आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा, वन मॅन इंडस्ट्री! (अमित भंडारी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटसृष्टीत जे स्थान सलमान-शाहरुखचं, छोट्या पडद्यावरच्या मनोरंजन विश्वात तेच स्थान कपिल शर्माचं... कपिल हा आजच्या घडीचा कॉमेडीच्या दुनियेतला सर्वात यशस्वी ब्रँड....केवळ भारतच नव्हे आखाती देश, इंग्लंड-अमेरिका-कॅनडा असा चौफेर त्याचा फॅनबेस... तो चित्रपटात झळकला, यशस्वी ठरला... तो जाहिरातीत चमकला, क्लिक झाला... "कलर्स'शी झालेल्या व्यावसायिक संघर्षानंतर तो आता नव्याने "सोनी' टीव्हीवर झळकू लागलाय... इथे मुद्दा, 'चॅनेल वॉर'चा तर आहेच; पण त्याहीपेक्षा त्याने मिळवलेल्या उत्तुंग यशाचा आणि निर्माण केलेल्या "ब्रँड व्हॅल्यू'चाही आहे... एक स्टँडअप कॉमेडिअन अल्पावधीत स्वत:च एक इंडस्ट्री बनतो, एरवी टेचात मिरवणाऱ्या बॉलीवूडच्या तमाम स्टार्स-सुपरस्टार्सना आपल्या व्यासपीठावर यायला भाग पाडतो, हे सारंच अद्भुत आणि अविश्वसनीय आहे...
इटलीमधील आलिशान शहर फ्लोरेन्सच्या किनाऱ्यावर क्रुझ दाखल झाली. त्यानंतर तिथे रंगणार होता, ‘कलर्स’ चॅनेलसाठीचा दिवाळी स्पेशल शो… सोबत होती, त्या वेळेची टीआरपी देणारी कलर्स चॅनलची हुकमी मंडळी म्हणजे, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ची गँग. भर उन्हात क्रुझवर हा दिमाखदार सोहळा रंगत होता. इटली असो वा फ्रान्स, तिथलं ऊनही तेवढंच कडक. आपल्यासारखंच. उन्हाच्या त्या त्रासदायक झळांमध्ये माहोल जादुभरा करणारा चेहरा होता, कपिल शर्माचा. अष्टपैलू, फर्डा वक्ता, स्टॅण्डअप कॉमेडिअन, अँकर-विनोदवीर, अभिनेता अन् आता उत्तम गायक… तबलावादकही… त्याच्यामधील असे अनेक गुण आपल्याला त्या प्रसंगी जाणवत होते. पण त्या पलीकडे जाऊन सायंकाळी शांतपणे क्रूझच्या डेकवर फिरणारा, रात्री अकराव्या मजल्यावरच्या डिस्कोथेकमध्ये गायक मिकासोबत डान्सफ्लोअरवर पाय थिरकवणारा,शोच्या वेळेस आपल्या क्यूची वाटबिट न बघता, आपल्या हातात सूत्रं घेऊन अख्ख्या शोवर राज्य गाजवणारा... अशा अनेक मुखवट्यांच्या कपिलचंही विहंगम दर्शन काही तासांमध्येच आपल्याला झालेलं...
तो सर्कशीत हसवणारा विदूषक असतो. तो वाकुल्या दाखवतो. हसवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करतो. प्रसंगी स्वतःचं हसं करून घेतो. पण हे सारं करत असताना तो कसरतीही करू लागतो. खाली लांबलचक जाळी पसरलेल्या या खेळात, एका वेळी उंच उंच लटकत लटकत… पण समोरचा ज्या वेळी त्याला खेचण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी त्याचा कॉश्च्युम गळून पडतो, अन् त्या विदूषकाच्या मुखवट्याखाली दडलेला पट्टीचा ट्रॅपिझ आपल्यासमोर येतो. त्या वेळी ज्या भावना आपल्या मनात येतात, तेच सारं कपिल शर्मा नावाच्या या छोट्या पडद्यावरच्या आयकॉनकडे पाहून वाटतं...
पण, दुर्दैवाने इटली अन् फ्रान्समध्ये चित्रित करण्यात आलेला हा शो चॅनलवर प्रक्षेपित झाला नाही… आपण मात्र कपिलच्या अनोख्या परफॉर्मन्सचा धनी झालो. त्याची उत्स्फूर्तता, त्याच्यामधला अफलातून हजरजबाबीपणा, त्याचं टाइमिंग, त्या वेळी आपला शब्द पडू न देण्यासाठीची त्याने केलेली जद्दोजहद या सगळ्या गोष्टी आपल्याला क्षणार्धात भावल्या. पण हा शो का प्रसारित झाला नसेल?
