आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambuja Article About Family Story, Madhurima Article

भोळी भाबडी कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजाडायला आलेलं, गावातले लोक तर केव्हाचेच उठून कामाला लागलेले. आज बाजारचा दिवस. ‘भालू ऽऽ’ आईने मोठ्याला हाक मारून सांगितले, ‘आज बाजारात भावलीकडे तू लक्ष ठेवायचंस. आंब्यांना मागणी आहे, मी दिवसभर गिर्‍हाइकांच्या गर्दीत गुंतलेली असणार.’
‘हो, आई. मी भावलीला नीट सांभाळेन. एकटा!’ भालूने आत्मविश्वासाने म्हटले. ‘चल गो, आज दादाबरोबर राहायचं बरं, आईच्या मागे मागे नाही करायचं.’ भावलीला समजावत भालूने तिला उचलले नि अंब्यांची टोपली घेऊन निघालेल्या आईपाठोपाठ तो चालू लागला. आईने कामगिरी सोपवलीय, आपण मोठ्ठे झालोय असं भालूला वाटायला लागलं. ‘खरंच एकटा सांभाळशील पोरीला?’ आईने हसत विचारले. बाजारातली गडबड कशी असेल हे तिच्या मनात आलेच.
शहराकडे जाणार्‍या लोकांच्या गर्दीत ते मिसळून गेले. शेजारपाजारच्या खेड्यापाड्यांतून खूप लोक चालले होते, कुणाला काही घ्यायचे होते, कुणाला विकायचे. बाजाराच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीही होत होत्या. बाजाराच्या वाटेवर कोणी कोणी भेटत होते. कसे आहात? काय म्हणतायत घरची मंडळी?・अशी एकमेकांची वास्तपुस्त चाललेली.
बाजारात पोहोचल्यावर आंब्याचा ढीग रचायला भालूने आईला मदत केली. अरे वा! भालू मोठा झाला तर, मदत करतो तुम्हाला,・शेजारीच भाजी विकणार्‍या यास्मिनच्या आईचे आईशी बोलणे ऐकून भालूच्या अंगावर मूठभर मांस चढले. हं, आज तो भावलीलाही सांभाळणार आहे,・आईने कौतुकाने उत्तर दिले. हो मावशी, मी एकटा भावलीकडे लक्ष ठेवणार. आई कामात असेल ना,・भालूने सांगितले. एकटा का? सांभाळशील हो नक्कीच,・परिस्थिती जाणून यास्मिनच्या आई मिस्किलपणे हसत म्हणाल्या.
‘आई, मी भावलीला बाजारातून फिरवून आणू?’ मोठ्या झालेल्या भालूने पुढच्या कामगिरीसाठी आईची परवानगी विचारली. ‘हां, हां. जा दोघे. जास्त लांब जाऊ नका. लवकर परत या हं,’ आईने होकार भरला नि भावलीला पाठंगुळी घेऊन भालू निघाला. थोडे अंतर जातो तोच भावली कुरकुरायला लागली, ‘मला भूक लागली.’ चणेवाला समोर होता. भावलीला खाली उतरवून एक पुडी घेऊच अशा विचाराने भालूदादा चणेवाल्या भय्यासमोर पोहोचला आणि... भावलीला फुटले पाय. ती पण बाजारात आज एकटी आली होती ना, आईला सोडून.
फुटाण्याचे पुडके हातात घेऊन वळतो तो भालूला दिसले भावली तिथे नाही. अरे, ही गेली कुठे इतक्यात? खाऊची पुडी खिशात टाकून चिंतित भालू भावलीला शोधायला लागला.
