आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिअरच्या नव्या वाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन एक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. बंगळुरू येथे ग्लोबल ऑटिझम कॉन्फरन्ससाठी गेले होते. त्या ठिकाणी त्या कॉन्फरन्सच्या अनुषंगानेच एक चित्रप्रदर्शन भरले होते. प्रदर्शनात फिरताना एक गोष्ट जाणवत होती की, चित्रकाराला रंगांची खूप जाण होती. खूपच समर्पक रंगसंगती होती प्रत्येक चित्रात. अचानक एका ठिकाणी पाय थबकले आणि जे दिसले त्यावर विश्वासच बसला नाही. वीसएक वर्षांचा तरुण मुलगा बसून चित्र काढत होता. आजूबाजूच्या गर्दीचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. स्वतःमध्ये तल्लीन होऊन तो चित्र रंगवत होता. बाजूला बसलेल्या त्याच्या आईकडे चौकशी केली तेव्हा कळले की, तो मुलगा ऑटिस्टिक म्हणजे स्वमग्न आहे. पण लहान असल्यापासून त्याला चित्रांची, रंगांची जी आवड होती, आज तीच आवड त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. आणि तीच आवड त्याचे भविष्य पण घडवेल, यात काहीच शंका नव्हती.

आज माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक कवाडे खुली झाली आहेत. विकासाच्या नवनवीन वाटा निर्माण होत आहेत. दहावी-बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना करिअरची नवीन क्षितिजे खुणावत आहेत. दिव्यांग मुलांसाठीही अनेक संधींचा उदय होतो आहे. त्यांच्यात असलेल्या कलाकौशल्याची ओळख करून घेऊन त्यांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशाच काही संधींची आपण ओळख करून घेणार आहोत.

सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या निकषांवर ही मुले इतरांपेक्षा मागे असली तरी काही बाबतीत ही मुले पराकोटीची पुढे असतात. कुणाला संगीताची तर कुणाला रंगांची असामान्य समज असते. कुणी अतिशय उंचावर सहजगत्या वावरते, तर कुणी क्लिष्ट गणिते चुटकीसरशी सोडवते. दिव्यांग मुलांच्या या कौशल्यांना वाव देऊन त्यांना समाजात मानाने ओळख मिळवून देणे आज गरजेचे आहे. बऱ्याचदा अशा मुलांना मार्गदर्शन करताना फक्त छोट्या हस्तव्यवसायांचाच सल्ला दिला जातो.

ही मुले एखादी गोष्ट परत परत करण्यास कंटाळत नाहीत, जिथे सामान्य मुले एका कालावधीनंतर कंटाळतात. त्यामुळे या मुलांना संशोधन करणे किंवा एखाद्या संशोधकाकडे साहाय्यक म्हणून काम करणे लीलया जमू शकते. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ऑटिस्टिक होते. आज पाश्चिमात्य देशांतून अनेक विशेष मुले योग्य प्रशिक्षण घेऊन वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये कार्य करीत आहेत. जर एखाद्या दिव्यांग मुलाने संगणकामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले तर तो प्रोग्रॅमर म्हणूनही काम करू शकतो. तासन‌्तास संगणकाच्या क्लिष्ट प्रणालीशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी नक्कीच या मुलांपाशी असते. किंवा संगीताची आवड असलेला एखादा तासन‌्तास रियाज करून त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. गायन या मुलांसाठी कठीण असले तरी एखादे वाद्य वाजविण्यात पारंगत होणे यांच्यासाठी मुळीच अवघड नाही. बंगळुरूतील सॅमी मार्केस नामक एक स्वमग्न तरुण पाश्चात्त्य संगीतात डॉक्टरेट करून आज विद्यापीठात मुलांना शिकवतो आहे.