या छोट्या पडद्यामागे काय सुरू आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता बऱ्याच गोष्टी कानावर येत होत्या. ‘चॅनलशी बरं नाहीए’, ‘चॅनलला जुमानत नाही’, ‘नाकापेक्षा मोती जड’ असे एक ना धड अनेक किस्से कानावर येत होते. या दरम्यान, त्याच्या शोच्या सेटला आग लागणं, ‘कलर्स’वरच ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’सारखा प्रतिस्पर्धी ठरणारा शो येणं… असं सारं काही घडताना लख्खं दिसत होतं.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये पहिल्यांदा झळकलेला हा चेहरा त्या दरम्यान मुलाखतींच्या वेळी दिसला होता. नंतर त्याची उत्तरं बदलत गेली. उत्तरांचे तोंडवळे बदलले. आपलं मूल्य निश्चित करता येण्याजोगा खेळ त्याने केला. लोकप्रियतेचं शिखर गाठतानाच त्याने बलाढ्य ‘कलर्स’ चॅनलशीच पंगा घेतला. खरं तर कलाकार हे चॅनलच्या हातचं बाहुलं होऊन राहणं पसंत करतात. किंबहुना, आपल्या तालावर त्यांना नाचवणं, हे चॅनललाही व्यवस्थित जमतं. पण कपिलला कसा हिसका दिला, अशा विचारात एक कळप असताना कपिलने सोनी चॅनलसोबत करार केला. त्यामधल्या अटींवर नजर टाकली तरी आपल्याला कपिलचं त्याच्या जगावर किती वर्चस्व किती आहे अन् त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू काय असू शकते, याचा सहज अंदाज येतो. कपिलने जेवढं मानधन मागितलं, तेवढं त्याला ते मिळालं. म्हणजे, या शोचा आराखडा तोच बनवेल, त्याला हवा तसा. त्या शोमध्ये कोणते पाहुणे येतील, कोणत्या पाहुण्यांना शोमध्ये मुलाखतीसाठी बसवण्यात येईल, याबद्दलचा अंतिम निर्णय हादेखील कपिलचाच असेल. जिथे चॅनल आपले अटी-नियम सांगतं, अन् तसंच होतं, असा हा काळ; पण इथे कपिलने आपल्यासाठी शो करावा, यासाठी काय काय केलं जातंय…
कपिल नावाचा हा आयकॉन आहे. कॉमेडीच्या दुनियेतला मोठा ब्रॅण्ड आहे. त्याच्या असण्यात, वागण्यात, बोलण्यात एक प्रसन्नता आहे. त्याच्या ‘कॉमेडी नाइट्स’नी लोकप्रियतेने सारे उच्चांक मोडले आहेत. त्याचं ‘बाबाजी का ठुल्लू’ असेल, वा गुथ्थीच्या बोलण्याची अघळपघळ स्टाइल सोशल नेटवर्किंगवर त्याच्या पिकमेसेजचा धुमाकूळ सुरू झाला. या सगळ्या खेळात त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवताना, ब्रॅण्ड व्हॅल्यू नव्याने निर्माण केली. ‘द कुमार्स अॅट नंबर ५२’ या ब्रिटनमधल्या शोची हललेली झेरॉक्स न वाटू देता, त्याला पंजाबी तडका असा मारला की, अख्ख्या देशात त्या वेळी ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ने धूम केली. ‘कॉमेडी सर्कस’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये बाजी मारणारा हा चेहरा दु:ख आणि निराशेवरचा अक्सीर इलाज वाटू लागला. लहान-थोरांमधल्या अनेकांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी हास्याची लकेर उमटवण्याचं इंगित त्याला उमगलं. केवळ प्रमोशनल शो न राहता, त्यामधल्या विनोदावर, त्याच्या धाटणीवर, सादरीकरणावर तितक्याच बारकाईने लक्ष देत एक आकृतीबंध त्याने निर्माण केला. त्यामध्ये विनोदाचं सौंदर्यीकरण वगैरे नव्हतं, तिथे होतं ते फक्त दिलखुलासपण अन् समोरच्याने मनमोकळेपणं बोलणं. या साऱ्या गोष्टी प्रमोशनवाल्या असल्या, तरी त्या शुगरकोटेड रॅपरमध्ये देण्याचं काम त्याने चोखपणे केलं. म्हणूनच ‘दबंग’ भाई असो, ‘फॅन’मय किंग वा ‘खिलाडी’ नंबर वन यांना आपली फिल्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर आजही हक्काचं व्यासपीठ कपिलच असतं...
