आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विकारणं महत्वाचं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांग मूल स्वीकारताना पालकांसमोर ‘मीच का?’ असा प्रश्न उभा राहतो. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच, नाही तर मग तो प्रश्न कसला? अपंग बाळ म्हणजे त्या विधात्याची लाडकी कलाकृती, जी तो आपल्यासारख्या सक्षम पालकांच्या हातात देत असतो.

ज्या वेळेस पालक मनापासून आपल्या बाळाचा स्वीकार करतात, त्या वेळी खऱ्या अर्थाने दोघांच्याही आयुष्याला सुरेख कलाटणी मिळते.

मा गच्या लेखामध्ये आपण बघितलं की, अपंगत्व काय असतं अन‌् ते कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं. खरं तर हे स्वीकारणं म्हणजे काटेरी रस्त्यावरून जाण्यासाठी मनाची तयारी करणं. जितकं लवकर आपण त्या बाळाचा स्वीकारू करू, तितके लवकर उपचार करता येतात. वैद्यकशास्त्रातल्या प्रगतीमुळे बाळामध्ये काही शारीरिक तसेच मानसिक कमतरता असेल तर खूप लवकर लक्षात येते. त्यामुळे लवकर उपचार सुरू करता येतात. त्यालाच आम्ही early Intervention म्हणतो. ऑटिझमचे निदानही बाळ साधारण सहा ते नऊ महिन्यांचे झाल्यावर होऊ शकते, जे काही वर्षांपूर्वी शक्य नव्हते.

मुलांच्या साधारण वाढीच्या टप्प्यांमध्ये कमालीची तफावत जाणवली तर नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे, असं समजावं. साधारणत: मूल स्मितहास्य दुसरा महिना, मान पकडणे चौथा, रांगणं पाच ते सहा, बसणं सात, उभं राहणं अकरा ते बारा आणि पूर्णत: चालू लागते दीड वर्ष. तसेच भाषा पण विकसित होत असते. शारीरिक वाढ पूर्ण झाल्यावर भाषा विकसित होते. बॅबलिंग साधारण ८-९ महिन्यांत, दोन शब्दांचं वाक्य दीड वर्षांपर्यंत, तर पूर्ण भाषा वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत विकसित होते.

आपलं बाळ विशेष आहे, हे स्वीकारण्याच्या पायऱ्या असतात. त्यातील पहिली म्हणजे, ‘नाही, असं असूच शकत नाही. शक्यच नाही. (नाकारणं) डॉक्टरांना काही कळत नाही, एखादं मूल उशिरा करतं. तो थोडा अशक्त आहे म्हणून असेल.’ नाकारणं ही सगळ्यात पहिली पायरी. कोणत्याही पालकाची हीच प्रतिक्रिया असते. त्यानंतर सुरू होते डॉक्टर शॉपिंग, अॅलोपथी, होमियोपॅथी, आयुर्वेदिक इ. अजून जे काही शक्य असेल ते. एखादा आजार गोळ्या, औषध, उपचार, शस्त्रक्रिया यांनी बरा होऊ शकतो. एक शाश्वत सत्य हे आहे की, अपंगत्व हा आजार नसून ती एक स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी मृत झालेल्या असतात. तो औषधांनी बरा होणार नाही. नको त्या जाळ्यात भरकटणाऱ्या पालकांनी अशा वेळेस ठाम होऊन निर्णय घ्यायला हवा. जितकं लवकर पालक स्वीकारतील, तितक्या लवकर पुढचे निर्णय होतात. स्वीकृती आली की पाठोपाठ वेदना येते. माझंच मूल असं का? त्रास होतो. मन आणि बुद्धीच्या द्वंद्वात पालक अडकतात. बुद्धी सांगत असते की, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे; पण मन स्वीकारायला तयार नसतं. या दोलायमान अवस्थेत दिवस जात असतात. नेमकी याच काळात जास्त गरज असते बाळाला उपचाराची. म्हणून लवकरात लवकर सत्य स्वीकारणं गरजेचं असतं. काही पालकांना स्वीकारानंतर नैराश्य येतं अन् ते त्यातच गुरफटून राहतात. कित्येक पालक या स्टेजमध्ये मनोबल हरवून बसतात. अनेक माता नैराश्याच्या गर्तेत जातात. “मीच का?” या प्रश्नाने घेरल्या जातात. अन् त्यातच गुरफटतात. अशा वेळी त्या मुलावर उपचार करायचे की आईकडे पाहायचे, असा प्रश्न पडतो. कित्येकदा नैराश्यामधून त्या बालकाकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. आहे तसंच राहू दे, ते मूल सोडून दुसऱ्या मुलाकडे जास्त लक्ष दिलं जातं. मूल आहे अपंग तर कशाला त्याच्यावर खर्च करायचा, हाही विचार खूप पालक करतात.

विकलांगता हा आजार नसतो की दिलं औषध, केलं ऑपरेशन आणि काही दिवसांत ठीक झालं. इलाजासाठी एक-दोन महिने येऊन राहिलो, बरे झालो आणि चाललो आपल्या गावी, असं नसतं. असे बाहेरगावचे पालक आमच्याकडे येतात तेव्हा खरी कसोटी लागते, त्यांना समजावून सांगण्याची की, हे एक दिवस, एक आठवडा किंवा एक महिना किंवा वर्षं करून चालणार नाही. आयुष्यभरच न उतता न मातता करावंच लागणारं व्रत आहे. त्याला पर्याय नाही, अन् कुठलाही शॉर्टकट नाही. त्यावर खरा उपचार म्हणजे योग्य नियोजन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, आणि “सातत्य.” या जोरावरच मुलाला स्वावलंबनाकडे नेता येतं. हे समजावून सांगणं सगळ्यात अवघडच नाही तर कसोटी लागणारं काम असतं.

आपलं मूल विशेष आहे, हे सत्य स्वीकारणं जितकं कठीण तितकं समोरच्याला सांगणं आणि त्याला ते स्वीकारण्यासाठी मदत करणं, त्याहूनही अवघड काम.

बहुतांश वेळेला वडील लवकर स्वीकारतात तर आई उशिरा, क्वचित काही ठिकाणी हे उलट असतं. आयुष्यात हा प्रश्न भेडसावत राहतो. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच, नाही तर मग तो प्रश्न कसला? अपंग बाळ म्हणजे त्या विधात्याची लाडकी कलाकृती, जी तो आपल्यासारख्या सक्षम पालकांच्या हातात देत असतो. त्यांना आकार देण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी, त्यांच्यावर भरभरून माया करण्यासाठी, त्यांच्या निष्पाप प्रेमाची उतराई होण्यासाठी. म्हणूनच ज्या वेळेस पालक मनापासून आपल्या बाळाचा स्वीकार करतात, त्या वेळी खऱ्या अर्थाने दोघांच्याही आयुष्याला सुरेख कलाटणी मिळते. एक शास्वत सत्य स्वीकारताना ‘Why me?’पासून सुरू झालेला हा प्रवास ‘Yes, me.’पर्यंत आला की, पुढचा प्रवास सोपा होत जातो. योग्य ते निर्णय घेतले जातात. खरी संजीवनी मिळते या नात्याला अन‌् मग त्यातूनच एखादी गौरी गाडगीळ, सागर बडवे, जतिन पाटील, मालिनी चिब, रणवीर सैनी, भावेश भाटिया, वीरेंदर सिंग, रवींद्र जैन बनायला वेळ लागत नाही.

लेखिका या आरंभ ऑटिझम सेंटर, औरंगाबादच्या संचालिका आहेत.
ambikanidhu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...