कुठे गेली ही? भूक लागलीय ना तिला? उन्हात भटकून तहान लागेल बिचारीला... स्वत:शीच बोलत भालू भावलीच्या शोधात रस्ते पालथे घालत होता. पाय पोळतील तिचे, भीती वाटेल तिला एकटीच कुठे हरवलीय हे लक्षात आल्यावर. वणवण फिरताना भालूचे पाय दुखायला लागले तशी भावलीची त्याला अधिकच चिंता वाटायला लागली. दमली असेल ती, की कोणी उचलून नेली असेल तिला? भावलीला कोणी उचलून नेली असेल या विचाराबरोबर भालूला ब्रह्मांडच आठवले. हुंदका गिळून चिरक्या आवाजात तो ओरडला, ‘भावले, आहेस कुठे तू? हरवलीस का? दादा शोधतोय ना तुला.’ भावली पुन्हा दिसेल ना? असे कसे आपण तिला गमावून बसलो, एकटे सांभाळणार होतो ना तिला आपण? भालूला रडूच कोसळले.
समोरच्या फुटपाथवर दादाचा आवाज कानी पडलेली एक छोटी डोळे चोळत चटईवर उठून बसली. चटई विकणार्‍या काकांनी भालूला विचारले, ही आहे का तुझी भावली?・भालूचे डोळे आनंदाने चमकले. एकदम उडी मारून भावलीला मिठी मारत तो उद्गारला, हो, हो, हीच. हिला छान सांभाळल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.・छोट्याशा दादाचे ते मोठ्या माणसाचे अवसान पाहून काकांना मजा वाटली. अरे, मी एकट्यानेच का तिला संभाळले? अशी इथून आली, बसली चटईच्या रंगांशी खेळत नि झोपी गेली थोड्या वेळात.・काकांनी भावली त्यांच्याकडे आली त्या दिशेकडे अंगुलिनिर्देश केला तशी आणखीही कुणी कुणी भावलीला मदत केली असणार याची भालूला जाणीव झाली. चटईवाल्या काकांचे आभार मानून तो भावलीला उचलून त्या दिशेत चालायला लागला.
पलीकडेच धुण्याच्या चावीजवळ शंकरराव सुकलेले कपडे गोळा करत होते. नळाचे पाणी ओंजळीत घेऊन त्यांनी भावलीच्या दिशेत उडवले तशी भावली खिदळली. भालूच्या लक्षात आले, उन्हात पळणार्‍या भावलीला थांबवून यांनी पाण्यात खेळण्याची मजा लुटवली. धन्यवाद काका,・भालूने त्यांचे आभार मानले. गो बाय, चाललीस घरी? जपून जा हो दोघे,・ओळखीच्या नसलेल्या आजींनी भावलीला हटकले असे वाटले भालूला. कसचे काय, त्यांच्या पुढ्यातल्या कलिंगडांचा लाल रंग भावलीच्या गालावर चढलेला, जिभेवरून ओघळायला लागलेला... तिच्या डोळ्यांतून अजून त्या गोडीचा आनंद ओसंडताना बघून खात्रीच झाली त्याची, यांच्यामुळे पोर भुकेली नाही राहिली. धावत जाऊन भालू त्यांना म्हणाला, तुम्ही कित्ती कित्ती चांगल्या आहात.・अनोळखी बार्इंना आपण काहीतरी म्हणालो याची जाणीव होताच लाजून भावलीसह तो तिथून पळालाच. लोकांच्या चांगुलपणाने भालू भारावून गेला. किती लोकांनी भावलीला जीव लावला, आपण उगाचच घाबरलो.
भावलीला पाठुंगळी घेऊन दमलेल्या भालूला पाहताच यास्मिनची आई पुढे झाली. तिने भावलीला उचलले. भालूच्या हातात गाजर कोंबत ती म्हणाली, ‘हुशार आहेस. दिवसभर फिरवून आणलंस बहिणीला.’ आता मात्र भालूच्या डोळ्यांत पाणी जमलेले. दिवसभर खरंच किती धडपडलो आपण. आई वाट बघत असेल, एका हाताने भावलीला पकडून पळताना त्याने यास्मिनच्या आईला हात केला नि धापा टाकत स्वारी पोहोचली एकदाची आईच्या संपत आलेल्या आंब्यांच्या ढिगासमोर. काय काय सांगायचे होते. आईच्या कमरेला मिठी घालून भालूने एका दमात सांगितली सगळी कहाणी.