म्हटलं तर कपिल हा हास्यसम्राट आहे, मनमौजी हरफनमौला आहे. बॉलीवूडमधल्या तमाम स्टार-सुपरस्टार्सच्या गळ्यातला ताईत आहे. ‘फोर्ब्स’च्या प्रभावशाली १०० व्यक्तींमधला एक आहे. पण त्या सोबत त्याने ज्याप्रकारे आपल्या नावाचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केला, ते न्याहाळणं कमालीचं औत्सुक्याचं आहे. कारण, एकीकडे ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी क्लासेस’ असं सारं काही सुरू असताना त्याने आपल्या नावाचं वजन कायम ठेवलं.
पण, स्टारडमसोबत येणारं ग्लॅमर अन् त्यासोबत येणारा रूतबा यामुळे कपिलच्या नखऱ्यांची चर्चाही होऊ लागली. शोजच्या संकल्पनांपासून त्याच्या सादरीकरणामध्ये चॅनलवाल्या मंडळींसोबत त्याचे शह-काटशहाचे खेळ सुरू झाले, पण त्या सगळ्यामध्ये रेटिंग मिळत असल्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण? असा प्रश्न चॅनेलवाल्यांना पडला. अर्थात, सामान्य प्रेक्षकाला या कॅमेऱ्यामागील राजकारणाशी काय करायचंय? त्यामुळे त्यांना दिसणारा, त्यांच्या घरात येणाऱ्या सदाबहार कपिल शर्माला आणि त्याच्या खोचक, तिरकस अन् खुमासदार बोलण्याला चांगलीच दाद मिळत होती. त्याने व्यावहारिक दृष्टिकोन चोख ठेवला अन् सारं काही क्षणार्धात बदलून टाकलं. त्याचाच परिणाम म्हणजे, २३ एप्रिल पासून सुरु झालेला ‘दी कपिल शर्मा शो’...
पण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये त्याच्या शोची दहशत इतकी आहे की, प्रतिस्पर्धी चॅनलने म्हणजेच ‘कलर्स’ने संजय लीला भन्साळीचा बॉक्स ऑफीस हिट ‘बाजीराव मस्तानी’चा त्या दिवशी, त्याच वेळेत वर्ल्ड प्रीमियर करण्याचा आक्रमक निर्णय घेऊन कपिलच्या रिलाँचिंगला सुरुंग लावण्याचा घाट घातलाय. अन् त्याची दणकून प्रसिद्धीही केली जातेय... ‘चॅनल वॉर’चा हा ताजा एपिसोड आहे...
पेण्टल, असरानी, जॉनी लिव्हरपासून सुरू झालेला हा प्रवास सुनील पाल, एहसान कुरेशी, नवीन प्रभाकर, कृष्णा, सुदेश, भारती सिंग इथपर्यंत येऊन पोहोचलाय. पण कपिल हा भारतीय कॉमेडीच्या दरबारातला कोहिनूर आहे. स्टॅण्डअप कॉमेडिअन स्टार होऊ शकतो, हे जॉनी लिव्हरने दाखवलं अन् सुपरस्टार होऊ शकतो, हे कपिलने सिद्ध केलं आहे. विनोदाचे परम्युटेशन-कॉम्बिनेशन, त्यामधलं समीकरण त्याने निर्माण केलं. त्या सगळ्यामध्ये सुनील ग्रोव्हरचे रुसवे फुगवे त्याने काढले. अली असगर, रमोना, किकू शारदा उपासनासिंग या सगळ्यांसोबत मोट बांधली. आता ‘सोनी’ टीव्हीवर सुरू करताना त्याने आपल्या टीमला विनिंग कॉम्बिनेशनला धक्का लावलेला नाही. अगदी सिद्धू पाजी सकट…
आज त्याला मिळणारं हे यश हे काय तितक्या सहजासहजी किंवा योगायोग नाही… परिस्थितीचे अनेक टक्केटोणपे खाल्ल्यानंतर हे सारं उपभोगण्याची संधी मिळालीय. बॉलीवूडमध्ये त्याने "किस किस को प्यार करू' सारखा सिनेमा केल्यानंतर त्याच्या फॅन्सनी मात्र हा सिनेमा उचलून धरला… अगदीच सुपरहिट नाही तरी या सिनेमाची हिटमध्ये गणती झाली, यावरून तरी अंदाज बांधू शकतो की, सिनेमा चालवण्यासाठी जेवढा देशभरात लागतो तेवढा प्रेक्षकवर्ग-चाहता वर्ग निर्माण करण्यात त्याला सूर गवसला आहे, ही बाब महत्त्वाची आहे.
