आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाष्‍ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सवाष्ण हा शब्द कसा आला असेल? शब्दोत्पत्तीत गम्य असलेल्या नव-याला तिने विचारले. मला माहीत नाही. बुवा वदला. अलीकडे सुवासिनी लिहितात, सुहासिनी असेल ते. वास कसला यायचाय बाईला? म्हणजे तिच्या हसण्याचा दरवळ अवतीभवती, त्याला तिचा वास म्हणता येईल. त्याचे दुर्लक्ष विनोदाने घेण्याचा तिचा प्रयत्न. तसं नाही, फुलं माळून सुवास दरवळवणा-या सुवासिनी. नराने टिपलेले प्रकटले. असं का, मग सोपंच आहे, केवळ नवरा असलेलीनेच फुले माळायची हा नियम मोडून टाकला की सगळ्याच सवाष्णी. सामाजिक सोहळ्यांपासून वंचित स्त्रियांना मुक्त करण्याचे लहानपणापासूनचे वाटलेले, तिचे प्रबोधन फारसे यशस्वी न झालेले. आज चुटकीसरशी उपचार मिळाला म्हणून हुशारबुवाचे तिने आभार मानले. हं, सोप्पं आहे! माळा फुले, व्हा सवाष्णी, नसो नवरा, येईलच कुणी तरी हुंगायला. मग ओरडू नका. शी? तिच्या मनात शिसारी दाटून आली. स्त्रीने केवळ स्वत:साठी कधीच काही नाही करायचे? केसांत माळलेली फुले लवकरच कोमेजतात म्हणून तरुणपणी ती कार्यालयात तिच्यासमोर टांगलेल्या देवीच्या फोटोला गजरा अडकवायची. स्वत:ची संध्याकाळ ताजी असावी म्हणून तसे करायचे हे सांगूनही कुणाला मान्य नव्हते. सहका-यांच्या मते ती भक्तीण.
चाळीस वर्षांच्या संसाराचे हिशेब सुरू झाले तिच्या मनात. अलीकडे सकाळ अशीच होते... शरीर कुरबुरतं, मन दुखतं, असून सगळे सांत्वनाला कुणी नसतं. पाहा ना. काल महाशय गावाहून येणार म्हणून ती मध्यरात्रीपर्यंत जागली. वयोपरत्वे वाढलेल्या चिडचिडीवर प्रयत्नाने हसू पसरण्याचा तिचा उद्योग. कौतुकाचे दोन शब्द ऐकवावेत असं नाही. निदान प्रवास, तिकडच्या गमती असले बोलायचे. दोन प्रश्न विचारले संवादाची सुरुवात म्हणून, तर कशीबशी उत्तरे. स्वारी कंटाळलीय म्हणत ती झोपायला गेली. अंथरुणावर पडल्यावर आठवलं, गादी पसरायची राहिलीय. उठून पसरली. स्वारीचा कपडे धुवायचा उत्साह दिसल्यावर घड्याळाकडे पाहत रात्रीचा दीड ही आवाज करण्याची वेळ का आहे? उद्या धुता येतील, असे सुचवले. काही मिनिटांतच वाद्याचे स्वर कानावर. अभ्यासाचा मुहूर्त लागलेला दिसतोय तेव्हा तक्रार करू नको, असे स्वत:च्या उतरलेल्या रक्तदाबाला दटावत दार लावून झोपण्याची धडपड. वाजवणे संपले, नळाचा आवाज, त्यानंतर कसली तरी ठकठक. आपल्याच डोक्यात ते घाव पडताहेत असं झालं तिला. पाहते तो बॅग आवरणे. पेपर, पुस्तकं टेबलवरून खाली. शेवटी, आत्ता नको, मला काही तरी होतंय, आजारी आहे मी, आवाज बंद करून झोपता का? असे रडवेल्या स्वरात तिने विचारले तेव्हा दुस-या दिवशीच्या भेटीगाठींच्या नोंदी पुटपुटत आपल्या खोलीत जाणं झालं. आई गं, बाबा रे असे मोठमोठ्याने बोलत एकदाची शांतवले. जाताजातासुद्धा नाही पुसले की, बाई बरं नाहीये म्हणजे काय होतंय? त्याला जराही बरे नसते तेव्हा आपल्याला कसं पटकन कळतं, आपण किती कोड पुरवतो. त्याला बरं वाटल्यानं जणू आपल्यालाच बरं वाटतं. किंचितकाळ दुर्लक्ष झालं तरी अगदी मी कुणाला नकोय हे गाणे ऐकवून तिला काम टाकून धावायला लावतात हे सगळे आठवताना कधी तरी डोळा लागला. पहाटे जाग आली. रात्री दोन शब्द ऐकवल्याबद्दलची टोचणीच पहिल्यांदा तिला जाणवली. जाऊन तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला, चुकलं म्हणाली. हूं! त्याचा स्वीकार. थोडं सम्यक वागायचं हा वर सल्ला. खरंच हृदयाच्या देठापासून कळ उठली तिच्या. सामोपचारानेच घ्यायचे, असा निग्रह करत म्हणाली, सरकता का? वाद्य हवं तर बैठकीवर ठेवू. तुम्हाला कमावलेल्या पांढ-या चामडीचा स्पर्श प्रिय आहे, माझ्या पाठीला जिवंत माणसाच्या उबेने जरा शेकावे म्हणते. खूप दुखतेय रात्रभर. वाद्याचीच आहे ही म्हणत त्याने तिला किंचित जागा दिली. आडवी होतानाच तिला जाणवली त्याच्यात उमललेली वासना...