‘गावातले सगळे असतातच मुलांचे आई-बाबा, काका-काकू, आजी, आत्या, दादा-ताई, मावशी, मामी... एकटा नव्हतासच मुळी तू आज.’ वाटले होते त्यापेक्षा वेगळीच होती आईची प्रतिक्रिया. भालू ऐकत राहिला, आई पुढे सांगत राहिली, तिच्या आईने तिला, तिच्या आजीने तिच्या आईला नि तिच्या आजीच्या आईने तिच्या आजीला सांगितलेले. ‘आम्ही एकटेच आमच्या मुलांना मोठे नाही करत, एका मुलाला वाढवण्यात अख्ख्या गावाचे योगदान असते. खूप खूप काळापासून चालत आलेला मंत्र, मुले ही गावाची, देशाची संपत्ती. सर्वांनी मिळून तिचे जबाबदारीने जतन करायचे, तिचे संगोपन करायचे, तिला वाढवायचे.’
मित्रमैत्रिणींनो, आपल्या देशातल्यासारखेच आफ्रिकेतील लोकही गावागावातून मिळून-मिसळून राहतात. एक गाव मिळून एक कुटुंबच असतं जणू. आपल्या इथल्यासारखाच तिथेही आठवडी बाजार असतो. गावागावात, शहराशहरात, वस्तीवस्तीतूनसुद्धा भरलेला... खूप प्रकारचे जिन्नस असतात. खाण्यापिण्याच्या, रोजच्या व्यवहाराच्या उपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री होते. लोकांच्या एकमेकांशी भेटीगाठी होतात. बाजार म्हणजे एक प्रकारचे संमेलनच असते.
आफ्रिकन म्हण आहे, एक बाळ मोठा करताना अख्खं गाव कामाला लागतं. अशाच एका गावात घडलेली भालूची ही कहाणी, थोडीशी पुढे नेलेली, तेच तर सांगते ना? आईला मदत करणारा श्याम आपल्याला नवा नाही. बहिणीचा प्रेमाने सांभाळ करणारा भालू, कपडे धुऊन, सुकवून घरी नेणारे शंकरराव, आणि हो, छोकरी दिसल्यावर अपत्यप्रेमाने भारावून गेलेले कित्येक स्त्री-पुरुष हे असेच भेटत राहोत आपल्याला. आमच्या गोष्टीतले चटईवाले काका, शंकरराव, चणेवाला भय्या भावलीला बघून चळत नाहीत. यास्मिनच्या आईचा, भालूच्या आईचा, श्यामाताईचा भलताच विश्वास आहे गावच्या लोकांवर. ते त्या विश्वासास पात्र ठरतात. आजकालच्या जगात असेच दिसेल असे नाही हो भालू... आणि भावले, अशी वेंधळटासारखी इकडे-तिकडे होऊन चालणार नाही हे सांगायलाच हवं तुला. पारंपरिक कहाण्यांतून लोकांच्या चांगुलपणाचे केलेले गुणगान सार्थ होवो. आपल्या सर्वांना विश्वबंधुत्वाचे दर्शन घडो ही सदिच्छा.
(स्कॉलास्टिकद्वारा प्रस्तुत जेन कोवेन-फ्लेचर यांच्या ‘गांव का बच्चा’ या गोष्टीचा हा केवळ अनुवाद नाही. आमच्या मुलांना उपयोगी पडतील अशा मूल्यांची इथे जाणीवपूर्वक योजना केली आहे. त्या दृष्टिकोनातून ही किंचित स्वतंत्र रचना आहे म्हणा ना. मूळ कथाबीजासाठी लेखक-प्रकाशकांचे आभार.)

(ambuja@gmail.com)