लाफ्टर चॅलेंजनंतर त्याने सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला अन् सिनेमाच्या ताबडतोब आलेल्या ऑफर्सना नकार देण्याचा सुज्ञपणा त्याने दाखवला. अगोदर नावाला वजन प्राप्त झाल्याशिवाय या खेळात उतरायचं नाही… अन् हिरोची साइडकिक म्हणून काम करण्यापेक्षा आपण हिरो बनू शकतो, हा विश्वास त्याने कॉमेडिअन्सना दिला, ही बाब निश्चितच महत्त्वाची वाटते.
कपिलच्या विनोदाची शैली अन् त्यामधला प्रासंगिकपणा वगळला तर सादरीकरणातल्या एकसुरीपणावर मधल्या काळात टीकाही झाली; पण त्याच्यातली अफाट ऊर्जा,त्याच्या चेहऱ्यावरचा मिश्कीलपणा, समोरचा माणूस कोणाही असो त्याला एका क्षणात आपलंसं करण्याचं त्याचं कसब, अन् त्या सगळ्या गोष्टींमध्ये असणारा अण्डरकरण्ट स्ट्राँग ठेवण्यात, त्या-त्या स्कीटमध्ये वा समोर बसलेल्या पाहुण्यांची टेर खेचण्याचं जे कसब त्याच्यामध्ये अन् त्याच्या लेखकांच्या टीममध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टीला नाकारून चालणार नाही. इतकंच काय या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या उत्कर्षाचा विचार करण्याचं काम करणाऱ्या त्याच्या मॅनेजरलाही तेवढंच श्रेय द्यायला हवं, कारण त्याच्यासारख्याचे मूड स्विंग्स सांभाळणं अन् त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याला उद्युक्त करणं, या सगळ्या खेळाची सूत्रधार त्याची मॅनेजर आहे, तिच्याशिवाय त्याचा आर्थिक उत्कर्ष अधुरा आहे, असं त्याला जवळून ओळखणारे आवर्जून सांगतील.
एकीकडे ‘चला हवा येऊ द्या’सारख्या कार्यक्रमाची लोकप्रियता आपण मराठी चॅनलवर अनुभवतोय. राज्यस्तरावरील हा प्रशंसेस पात्र असा हा प्रयत्न आहे, पण त्याच्या पलीकडे दशांगुळे व्यापून राहणारा देशव्यापी कपिलचा धमाका आहे.
आपल्या आयुष्यातील अनेक सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन आपल्याला निखळ हसू देऊ करणारे दोन-चार क्षण पुन्हा मिळू दे, एवढीच प्रेक्षकांची माफक अपेक्षा असणार आहे. त्याचं इंगित कपिलला लक्षात आलं आहे, त्यामुळे हा ‘सोनी’वरचा शोदेखील तो तेवढाच रंगतदार करण्याचा प्रयत्न करेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तो बघताना पुन्हा हसून हसून डोळ्यांमध्ये पाणी येईल. असं हसल्याचं गेल्या कित्येक दिवसांत आठवत नाही. कारण, सरावानं हसू यावं, असे दोन-चार क्षण तर व्हॉट्स अॅप अन् ट्विटरवरचे जोक्सही देतात. त्यामुळेच त्या पलीकडे जाऊन नवीन सतत शोध घेत राहणं अन् रडणऱ्या लहान मुलाला त्याने पसरलेलं भोकाड आवरण्यासाठी जे काही करावं लागतं, त्याएवढंच कठीण अाणि त्यापेक्षा अनपेक्षित काहीतरी तो करील. आता सगळी पात्रं वेगळ्या भूमिकेत दिसतील पण त्याला प्रेक्षक स्वीकारतील का, हा तर खरा प्रश्न आहे…
'जन्म अन् मृत्यूच्या मध्ये नियतीने चालवलेल्या या खेळातील फसवणूक लक्षात आली की, हसवणुकीशिवाय पर्याय उरत नाही,’ असं पुलं म्हणून गेले आहेत. आपण आपलं तेवढंच निरागसपणे याकडे पाहू या. कॅमेऱ्यामागील व्यवहार, भांडणं, राजकारण असे अनेक भेसूर क्षण पचवून सादर होणारा कपिलचा विनोद असणार आहे. अशा वेळी चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटेल का, हा प्रेक्षक म्हणून आपला प्रश्न आहे आणि ‘चॅनलवॉर’मध्ये उतरलेल्यांना रेटिंग अन् शोचं यश यांचा महाभयानक ताण आहे. कोणाचं काय तर कोणाचं काय… ‘कलर्स’च्या राशीतला कपिलाषष्ठीचा योग हा आता ‘सोनी’च्या राशीला आला आहे, इतकंच…!