स्वमग्न मुलांमध्ये दोन टोकाच्या गोष्टी आढळतात. बरीच मुले स्वतःचा तोल सांभाळू शकत नाहीत, तर काही एखाद्या जिम्नॅस्टप्रमाणे उंचीवर कसरत करू शकतात आणि तोल सांभाळतात. अशी मुले जिमनॅस्ट होऊ शकतात किंवा गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नाव कमवू शकतात. आज असंख्य घडामोडी, घटना सभोवताली घडत असतात. त्या घटनांचे संकलन करून ती बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अशा वेळी गरज असते तटस्थपणे बातमी तयार करण्याची आणि वृत्तपत्रापर्यंत पोहोचविण्याची. स्वमग्न मुलांसाठी करिअरला हाही एक चांगला पर्याय बनू शकतो. उत्पादन क्षेत्रामध्ये जिथे तासन‌्तास एकच काम न कंटाळता करणाऱ्या लोकांची गरज असते तिथे स्वमग्न तरुण चांगले योगदान देऊ शकतात. स्वमग्न मुलांना इतरांशी संवाद साधायला जरी त्रास होत असला तरी पाळीव पशुपक्ष्यांशी अनेकदा त्यांचे नाते पटकन जुळते. यामुळे प्राण्यांशी संबंधित अशा काही क्षेत्रांमध्येही ती काम करू शकतात. उदा. जातिवंत प्राण्यांची पैदास, निगा, हाताळणी व तत्सम किंवा शेतीशी संबंधित गोष्टी. फोटोग्राफी हाही एक समर्थ पर्याय म्हणून निवडता येऊ शकतो.

या व्यतिरिक्त ब्लॉक प्रिंटिंग, दिवाळीसाठी शोभेचे दिवे बनविणे, आरास बनविणे, पेपर नॅपकिन, पाकिटे बनविणे यांसारखे अनेक छोटे-छोटे लघुउद्योग या स्वमग्न मुलांच्या स्वावलंबनासाठी कित्येक वर्षांपासून चालविले जात आहेतच. पाश्चिमात्य देशात या मुलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जातात. डेन्मार्क येथील एक प्रसिद्ध उद्योगपती थोर्किल सोने यांचा मुलगा ऑटिस्टिक आहे, त्यांनी आपल्या आयटी कंपनीत अनेक ऑटिस्टीक तरुणांना नोकरी दिली आहे. दुर्दैवाने भारतात मात्र तितकी जनजागृती झालेली नाही. कारण सर्वसामान्य मुलांसारखा अभ्यासक्रम, परीक्षा या मुलांसोबत शक्य नाही. विविध चाचण्यांद्वारे त्यांच्या क्षमता ओळखाव्या लागतात. आणि खूप विचारपूर्वक त्यांच्यावर काम करावे लागते. दिव्यांग मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा मानस आहे. मागील दिवाळीला आम्ही डिझाइनच्या पणत्या बनविण्याचा प्रयोग केला. अंदाजे एक हजार पणत्या या मुलांनी बनविल्या होत्या, ज्या हातोहात विकल्या गेल्या. ब्लॉक प्रिंटिंगही प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. दिव्यांग मुलांसाठी व्यावसायिक संगणक प्रशिक्षण ज्यामध्ये डेटा एन्ट्री, टॅली, ऑफिस, प्रोग्रॅमिंग व इतरही प्रकारचे शिक्षण देऊन या मुलांना त्यांच्या पायावर उभं करता येतं.

‘हात ना पसरू कधी’ हे रवींद्र देसाई यांचं पुस्तक आवर्जून वाचायला हवं. काही दिव्यांग एकत्र येऊन एक कंपनी काढतात. अडचणींचा सामना करत उद्योगाचं साम्राज्य उभं करतात. एखाद्या काल्पनिक कथेहूनही अद्भुत वाटेल, अशी ही सत्यकथा. मला एका प्रसंगाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. माझा मुलगा श्रीहरी स्वमग्न असल्याचे निदान झाले, तेव्हा आम्ही त्याला हैद्राबादला घेऊन आलो होतो एका डॉक्टरकडे. त्या वेळी एक तरुण मुलगा तिथल्या इमारतीबाहेर चिप्सची पाकिटे विकत होता. आम्ही त्याच्याकडे दोन पाकिटे खरेदी केली. तो मुलगा गतिमंद आहे, हे जेव्हा कळले तेव्हा तर आश्चर्याचा धक्काच बसला. पुन्हा जेव्हा मला दोन वर्षांनी बीएडसाठी हैद्राबादला जाण्याचा योग आला तेव्हा कळले की, त्या मुलाने स्वतःचे दुकान थाटले आहे. आज त्याच्या दुकानात काही मुले कामाला आहेत. या मुलाला योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यामुळेच हे शक्य झाले. दिव्यांग मुलांमध्ये लपलेल्या क्षमता ओळखून त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देणे, ही काळाची गरज आहे. देदीप्यमान यशाच्या क्षितिजाला गवसणी घालण्याच्या अधिकार त्यांनाही आहे. समाजाच्या हितासाठी या मुलांना त्यांचे आभाळ मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे, हे आता स्वीकारायलाच हवे.

अंबिका टाकळकर,
संचालिका- आरंभ ऑटिझम सेंटर, औरंगाबाद
ambikanidhu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...