आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती किती स्त्रियांचे कौतुक मी त्या करु ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायन्स काँग्रेसमध्ये स्त्रियांचा सहभाग शून्य. रजिस्ट्रेशन, ट्रान्सपोर्ट, मेडिकल, राहण्या-जेवण्याची व्यवस्था, वक्ते नि श्रोते, पाहावे तिथे टाय, शर्ट, धोतर... सुरम-रंगीन असे काही नाही.
विमेन्स काँग्रेसला प्रतिसाद कमीच असतो, त्या मानाने संयोजनाची जबाबदारी अधिक तेव्हा तो ट्रॅकच रद्द करावा या सुरांच्या पार्श्वभूमीवर सायन्स काँग्रेसमधूनच स्त्री हद्दपार केली तर, असे कल्पनाचित्र रंगवत होते. दचकू नका. प्रत्यक्षात मुंबई विद्यापीठातील विज्ञानशाखा अधिष्ठाता प्राध्यापिका माधुरी पेजावर यांच्या समर्थ नेतृत्वाने सात सत्रे, चर्चा आणि उद्घाटन-समारोप धरून विमेन्स ट्रॅकमधील दहा व्यासपीठांवरून डझनभर विदुषी नि तिसाहून अधिक संशोधिकांद्वारा स्त्रियांचे काम नि स्त्रियांसाठी काम दोन्ही स्तरांवर चांगलीच मांडणी झाली.
२७ जून २०१४च्या संध्याकाळी पेजावर मॅडमची पहिली मेल होती अभ्यास मंडळांतील पंचविसेक महिलांना, विमेन्स ट्रॅकसाठी विदुषींची नावे सुचवा. प्रतिसाद म्हणून रातोरात म्हटल्यासारखी शिरीन एबादी या नोबेल पुरस्काराने सन्मानितेसह विविध विषयांत ख्यातनामशी पंचवीसभर नावे आली. समन्वयिकेकडून लोकशाहीचा पुरस्कार नि सख्यांकडून
तत्काल आणि उचित प्रतिसाद याचे हे उदाहरण स्त्रियांच्या व्यावसायिक कौशल्यावरचे विनोद चघळण्यात धन्यता मानणा-यांसाठी.

शोधनिबंधांसाठी सुरुवातीस सुचवलेले विषय अन्न-आहार, पर्यावरण, ताण-तणाव तसेच गुन्हे आणि स्त्रिया, आरोग्यसुविधा आणि तंत्रज्ञानाचे स्त्रीस वरदान, आयटीमधील स्त्री आणि, तिने-तिच्यासाठी (निर्मिलेले विज्ञान?) तसे थोडे घिसे-पिटेच वाटले होते. विमेन्स काँग्रेसला सपोर्ट या कर्तव्यभावनेने धीर करून स्वत:च्या संगणन नि जीवनाभिमुख शिक्षण या
विषयाशी प्रतारणा न करता ‘भारतीय तर्कशास्त्राचा एक नवा आयाम : ताण-तणाव निर्मूलनार्थ’ असा पेपर मी माझ्या संस्कृतमधील सखीशी चर्चा करून बेतला. अगदी दिलेल्या कापडात समोरच्या व्यक्तीला हवा असलेला नमुना बसवण्यासाठी आराखडा बनवण्याइतका अनुभवभरोसे! प्रॉडक्टची कल्पना पूर्ण मांडणी होता-होताच येणार. प्रेझेंटेशनसाठी निमंत्रणाची मेल आली तेव्हा विषय केवळ पाचच मिनिटांत मांडायचाय असे नवे आव्हान. सामान्यत: गणितात नसलेल्यांसाठी त्यांच्या सभोवतालची समस्या स्वीकारून गणिताने पटकन आणि खात्रीची उकल होते हे दाखवायचे, तर्क हा ह्यूमॅनिटीजमधला विषय, तो व्यवस्थापनार्थ योजायचा हे तर्कट आमच्या संशोधनाचाच भाग म्हणायचे. झाले, तयारीनिशी मांडवात हजर राहून आम्ही पेपर वाचनाचा उजेड पाडला. त्याच सत्रात सादर झालेले इतर विषय होते मुंबईतील युवतींचा आहार नि ताकद, स्त्रीचे प्रदर्शन आणि त्याचा समाजावर परिणाम, मत्स्योत्पादितांतील विविधतेतून कमाई इत्यादी.

