आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍यांगांच्‍या भावंडांचे प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांग मूल व सोबत त्याची सर्वसाधारण भावंडं ह्यांना एकत्र सांभाळणं म्हणजे आईबाबांची तारेवरची कसरत असते. दिव्यांग मुलाच्या गरजा जास्त म्हणून नेहमी त्याच्याकडे जास्त कल असतो. तर दुसरी भावंडं मात्र नेहमी तक्रार करत असतात की, आईबाबा आमच्यावर प्रेमच करत नाहीत.

सगळीकडे फुग्यांचं डेकोरेशन केलेलं. वेगवेगळ्या कार्टून्सचे कटआउट लावलेले. डेकवर धमाल मुलांची गाणी चालू. एकीकडे पाणीपुरी, बर्फाचा गोळा, व्हेज मंच्युरियन, पनीर चिली, मनचॉऊ सूप असे एक ना अनेक मुलांच्या आवडीचे प्रकार. बाजूलाच मुलांसाठी खास वेगवेगळे खेळ आयोजित केलेले. छोटा चार्ली चॅप्लिन बोलवलेला, तो मुलांना हसवत होता. तर एकीकडे मोठा भालू मुलांसोबत मस्ती करत होता. सुंदर सुंदर पोशाख घालून छोट्या छोट्या पोरी नटल्या होत्या, तर छोटी पोरं आपल्याच मस्तीत गुल होती. अँकर मुलांचे विविध खेळ घेत होती. मुलांचे आईबाबा आपआपसात गप्पा मारत होते. अर्णव खूप खूश होता. आज त्याचा आठवा वाढदिवस. आईबाबांनी सगळी तयारी त्याच्या मनासारखी केली. खूप वर्षं झाली, आईबाबा खरं तर टाळत होते, त्याचा वाढदिवस मोठा करायला. पण या वेळेस त्याने हट्टच धरला की, माझ्या सगळ्या मित्रांसारखाच वाढदिवस साजरा करायचा. मागची तीन वर्षं झाली, आईबाबा त्याला समजावत, पुढचा करू या. पण या वर्षी आईबाबांचं काहीही चाललं नाही. पण त्यांच्या मनात एक धाकधूक होतीच. एकंदरीत सगळेच खूश दिसत होते. मस्त पार्टी रंगात आली होती.
 
केक कापायची वेळ झाली, सगळी मुलं केकच्या आजूबाजूला जमा झाली. एक चॉकलेट केक व सोबत डोरेमाॅनचा केक असे दोनदोन केक. पोरांचा गोंधळ चालू झाला. मला हवा, मला हवा, म्हणून. अौक्षण झाल्यानंतर केक कापायला घेणार, इतक्यात तनयाचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. ती मोठमोठ्याने ओरडत जवळ असलेल्या वस्तू फेकून देत होती. आईबाबा अर्णवला सोडून चटकन तिच्याकडे धावले. ते तिला शांत करत होते. ते खूप असह्य होते. सगळी आलेली पाहुणी मंडळी विचित्र नजरेने तिच्याकडे पाहात होती. अर्णवचे सगळे मित्र भेदरून गेले. त्यातली काही घाबरून एका बाजूला गेली, तर काही हसत होती. अर्णवच्या हातातला चाकू त्याने काहीशा रागाने, काहीशा नाराजीने बाजूला फेकून दिला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसला. तनयाला  शांत करून बाजूच्या रूममध्ये बसवण्यात अर्धा तास गेला. आई तिथेच तिच्याजवळ थांबली. त्यांनाही हे सगळं खूप अपमानकारक वाटत होतं. अन‌् त्याचसाठी ते वाढदिवसाची पार्टी करायला अर्णवला नको म्हणत होते. पण या वर्षी त्याच्या हट्टासमोर त्यांचं काहीही चाललं नाही. त्यांनी अर्णवला कसंबसं समजावून केक कापायला लावला व उरलेली पार्टी पूर्ण झाली, पण ती रंगत, रया, मौज, मस्ती निघून गेली होती.
 
वरचा प्रसंग थोड्याफार फरकाने प्रत्येक विशेष मूल असलेल्या घरात घडलेला असतोच. विशेष मूल घरात असलं की, अख्खं घर त्याच्याभोवती फिरत असतं. फक्त फरक कधी तीव्रतेचा तर कधी विशेषत्वाचा असतो. दिव्यांग मूल व सोबत त्याची सर्वसाधारण भावंडं ह्यांना एकत्र सांभाळणं म्हणजे आईबाबांची तारेवरची कसरत असते. दिव्यांग मुलाच्या गरजा जास्त म्हणून नेहमी त्याच्याकडे जास्त कल असतो. तर दुसरी भावंडं मात्र नेहमी तक्रार करत असतात की, आईबाबा आमच्यावर प्रेमच करत नाहीत.
 
साधारणत: इथे दोन प्रकार येतात. दिव्यांग मूल लहान असेल व दुसरं भावंड मोठं असेल तर ते खूप चांगल्या प्रकारे आपल्या लहान दिव्यांग भावडाला समजून घेतं. त्याला आईबाबांची काळजी, त्रास पटकन कळतो. ते वेळेच्या आधीच प्रौढ होतं व पटकन त्या दिव्यांग मुलाच्या पालकाच्या भूमिकेत येतं. त्याला दुसरं भावंडं होण्याआधी आईबाबांचं भरभरून प्रेम मिळालेलं असतं. दिव्यांग भाऊ किंवा बहीण जन्माला आलेल्या दिवसापासून तोही आईबाबांसोबत सगळ्याच गोष्टीतून जात असतो. आईबाबांनी स्वीकारलं की, तोही आपल्या भावंडाला स्वीकारतो. तर दुसऱ्या प्रकारात दुसरं भावंड दिव्यांग मुलापेक्षा लहान असतं. इथे मात्र कायम लहान भावंडाची तक्रार असते की, आईबाबा त्याच्याकडे जास्त लक्ष देतात, त्याच्यावर जास्त प्रेम करतात.

