आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाच गं घुमा...नाचू मी कशी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाच गं घुमा म्हणतेय सखी, शंभराची नोट, नको दारूचा घोट, मन करू मोठं, दु:ख होईल छोटं, हात धरीन तुझा, हा विश्वास माझा, सोडू नको गाव, मोडू नको डाव, ओलांड तरी शीव मी पाहतेच कशी. नाच गं घुमा...नाचू मी कशी?

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. नाही हो, कालचीच. आटपाट नगरातली नाही, आपल्याच महानगरातली. उपनगरातल्या प्रवाशांची या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून या टोकापर्यंत वाहतूक करणाऱ्या मुंबापुरीची अभिसरणसंस्था अशा लोकल ट्रेनमधली. संध्याकाळची वेळ, महिलांचा डब्बा. पहाटेपासून दमलेल्याचा मागमूस नाही असे फ्रेश फ्रेश चेहरे, कार्यालयातून निघताना वॉशरूममध्ये दहा-पाच मिनिटं हा रिवाज यथासांग पार पाडत असलेले. कोणी सौम्य, कोणी कडक, कोणी माफक, कोणी भडक, रंगवलेले. चौथी सीट सेटल झाल्यावर प्रत्येकीच्या कानात इअरफोन नि नजर मोबाइलमध्ये गुंतवलेली. कोणी एखादी फॅनच्या हवेत डुलकी घेत असलेली. फेरीवाल्यांची हाक येई तितुक्यापुरते कोणी जागे होई, काय कसे विचारील, एखाद-दुसरी खरेदी की पुन्हा सगळे सेटल.

