आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञावंत मुलाची गोष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ मांडियेला (लहानात घुटमळणार्‍या महानाची कहाणी) (मूळ लेखक - व्हर्जिनिया अ‍ॅक्सलिन, अनुवाद - डॉ. म. अ. मेहेंदळे व डॉ. संजय ओक) ही मानसोपचाराच्या माध्यमातून स्वत:चा शोध घेणार्‍या एक विलक्षण प्रज्ञावंत मुलाची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या छोट्या प्रांतात घडलेली. इथे एका आजाराविषयी माहिती दिली आहे. हे वेड नाही, मतिमंदत्व नाही एवढे आपण समजण्याइतपत शहाणे झालो आहोत. पण तरीही हा आजार का होतो याची खरी उत्तरेआजही आपल्याला सापडलेली नाहीत. वेगवेगळ्या वर्तनाच्या नोंदी ठेवून त्यातून काही दिशा सापडते का, याची चाचपणी आजही चालू आहे. पण शेवटी शोध मात्र रुग्णाला स्वत:चाच स्वत: घ्यावा लागतो. या पुस्तकातील डिब्जची कहाणी ही त्या अर्थाने प्रातिनिधिक कहाणी आहे.
जन्मापासून पाच ते सात वर्षांपर्यंत आलेल्या अनुभवांचा अर्थ लावायला डिब्जला काहीसा उशीरच झाला होता. घरातल्या गोष्टी, आई-वडिलांचे वागणे, धाकट्या बहिणीचे नाते या सगळ्यांचाच एक गुंता झालेला होता तो सोडवायला काही वर्षे व विजनवास घ्यावा लागला. आपल्याभोवती गुरफटलेल्या कोषातून बाहेर पडणार्‍या फुलपाखरासारखेच काहीसे डिब्जचे झाले होते. अनुभव आले आणि जाणीव वाढू लागली. त्यातूनच त्याला स्वत:चा शोध लागला. कसे वागायचे, काय टाळायचे, समाजातील इतरांशी संबंध कसे प्रस्थापित करायचे हे समजणे म्हणजेच त्याच्या स्वत:च्या व्यक्तित्वाची त्याला नव्याने पटलेली ओळख. डिब्ज हा 5 वर्षांचा मुलगा होता. त्याच वागणं खूप विचित्र होतं. तो शाळेत तर जायचा, पण त्याचं कोणाशीही पटत नव्हतं. कित्येकदा तो अतिशय मतिमंद आहे असे वाटे तर कित्येकदा एखादी गोष्ट इतकी पटकन करून टाकी की तो अतिशय बुद्धिमान आहे असे वाटे. सर्वांपासून नेहमी दूर राहण्यासारखे व आपले तोंडसुद्धा न दाखवण्यासारखे असे त्याच्या आयुष्यात काय घडले होते? जेव्हा लेखिकेने डिब्जला प्ले थेरपी द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला ती डॉल्स हाउसमध्ये घेऊन जायची. तेव्हा तो बरेच वेळा म्हणायचा, ‘दाराला कुलूप नको’ ‘दाराला कुलूप नको.’ बंद केलेल्या आणि कुलूप लावलेल्या दारांचे डिब्जला फार कटू अनुभव आले होते. इथे डिब्जला खूप वेगवेगळे आलेले अनुभव दिले आहेत. जे वाचून अंगावर काटा येतो.
डिब्जच्या आईने जे काही लेखिकेला सांगितले ते ऐकून मन विषण्ण होते. तिने सांगितले होते : डिब्ज होण्यापूर्वी तिला लहान मुलांचा अनुभव नव्हता. लहान मुलं कशी असतात याची तिला काहीच कल्पना नव्हती. डिब्जच्या जन्मापासूनच त्यांची निराशा झाली होती. त्याच्या आईवडलांना मूल नको होते. डिब्ज झाला तेव्हा त्या दोघांना तो अजिबात आवडत नव्हता. वडील घरापासून जास्त वेळ बाहेर राहू लागले होते. आईचे करिअर पूर्ण वाया गेले होते. शिवाय तो गतिमंद होता व त्याला चारचौघात न्यायला त्यांना लाज वाटे. तो इतका निराळा होता की त्याच्या आईवडलांना त्याला हातसुद्धा लावू नये असे वाटे. न बोलणारा, न खेळणारा, उशिरा चालायला लागलेला, लोकांवर धावून जाणारा असा हा डिब्ज नव्हता, पण त्याच्या आईवडिलांनी स्वत:च त्याला अशी लेबले लावली होती. त्याला एका खोलीत डांबून बाहेरून कुलूप लावत. डिब्जला जेव्हा लेखिकेने खेळघरात ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली तेव्हा तो अतिशय वेगळा वागत असे. तो जेव्हा डॉल्स हाऊसमध्ये खेळायला यायचा तेव्हा तो वेगवेगळ्या खेळण्यांशी तासभर खेळत बसायचा. पहिल्या-पहिल्यांदा तो शांत असे. त्याला एकटे राहायची सवय लागली होती. त्याला त्याच्याबरोबर त्याच्या वयाचाही मित्र नको असायचा. तो पाच वर्षांचा असूनही बाटलीने झोपून दूध प्यायचा. खेळण्यातल्या बाहुल्यांचे त्याने एक डिब्जचे कुटुंब केले होते. शेवटपर्यंत तो पप्पा बाहुलीला सँड पिटमध्ये कायम पुरून टाकायचा व वरती डॉल्स हाऊसला कुलूप लावून बंद करायचा. त्याला माणसांपेक्षा झाड, निसर्ग यांच्याशीच बोलायला आवडे. तो चित्रही खूप छान काढायचा. शेवटच्या गुरुवारी म्हणजे त्याची ट्रीटमेंट पूर्ण होणार होती त्या दिवशी त्याला खूप वाईट वाटत होते. आता घरातील सर्वजण त्याच्याशी नीट वागायला लागले होते. डिब्ज आता त्याच्या पप्पांवर व बहिणीवर पण प्रेम करायला लागला होता.
डिब्जच्या मनात होणारा संघर्ष त्याने संपवला होता. प्लेरूममधल्या प्रतीकात्मक खेळात आपल्या दुखावलेल्या भावनांना त्याने वाट करून दिली होती. आपल्या भावना तो ताब्यात ठेवायला शिकला होता. स्वत:ला डिब्ज म्हणवून घेण्यात आता त्याला भीती वाटत नव्हती. डिब्ज जेव्हा सुटी संपवून एकदा परत आपल्या प्लेरूममध्ये आला तेव्हा त्याने त्याच्या विचारांना, दुधाच्या बाटलीला गुडबाय केले होते. लेखिकेला त्या दिवशी खूप वेगवेगळे प्रश्न विचारले. त्याचे तिथे मन भरल्यावर तो बाहेर आला व आपल्या आईकडे उडी मारून गेला व तिचा हात हातात घेऊन तिला त्याने सांगितले की मी पुन्हा इथे येणार नाही. आणि ती दोघे तिथून निघाली. सुरुवातीला रटाळ वाटणारे हे पुस्तक जसजसे उलगडत जाते तसतसे आपल्याला ते आवडते.