दुसऱ्या मुलांच्या दादाताईसारखं आपल्या दादाताईंनी आपल्याशी खेळावं, मस्ती करावी, मोठा दादा म्हणून आपल्याला सांभाळावं, असं त्यांना सतत वाटत असतं. पण बऱ्याचदा हे शक्य होत नसतं. मग त्या लहान्यांची चिडचिड, त्रागा सुरू होतो. बरेचदा त्यांच्या मनात आयुष्यभर राग राहतो. दिव्यांग मुलाच्या जन्माच्या धक्क्यातून अजून पालकच सावरलेला नसतो, तर सिबलिंगचा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो. या सगळ्यात सर्वात आधी पालकांनी आपलं मूल स्वीकारायला हवं. एकदा त्यांनी स्वीकारलं की, मग त्या मुलाची भावंडंपण स्वीकारतात. मोठ्या भावंडांची छोट्याछोट्या गोष्टीत मदत घ्यावी, जेणेकरून त्यांना दुर्लक्ष करतोय असं वाटणार नाही. तसेच छोट्या भावंडांचं करताना मोठ्या दिव्यांग भावंडांची मदत घ्यावी, जेणेकरून त्यांचाही आत्मसन्मान सुखावला जातो.

कुठलीही गोष्ट दोघांना सम प्रमाणातच द्यावी. सर्वसाधारण भावंडांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगाव्यात. नेहमी दोन भावंडांमध्ये प्रेमाचं नात फुलत राहील, ज्याला आजच्या भाषेत आपण बाँडिंग म्हणतो, ते निर्माण व्हायला हवं. नेहमी त्या दोघांना एकत्र खेळवा. भांडणं होतील, वाद होतील; पण ते टोकाला गेल्याशिवाय त्यांच्यामध्ये पडू नका. त्यांची भांडणं त्यांनाच सोडवू द्यावीत. सर्व भावंडांच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवून त्यांनाही दिव्यांग भावंडाच्या स्थितीबद्दल त्यांच्या पातळीवर जाऊन समजावून सांगता येईल. त्यामुळे दुसरी मुलं सर्वसाधारण भावंडापासून दूर जाणारच नाहीत, उलट दिव्यांग मुलाला अनेक भाऊबहीण मिळतील. प्रवासाला जाताना दिव्यांग मुलाची बरीचशी छोटीछोटी जबाबदारी त्याच्या भावंडांवर टाकावी, जेणेकरून बंध दृढ होत जातील.

‘ऑटिझम डे’च्या निमित्तानं सिबलिंगवर एक कार्यक्रम झाला, तेव्हा वय वर्षं पाच ते चाळीस या वयोगटातली ऑटिस्टिक मुलांची भावंडं व त्यांचे पालक एकत्र आले होते.

छोट्या भावंडांनी बिनधास्त सांगितलं की, माझा दादा मला मारतो, दादागिरी करतो. त्याला बोलता येत नाही, म्हणून माझे मित्र मला चिडवतात. आईबाबा त्यांच्याकडेच जास्त लक्ष देतात. त्यांनाच फेवर करतात. भांडणात त्याचीच बाजू घेतात. असे एक ना अनेक. तसेच काही मोठी भावंडं आठवणी सांगत होती. आता आम्हाला कळतंय की, आमचे आईबाबा आमच्या स्पेशल भावंडांकडे का जास्त लक्ष द्यायचे ते. आम्ही अाज त्यांना सांभाळतोय. आज कळतंय, आईबाबांना किती त्रास होत होता ते. अशा एकत्र येण्यामुळं मोठ्या भावंडांच्या अनुभवाचं, त्यांना सामोरं जावं लागलेल्या अडचणींचं व त्यातून ते कसे बाहेर आले याचं शेअरींग लहान भावंडांसोबत होतं. त्यांनाही फक्त आपल्यालाच असे भाऊबहीण नाहीत तर अनेकांना आहेत, हे समजतं. आपण एकटे नाही आहोत तर आपल्याला पण इतकी सारी भावंडं आहेत, ही भावना रुजेल.
 
प्रतिसाद व प्रतिक्रिया काय असतात, हे समजावून देणं फार गरजेचं असतं. आपण नेहमीच प्रतिक्रिया देतो. प्रतिसाद योग्य ठिकाणी वापरायचा. प्रतिक्रियेमुळे आपल्यालाच त्रास होतो, पण प्रतिसादामुळे नेहमीच आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. स्पेशल भावंडांसोबत नेहमी दुसऱ्या भावंडाला पालकांनी ते दिव्यांग मुलाचे आईबाबा आहेत, असं वागवायचं. त्यांना आपली जागा द्यायची. त्यामुळे ही मुलं जास्त चांगल्या प्रकारे आपल्या दिव्यांग भावंडांची भविष्यात काळजी घेतील व आपल्यानंतर आपल्या दिव्यांग मुलाचं काय, हा प्रश्न सुटण्यास थोडी तरी मदत होईल.
 
ambikanidhu@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...