शहरी तरुणींचे सादरीकरणावरील प्रभुत्व आणि थोड्या वयस्क वा मागास भागांतून आलेल्या महिला सादरीकरणाचा पहिलाच प्रसंग असावा तशा गांगरलेल्या, व्यासपीठावर जाईपर्यंत पुन:पुन्हा सराव करत, श्रोत्यांशी नजरानजर टाळत अशाच दिसल्या. आणि अशा ठिकाणी फारच उचित होते ज्योती शर्मा या अधिकारी तरुणीचे किरण या आशेचा किरण दाखवणा-या शासकीय योजनेची ओळख करून देणारे व्याख्यान. नववर्षदिनाची खुशखबर : Knowledge
Involvement and Research Advancement through Nurturing (KIRAN) संशोधिकांसाठीच्या या खास उपक्रमात करिअर ब्रेक झालेल्या वा पूर्णवेळ कायमस्वरूपी नोकरी नसलेल्या स्त्रीला मूलभूत वा सामाजिक स्वरूपाचे संशोधन करायचे असल्यास पीएचडी असेल तर रु. ५०,००० वा पदव्युत्तर पदवीप्राप्त असेल तर रु. ३०,००० अशी दरमहा संशोधनवृत्ती मिळेल असे पत्रक
(http://dst.gov.in/whats_new/whats_new14/OM-Fellowship%20Enhancement-
Dec.2014.jpg) डॉ ज्योतींनी हे आवर्जून सांगितले, की किरण योजनेतील इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स या विषयात शिक्षणासाठी निवड झाल्यास रु. २०,००० व त्या शिक्षणानंतर इंटर्नशिपदरम्यान रु. ३०,००० दरमहा शिष्यवृत्ती घेऊन स्वत:चा व्यवसाय करू घातलेल्या ललनांची संख्या वाढते आहे. पण ‘ती’चा संशोधन उत्साह अजूनही खूप वाढायला हवा.
जाणकार स्त्री अधिकारी असते तेव्हा तिची कुणालाही समजावून घेऊन पुढे आणण्याची कळकळ वेगळीच. शशी आहुजा आणि मंजू शर्मा या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतील समर्थ, सुजाण व्यक्तिमत्त्वांना ज्योतीचे तेज लाभलेय. मुलींच्या पुढे येण्यातले अडथळे शोधून दूर करायचे तिघींनी ठरवलेय. त्या आपल्या ध्येयाच्या दिशेत प्रगती
करतायत.

महिला अर्जदारासाठी तीस किंवा चाळीस वर्षे वयाची कमाल मर्यादा अडचणीची असल्याचे ओळखून ती आता पुरेशी शिथिल करण्यात आली आहे, आवश्यकता वाटल्यास ती अजूनही शिथिल करण्याचा विचार होईल असे त्या म्हणाल्या. कुटुंबाचा पुरेसा पाठिंबा हा तर कोणाही संशोधिकेस आवश्यकच. तो असताही बरेचदा स्त्रियांचे संशोधन अडते ते चांगल्या
स्त्री मार्गदर्शकाअभावी. मेंटर्स तयार व्हायला हवेत तर ज्येष्ठ संशोधिकांनीही किरणचा लाभ घेत आपली प्रगती साधायला हवी. स्त्रीला आदरपूर्वक वागवणारे पुरुष मेंटर्स असल्याचा विश्वास समाजात निर्माण व्हायला हवा. शासनाच्या योजना लाख असतील. त्यांच्या उद्दिष्टपूर्तीस समाजमनाची साथ लागतेच. गावामध्ये पिण्याचे पाणी घराघरापर्यंत पोहोचवण्याची योजना मंजूर झाली. बुजुर्गांनी प्लंबरला पाइपलाइन गावापासून दोन किलोमीटरवरच
थांबवायला सांगितले. म्हणे दूरवरून पाणी भरण्यासारख्या कामात स्त्री असली म्हणजेच ती व्यवस्थित दबून राहते! पर्यावरणविज्ञानाच्या सत्रात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या जानकी अंधारिया यांनी ऐकणा-यांच्या डोक्यात लख्ख प्रकाशच पाडला या अनुभवकथनाने.
विमेन्स काँग्रेसचे विषय वाचून अणुऊर्जा, अवकाशविज्ञान, भूकंपविज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग वा जेनेटिक इंजिनिअरिंग असे विषय स्त्रियांसाठी नाहीत वाटतं, हा आमच्या भाषाविभागातील सखीचा शेरा नाही म्हटलं तरी जिव्हारी लागला होता. निमंत्रितांमध्ये देवकणांच्या संशोधनात कार्यरत रोहिणी गोडबोले आणि प्लाझ्मा रिसर्चच्या अमिता दास होत्या. असे आदर्श समोर आणण्याचे श्रेय संयोजिकेचे. अन्यथा शोधनिबंध वाचणा-यांमध्ये बहुधा गणिती विषयातली मी एकटीच. असे का?