राम! निर्लेप प्रेम कधीच नसणार? मनात अश्रूंच्या सरी कोसळल्या. शांत होत तिने त्याचे हात हातात घेतले, म्हणाली, फक्त माझ्या पाठीला आधार हवाय तेवढा द्याल? चलबिचल झाली त्याची; पण त्याने मान्य केले. तेवढ्याने सुखावली. खरंच मानवी स्पर्श हा उपचार असतो का? कॉलेजमध्ये एकाने रेकीबद्दल मत विचारलेले नि ती उत्तरलेली, आईने डोक्यावर हात फिरवला तर ताप उतरलासं वाटतं ना? प्रेम देतं जगण्याचं बळ. पुढे प्राणीसहवासाच्या उपचारांबद्दल वाचलेले आठवत असतानाच त्याने विचारले, साडेसहा वाजले? उठतो. ग्लासभर गरम पाणी तेवढं दे आणून.
अरे, संसाराला लागल्यापासून हेच करत आलेय. सेवा. स्वत:च ओळखून त्याला काय हवं ते. कधी तरी त्यानेही काही तरी करावं माझ्यासाठी.तिच्या डोळ्यात पाणी. पाठीचा आधार तुटल्यावरून तो उठलाय हे समजली. नसेल द्यायचं तर नको, असं वाक्य फेकत त्याची पावले स्वयंपाकघराकडे वाजली. पुन्हा नळ, मग भांड्यांचे आवाज, मग स्तोत्रं. उठवतच नाहीय तर करूया सहन म्हणून तिने गादीवर पुन्हा अंग टाकलं. एका विशिष्ट स्थितीत पाठ कमी दुखते हे समजल्यावर तशीच पडून राहिली. निर्जीव गादी अधिक साथ देईल, असा विचार आला. देह जडावलेला... दहा-पंधराच मिनिटं झाली, टकटक ठकाठक... दार वाजतंय, दूध किंवा कोणी शेजारी, सुहासिनीने जायलाच हवे म्हणत उठली. बुवा बाहेरून खटाखट कुलूप लावून खडाखड चप्पल वाजवत जिना उतरत. उठवलंच तर. चला, दिवस सुरू झाला.तिचा हात आपसूक झाडू्कडे वळला.
किती बदललाय. लग्नानंतर अहो नको, संजय म्हण असा हट्ट, सासूबार्इंनी चार लोकांत बरं दिसत नाही म्हटल्याचं सांगितल्यावर त्याच्या नजरेत दिसला आधुनिक होण्यातला गर्व. प्रेम नाही. पहिली ठेच. पुढे बेबीला शिकवताना म्हणाला, बाबा मोठे आहेत, अहो म्हणायचं. तेव्हा आईपण मोठीच आहे ना, अशी बेबीची गोंधळलेली मुद्रा पाहून हसलेलो. समाजातलं बाबाचं स्थान आईपेक्षा मोठं, असं मांडणा-या त्या प्रसंगाला गांभीर्याने घेतो तर?
या ‘जर’-‘तर’ला अर्थ? जरूर आहे, पुढच्या कित्येक जणांच्या सुखी संसारासाठी या ‘तर’ला नक्की अधोरेखित करायला हवं. आपल्या विचारमालिकेतला हा मोती तिला सुखावून गेला, सड्याचे तुषार मनाला प्रसन्न करते झाले. खरोखरीची सुहासिनी मी तुझ्यामुळे जाहले. ती समाधानाने उद्गारली.