कपिलच्या कॉमेडीची ताकद
आपल्या ब्रॅण्डची काळजी घेताना ‘कलर्स’ सोबतच्या कराराला धुडकावून लावत शो करणं, त्यातले काही शो ‘कलर्स’च्या प्रतिस्पर्ध्यांसोबत. मग ‘कलर्स’कडे मानधनाचा आकडा वाढवून मागितला. मग त्यावर बैठका. त्यानंतर तब्बल दुप्पट मानधनावर शो करत असताना पुन्हा कपिलने इतर चॅनलसोबतचे संबंध मात्र चांगले ठेवले. त्यामुळे कपिलच्या शोवर कुऱ्हाड पडल्याचं कलर्सचे सर्वेसर्वा राज नायक सांगतात. एका शोच्या अँकर संदर्भातला निर्णय चॅनलच्या कार्यकारी निर्मात्याच्या, क्रिएटिव्ह कॉण्टेण्ट हेडच्या पलीकडे जातो अन् चॅनलच्या सर्वेसर्वाला या प्रकरणात लक्ष घालावंसं वाटतं, यामध्येच त्या कलाकाराची ताकद आपल्याला लक्षात येते.
मुखवट्यामागचा कपिल
मुंबईपासून १७०० किलोमीटरवर असलेल्या पंजाबमधल्या अमृतसरमधल्या या मुलाने स्वप्न पाहिलं होतं, ते गायक बनण्याचं. तबला उत्तम वाजवता येत होता. पण परिस्थितीचं दान उलटं पडत गेलं. वडिलांना कॅन्सर झाला अन् घरचं वातावरण बिघडलं. तब्बल सात वर्षं वडिलांनी आजाराशी झुंज दिली, पण त्या सगळ्यात घरातला आर्थिक ताळमेळ निसटला. बहिणीचा साखरपुडा तर केला, पण आईची पेन्शन जेमतेम साडेतीन ते साडेचार हजार होती. दोन भाऊ अन् एक बहीण अशी कुटुंबाची जबाबदारी कपिलवर येऊन पडली. दहावीचा अभ्यास करत असताना शहरातला पीसीओ बुथ सांभाळण्याचं काम तो करू लागला. मे महिन्याच्या सुटीत एका कापडाच्या मिलमध्ये रोज ६० रुपये या बोलीवर रंगाच्या कामासाठी जाऊ लागला. त्या वेळी ‘द ग्रेट इंडियन सर्कस’च्या २००७ मधल्या सीझनमध्ये तर ऑडिशनच नाकारण्यात आलेल्या या कलंदराने अवघ्या नऊ वर्षांत आपल्या नावाभोवती यशाचं कोंदण खुलवलं. अँकरिंग, स्कीट्स आणि नाटुकल्यांमध्ये आपलं नाणं त्याने खणखणीतपणे वाजवलं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये ओघाने गाणं मागे पडलं अन् अनेक निराशावाद्यांचा मसीहा म्हणून कपिलकडे लोक पाहू लागले. हा हसवतो. मस्त आहे… हे उद््गार घराघरांत निघू लागले. पण त्या साऱ्या गोष्टींमध्ये कपिलने स्वतःला आजमावणं सोडलं नाही. त्याच्या सगळ्या खेळात स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन त्याने दर वेळी आव्हानं स्वीकारली. आपत्तींना इष्टापत्तीमध्ये रूपांतरित करण्यात तो माहीर बनला. म्हणूनच या साऱ्या खेळात आपल्याला जाणवतं की, कपिल हा लढवय्या आहे. त्याच्या हसऱ्या मुखवट्यामागे, त्याने सोसलेले बेसुमार हाल आहेत...
अमित भंडारी
bhandariamit21@gmail.com