पेपर लिहितानाच्या अनुभवानेच मला या प्रश्नाचे उत्तर दिले. आमची सखी संसार नि नोकरी यात सकाळी सहा ते रात्री दहा गुंतलेली. चर्चेसाठी तिने मला दिलेली वेळ रात्री अकरा ते सकाळी साडेपाच! किती रात्री ओळीने ती माझ्याबरोबर संशोधनाचे काम करू शकेल? आम्ही आमच्या बाळाला घरी ठेवून डाटा गोळा करायला जायचो ना, रजा कशाला पाहिजे संशोधनासाठी? जीवशास्त्रातील संशोधिकाबाई प्रिन्सिपलच्या खुर्चीतून ओरडल्या नि एका संगणकशास्त्राच्या भावी संशोधिकेच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे मी पाहिलेले आठवले. खारफुटीच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठातील भोसले मॅडमचे स्थान त्यांच्या निवृत्तीनंतरही अनेक वर्षे अबाधित आहे.
भरती-ओहोटीच्या वेळी पहाटे-रात्री दूरदूरच्या किना-यांची राखण करण्याचे एखाद्या विवाहितेस जमले असते का, असा मला प्रश्न आहे. आदिवासींमध्ये राहून संथाळांच्या कथांवर संशोधन करणाऱ्य‍ा दुर्गाबाई विविध विषयांत आपले दुर्गेचे स्थान अबाधित ठेवू शकल्या, हेही डोळ्यांसमोर येतेच. अलीकडेच मला एका जागतिक कीर्तीच्या दिल्लीस्थित संशोधिकेने
सांगितले, तिच्या दर्जेदार संशोधनाचा आलेख चढताच राहावा म्हणून तिच्या पतीने घरी राहून मुलांचा सांभाळ करण्याचे ठरवले. आणखी काही वर्षांनी ती निवृत्ती घेऊन घर पाहील, तेव्हा तो संशोधन करेल. केवळ गणितीच नव्हे तर कोणत्याही विषयातील उच्च दर्जाच्या संशोधनासाठी भान विसरून विषयाला वाहून घ्यावे लागतेच.

अपवाद का हा? या २००९च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराच्या मानकरी अॅडा योनॅथ यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी नातीने पाठवलेला संदेश दाखवला, ‘माझी आजी मोठ्ठी शास्त्रज्ञ आहे. पण हे किती छान आहे की तिला माझ्यासाठी वेळ आहे.’ बाईंनी आवर्जून सांगितले, की कौटुंबिक सुखाला काट न मारता संशोधन करणे आवश्यक नि शक्य आहे. बाईंच्या घरच्यांबद्दल मला कुतूहल होते म्हणून शोधले इंटरनेटवर तर तिथे केवळ त्यांच्या मुलीचा नि नातीचाच उल्लेख : (आणि आहे एक केक, रायबोजोम्सच्या डिझाइनचा, त्यांच्या एका स्त्री सहकारीने बनवलेला. लहानपणी पुस्तकांची साथ नि मादाम क्युरी हा आदर्श हे कदाचित बाईंच्या यशाचे गमक असावेत.) मधुरिमामधून मुलींच्यात काही करून दाखवण्याची प्रेरणा जागृत होते. पुढे काय होतं? कुठेतरी नोकरी लावून द्या मॅडम अशा मेल्स... मुलींनो, (हा अॅडाबाईंचाच उद्गार बरं) स्वत:ला घडवण्यास पुढे या, कोणी न तुम्हाला थांबवू शकेल. न
कोणी तुम्हाला व्यासपीठ देईल तुम्हीच स्वत:ला मागे ठेवलेत तर. इतक्या मोठ्या संयोजनामध्ये स्त्रियांनी ब-याच जबाबदा-या उचलल्या. कोणत्या प्रकारच्या? किती जणी निर्णयप्रक्रियेत होत्या? माझ्या किती संशोधनार्थी कन्या संशोधकांची व्याख्याने ऐकून धन्य झाल्या? किती जणींनी इतरांशी संवाद साधला? प्राइड ऑफ इंडिया हे प्रदर्शन किती जणींनी पाहिले? सीएसआयआर आणिक अनेक संस्था पुढे सरसावल्यात स्त्रियांच्या आर्थिक साहाय्यास, अन्न आणि उत्पादने यासारख्या विषयातही पेटंट्स मिळवता येतात. रजा, पगार,
शिष्यवृत्ती, नवनव्या संधी असे किती सांगितले तरी प्रस्थापितांसमोर धाडसाने पुढे येण्यात माझ्या मुली कमी पडतायत.
