांना प्रवेश दिला जातो व काही तासांसाठी, काही विषयांसाठी दोघांना एकत्र आणलं जातं, ज्यातून दोन्ही मुलांना एकत्र शिक्षण मिळतं व त्यांना त्यांची स्पेससुद्धा. शाळा कुठलीही असू देत, पण मुख्य मुद्दा म्हणजे शाळेत पाठवण्याआधी आपण आपल्या मुलाला काय काय शिकवलं पाहिजे. सर्वात आधी मुलांना शी-शूच्या गरजा कळल्या पाहिजेत. त्यांना त्या सांगता आल्या पाहिजेत व त्या पूर्णही करता आल्या पाहिजेत. आमच्याकडे पंधरा पंधरा वर्षांची मुलं घेऊन पालक येतात आणि अॅडमिशन द्या, त्यांना एबीसीडी वा एकदोनतीन शिकवा, असं म्हणतात. त्या वेळेस त्यांना सांगताना त्रास होतो की, मुलाला टॉयलेट ट्रेनिंग आयुष्यात आधी महत्त्वाचं आहे, ना की एबीसीडी. मूल एका जागी बसलं पाहिजे. त्याला तहान कळणं, पाणी पिता येणं, सोबतच्या मुलांसोबत मिसळून राहणं जमायला हवं. आम्ही ज्याला ADL Activity म्हणतो, म्हणजेच दैनंदिन गरजा पूर्ण करता यायला हव्या. हे सारं शिक्षण आधी यायला हवं, मग औपचारिक शिक्षणाकडे वळायला हवं.

आहे मज ठाऊक की मी वेगळा तरी, मीसुद्धा तुमच्यातीलच एक ना
उणीव जरी असेल काही माझ्यात तरी, आकांक्षांचे पंख सर्वांसारखेच ना
हवे मज एक आभाळ, मोकळे पंख पूर्ण पसरण्यासाठी
अन‌् क्षितिजावरील इंद्रधनुला, हळुवार स्पर्शण्याची ओढ मलाही आहे ना
नकोच मज कोरडी सहानुभूती कुणाची, असेल जर तुमच्या मनात खरंच
तर द्या मज एक संधी अन‌् विश्वास, गगनालाही ठेंगणे बनवू शकतो ना!
ambikanidhu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...