राखी विक्रेत्या एक-दोघांपाठोपाठ सूर, भैय्या मेरे... की बदललाच त्याने माझा नूर. बायकी ती पण न बाई, एक धटिंगण आकृती शेजारून जाई. टक-टक टाळ्यांचा आवाज, एकेकीच्या डोक्यावर हात, काहीतरी शुभवचन पुटपुटणारे ओठ नि पुन्हा पुढे हात... कुणी नवखी अंग चोरून घेते, कोणी रोजची तिच्याशी आपुलकीने हसते. कोणी हळवी तिच्या विचाराने स्वत:लाच त्रास करून घेते, ती आपली पुढे होत राहते. होता होता दरवाजाशी पोहोचते, काहीतरी विचार करते नि झटकन मागे येते.
नाभी उघडी, गुंडाळी साडी काळी,
ल्यायली काचोळी कलाबतुची काळी
डोळ्यांतून ओसंडे काजळाची रेघ काळी
ती दीर्घ नजरेतून प्रवासिनींस न्याहाळी...
झटक्यात हेरली तिने विशीमधली युवती
जी वार्तालापांत पूर्ण गुंतली होती.
होऊनी सामोरी मावशी धरतसे ठेका
बेटा शादी हुआ, अब बोलो दर्द किस चीज का?
थांबून पद्मिनी ती वदली.
लग्नास माझ्या वर्षे चार की झाली...
अरे, अभी तक नहीं हुआ बच्चा?
अभी कर देती हूँ सब का सब अच्छा।
येऊन मावशीने त्या तरुणीस कुरवाळावे
फिरवुनि हात डोक्यावर,
तिज पोटाशी दाबावे...
किती घामट कळकट
मावशीची ती काया
का पोरीस कळते तिच्या
पोटातली माया?
हलली मनातून राणी,
सांगे तिला कहाणी...
तरी म्हणे बाळांची नाही आणीबाणी
सुखी आम्हा राहू दे...
संस्कृत-बिंस्कृत नाही, मावशी तिच्या मिश्र हिंदीत आशीर्वाद देती झाली. म्हणाली, “बेटा, बरे झाले भेटलीस, मनातले सांगितलेस. सुखी राहण्याचा वसा आता देतेच कसा.” नागकन्या-देवकन्या नाही, ट्रेनमधल्या सुकन्यांनी उत्सुकतेने एकेका कानाला इअरफोनमुक्त केले. सरसावून वसा श्रवण करत्या झाल्या. तोवर मुलीच्या चेहऱ्यावर आता बास झालं असं उमटलेलं. तिकडे लक्ष न देता मावशी सांगू लागली. श्रावणमास येईल, एखाद्या मंगळवारी पाऊस कोसळतच राहील. दिवसभर बॉसने किचकिच केलेली असेल, आता डब्यात चिकचिक असेल. घरी परतताना चिंता घेरतील तरी तुम्ही त्या मोबाइलमध्ये बुडवून टाकाव्या. गाडीवर भरोसा ठेवून मार्गस्थ होणे प्रसन्नचित्ते चालू ठेवावे. टक टक टाळी मागून येते हाळी, असे झाले तर नजर चुकवू नये. देवानंच तिला आशीर्वादासाठी पाठवलंय असं मनी आणावं. मनीपर्सकडे हात जावा. एखादी शंभरेक तरी रुपयांची नोट काढावी, हळूच तिच्या हाती सरकवावी...
मग ती काय करेल? एवढ्या बधाईने खूष होईल. तोंड भरून अल्लाची, बाबाची दुवा मागेल. आयुष्यात तुमचे भले होवो म्हणेल. देवानं तिला त्यासाठीच पाठवलंय.
बोलत-बोलत मावशीने स्वत:च्या कनवटीला अडकवलेली काळी पर्स काढली. एक बंदा रुपया हातात आला, दातांमध्ये धरून हळूच चावला. मुलीसमोर धरत ‘प्रसाद आहे, जपून ठेव,’ म्हणाली. मुलीने तो भक्तिभावाने घेतला, पर्सबंद करण्यापूर्वी दक्षिणा म्हणून देण्यासाठी काही पैसे शोधू लागली. मावशीने शंभराच्या नोटेवर बोट ठेवले. मुलीने मुकाट ती नोट काढून दिली. पुन्हा मावशीने मुलीच्या डोक्यावर हात ठेवून दुवा मागितली, पहिल्यासारखेच तिचे डोके पुन्हा आपल्या गोलमगोल पोटावर विसावून घेती झाली. मी ही अशी जन्माला आले, देवाने मला तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच पाठवलंय, म्हणाली. बेटा तुला मुलगा होईल, मुलगी होईल, सारी सुखाने राहाल म्हणाली. मुलीने तिला सारं साग्रसंगीत करू दिलं तशी मावशी समाधानाने अंतर्धान पावली. सर्व सख्या थक्क झाल्या. इअरफोन कानात अडकवून मोबाइलमध्ये नजर गुंतवता गुंतवता मुलीनं ते जाणलं.
एक गोरी-भुरकी दुसरीला सांगत होती, ‘कोण आहे ती? न नर, ना नारी. ती तर मंगळागौरी. देवाने तिला आशीर्वादासाठीच धाडलंय.’
पावसाची चिकचिक नि बॉसची किचकिच यावर कचकचत मनातल्या मनात चरफडत आपण चाललोय, पोहोचणार आपल्या उबदार घरकुलात. ती आता कुठे जाईल?
गोठ्याच्या दारी गवताच्या गंजीवर, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला लागून कदाचित कुत्र्या-मांजरांबरोबर, फार झालं तर एखाद्या चाळीच्या कडेला ‘त्यां’च्या झोपडीत, तिच्यासारख्यांसोबत करील शेअर...
युनिसेक्स म्हणून आपण कौतुकाने चढवणार नाइट सूट, आपला आत्मा असणार आश्वस्त कारण त्याला माहीत आहे त्याची नक्की भूक, तो स्त्रीधारी आहे की पुरुषधारी...
आणि ती?
नकली शृंगार करून वाट पाहील...
कोणाची?
तिच्या आत्म्याला स्वत:चे मर्म गवसणार का कधी? असहाय शरीरे भिडतील एकमेकांना, मने राहतील कुरतडत स्वत:ला, एकमेकांना...
अनारोग्याचे ठरतील बळी, संपतील जीवने...
मागे त्यांच्या सख्या-सोबतींचे आक्रोशणे, पुढल्या जन्मी मुलगा नाही तर मुलगी होणे, नको आयडेंटिटी क्रायसिसमध्ये अडकलेले जिणे...
किती साहावे ते समाजाने नाकारणे?
आणि तिचे ते अत्यंत सकारात्मक बोलणे, मी ही अशी, देवाने मला आशीर्वादासाठीच धाडलंय.
दुसरीच्या, तिसरीच्या, चौथीच्या... डब्यातील प्रत्येक सखीच्या मनात नवा जागर चालू झालेला.
विचारांचा पिंगा, साथीदाराबरोबर रंगलेली फुगडी, सोबत्यांबरोबरचा झिम्मा आणि मध्ये ती. नाच गं घुमा म्हणतेय सखी, शंभराची नोट, नको दारूचा घोट, मन करू मोठं, दु:ख होईल छोटं, हात धरीन तुझा, हा विश्वास माझा, सोडू नको गाव, मोडू नको डाव, ओलांड तरी शीव मी पाहतेच कशी.
नाच गं घुमा...
नाचू मी कशी?
शंभराची नोट, नसे खिशाला चोट, हा प्रेमाचा लोट, खिलवीन रोट, ये माझ्या घरी, सांजच्या पारी, सोडू नको गाव, मोडू नको डाव, ओलांड तरी शीव मी पाहतेच कशी.
नाच गं घुमा...
नाचू मी कशी?
शंभराची नोट, करकरीत धोट, गाव जरी भोट, दोघी सरळसोट, विसरू नको मला, शिक्षण तारील तुला, सोडू नको गाव, मोडू नको डाव, ओलांड तरी शीव मी पाहतेच कशी.
नाच गं घुमा...
नाचू मी कशी?
शंभराची नोट, विसरू नको पोट, सद्भावनांची मोट, आकांक्षांची बोट, जिद्दीने वल्हवू, पार तुला करू, सोडू नको गाव, मोडू नको डाव, ओलांड तरी शीव मी पाहतेच कशी. नाच गं घुमा...
ती मंगळागौरी नि तिच्यासाठी या मंगळागौरी...
बाई बाई बाई, माझ्याही मनात प्रकटतेय मंगळागौरी. कहाणी ऐकल्याचे हे फळ तर वसा घेतल्याचे काय फळ? मित्र-मैत्रिणींनो असा वसा घेऊनच पाहावा. कोणत्याही दिवशी घ्यावा, शक्य तितका संभाळून पुढे न्यावा. दुर्दैवी कहाण्या ऐकाव्यात, घासातला घास शेअर करावा, मनापासून मन हलकं करावं. दु:ख कमी होतं, स्वत:च्या भाग्याचा हेवा वाटायला लागतो. जीवनाला अर्थ मिळतो. वैशाखातसुद्धा श्रावणसरींनी चिंब व्हायला होतं. आणखी काय हवं?
तर, तुम्हा-आम्हा सर्वांचे शुभ चिंतून ही साठा उत्तराची कहाणी देवाचे द्वारी, पिंपळाचे पारी, घरच्या घरी, नोकरीच्या स्थळी, ट्रेनच्या बाकी, दुचाकीच्या चाकी, तुमच्या आमच्या मनी, जनीसुफळ संपूर्ण.
 
 ambujas@gmail.com
बातम्या आणखी आहेत...