खरे तर त्यांच्या अंगी किती गुण, विमेन्स काँग्रेसइतके नेटके आयोजन क्वचितच दुस-या एखाद्या सेक्शनचे असेल. पाहुण्यांची ओळख करून देण्यातही बहुतेक जणींनी अनेक जणांपेक्षा अधिक गुण मिळवले. प्राचीन विज्ञानसत्राचे नेतृत्व नि नियोजन महिलाधिक्याने होते. पाणिनी व्याकरणाआधारे भारतीय भाषांच्या भाषांतरासाठी संगणक आज्ञाप्रणाली लिहून शास्त्रज्ञांच्या विश्वात भारताबाहेरही मान्यता पावलेल्या अंबा कुलकर्णींचे काम या व्यासपीठावरून मांडण्यात आले असते तर बहुतेक श्रोता निस्तब्ध होऊन गौरवाची खरी गोष्ट मनात रुजवता झाला असता. संसार आणि संशोधनात सारख्याच उच्च दर्जाचे यश मिळवलेल्या अंबा मॅडम योनॅथ मॅडमच्या वारसदार म्हणाव्यातशा.

मेन्स काँग्रेसमध्ये विमेन इनोवेटर्स या विषयावर बोलण्यास शशीबाला सिंगना पाचारण केलेले. मनुष्यकल्याणार्थ निसर्ग, जैववैविध्याची रक्षणकर्ती हे विषय होते पूर्वा साळवेकर नि मालविका दडलानी यांचे.युनूस मोहंमद यांच्या विचारांची री होती मायक्रोफायनान्समधून स्त्री सक्षमीकरण या वैजयंती पंडित यांच्या विषयात. शीला मिश्रांचे जेंडर स्टॅटिटिक्स, गीता
चंदा, चयनिका शहा आणि चमूची योनॅथ मॅडमच्या विचारांविरुद्ध, काहीशी अधिक वास्तववादी अशी जेंडर डिस्क्रिमिनेशन इन सायन्स ही चर्चा किंवा श्रद्धा इंगळे या उत्साही सखीचे माहिती-दळणवळणशास्त्र ही सत्रेही खास रंगलीच असणार. एकाच वेळी दहा धबधबे कोसळताना कोणता साठवू मनात असे न होते तरच नवल.
प्रत्येक धबधब्याच्या धारेत प्रत्येक क्षण भिजण्याचे कसे होणार? सगळ्याच सत्रांना उपस्थिती लावणे माझ्याकडूनही झालेले नाही. असो, विमेन्स काँग्रेसबद्दल सांगत होते, प्रतिसाद कमी असण्याचे एक कारण आपापल्या विषयसत्रात मांडलेल्या संशोधनाचे अधिक चांगले स्वागत होत असते, अधिक दर्जेदार सूचना मिळत असतात, नेटवर्किंग होते, कोलॅबोरेशन्सच्या संधी
वाढतात म्हणूनही कुणी नसतील इकडे आल्या. वक्ते खास असूनही श्रोत्यांची संख्या खास नव्हती यात जाणिवेचा अभाव हे एक कारण. विद्यापीठाच्या वेबसाइटवर विमेन्स काँग्रेसचा नीटनेटका उल्लेखही नव्हता. इतक्या अडथळ्यांची शर्यत जिद्दीने हसतमुखाने पार करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजिका नि त्यांच्या साथींच्या अभिनंदनाची मेल बाईंना
पाठवणार त्याआधीच बाईंची मेल, आपण सगळ्याजणी वर्षातून एकदा तरी एखादी परिषद आयोजित करूयात का? या पूर्ण नियोजनात बाईंची मला मिळालेली ही केवळ पाचवी मेल. इतक्या कमी संपर्कात इतके सुंदर व्यवस्थापन आणि संशोधिकांना पुढे आणण्याच्या नियोजित ध्येयाचा सातत्याने पाठपुरावा करण्याची आस ही विमेन्स काँग्रेसची वैशिष्ट्येच
ठरावीत. जगभरातील संशोधिकांना जोडणारे अनेक उपक्रम होत असतात [http://anitaborg.org/get-involved/systers/] आपणही त्या गंगेत एक प्रवाह होऊन मिळूया. विमेन्स काँग्रेस आणि एकंदरच संशोधिकांची वाटचाल अनेकानेकांस प्रेरणादायी अशीच होवो या शुभेच्छा.